‘क्यार’ चक्रीवादळ झाले ‘अतितीव्र’; महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला मोठा धोका
तीव्र चक्रीवादळ ‘क्यार’ च्या तीव्रतेत वाढ होवून ते आता एक अति तीव्र चक्रीवादळ बनले आहे. आज, पहाटे ५:३० वाजता, चक्रीवादळ मध्य-पूर्व अरबी समुद्रावर अक्षांश १६.५ अंश उत्तर आणि रेखांश ७०.८ अंश पूर्वेस आहे, रत्नागिरीच्या २७० किमी पश्चिम /नैऋत्य, मुंबईच्या ३६० किमी दक्षिण/ नैऋत्य आणि ओमानमधील सलालाह पासून ७८० किमी पूर्व / दक्षिणपूर्व दिशेस आहे.
हवामानतज्ञांच्या अनुसार चक्रीवादळ पश्चिम / वायव्य दिशेने ओमानकडे सरकेल आणि येत्या २४ तासांत अत्यंत तीव्र चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र किनाऱ्यावर ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे, तर कर्नाटक किनारपट्टीवर ताशी ३० ते ४० किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. साधारण १० ते १२ फूट उंचीच्या लाटांची शक्यता असून काही भागात लाटांची उंची १४ ते १५ फूटांपर्यंत जावू शकते. म्हणूनच, मच्छीमार बांधवांना आणखी २४ तास समुद्रात न उतरण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
पावसाळी घडामोडींच्या संदर्भात सांगायचे तर, पुढील २४ तास कर्नाटकची उत्तर किनारपट्टी, दक्षिण कोकण आणि गोवा येथे काही मुसळधार सरींसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची अपेक्षा आहे. तथापि, आता भारतीय किनारपट्टीवर मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता नाही.
तथापि २७ ऑक्टोबरपर्यंत ही प्रणाली पश्चिमेकडे आणखी पुढे सरकल्याने त्याचा परिणाम भारतीय किनारपट्टीवर कमी होण्यास सुरवात होईल आणि २८ ऑक्टोबरपासून वाऱ्याचा वेग कमी होईल व साधारण ३० ते ४० किमी प्रतितास या दरम्यान वारे वाहण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान पुढील २४ तासांनंतर ही यंत्रणा हळूहळू कमकुवत होऊन अति तीव्र चक्रीवादळात आणि नंतर साधारण ३१ ऑक्टोबरच्या आसपास ओमान किनारपट्टीला धडकण्यापूर्वी तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल.
माहीती सौजन्य – स्कायमेट वेदर
