“आम्ही तिरंगा हाती घेतला, त्यांनी लाठी उचलली”; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून अभिजीत दिपके यांचा केंद्र सरकारवर निशाणा
नवी दिल्ली, दि. २० : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्जवरून कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर तीव्र टीका केली आहे. आंदोलनादरम्यान पुरुष पोलिसांनी महिला आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप त्यांनी केला असून, या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अभिजीत दिपके म्हणाले, “पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी मुलींवर लाठीहल्ला केला. सरकारकडन गुंडागर्दी केली जातेय. या सरकारमुळं २० मुलांनी आत्महत्या केली आहे. मुलांचं रक्त वाहायचं आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
दिपके यांनी केंद्र सरकारवर टीका करताना ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. “हे सरकार नीटच्या २० विद्यार्थ्यांचा जीव घेतल्यानंतर देखील समाधानी नाहीत. आता ते दुसऱ्यांचं रक्त वाहायचं आहे. पोलिसांनी महिला आंदोलकांवर लाठी हल्ला केला,” असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने सामाजिक माध्यमावरील आपल्या अधिकृत पोस्टमध्ये आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पक्षाने म्हटले आहे की, अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक हे अजूनही जंतर-मंतर परिसरात आंदोलन करत असून, ते केरळ हाऊससमोर शांततापूर्ण धरणे आंदोलन करत आहेत. “शांततापूर्ण विरोध संपणार नाही,” असेही पक्षाने स्पष्ट केले आहे.
सीजेपीने सामाजिक माध्यमावरील आणखी एका पोस्टमध्ये दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “आम्ही तिरंगा हाती घेतला, त्यांनी लाठी उचलली. आम्ही पुस्तकं हातात घेतली, त्यांनी अश्रू धुराच्या नळकांड्या चालवल्या. आम्ही संविधान दाखवलं, त्यांनी हुकुमशाही केली. दिल्ली पोलिसांनी संसदेतील त्यांच्या मालकांच्यावतीनं निष्पाप विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली, यासाठी आजचा दिवस लक्षात ठेवला जाईल.”
दरम्यान, पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्यावर नवी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असले तरी त्यांनी आपले उपोषण कायम ठेवले आहे. उपलब्ध माहितीनुसार, उपोषणाच्या तेवीसाव्या दिवशीही त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे.
रुग्णालयातून प्रसिद्ध केलेल्या एका पोस्टमध्ये सोनम वांगचुक यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केल्यानं उपोषण सुरु ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. तसेच, “शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी निश्चित होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहिल,” अशी भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे.
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, जबाबदारांवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे.

