स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत नवी मुंबईतील शाळांमध्ये जनजागृती; स्वच्छता, आरोग्य आणि पाणी बचतीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नवी मुंबई, दि. ३० : स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच रुजावी, या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाला अधिक गती दिली आहे. या मोहिमेअंतर्गत विविध शाळांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरण, आरोग्यदायी सवयी आणि पावसाच्या पाण्याचे संवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ११५, सेक्टर १५, वाशी तसेच महानगरपालिका शाळा, सेक्टर २०, नेरूळ गाव येथे विशेष प्रबोधन कार्यक्रम पार पडले. यावेळी ॲन्थोनी वेस्ट हॅन्डलिंग आणि परिसर सखी विकास संस्था यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपल्या घरात कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी होत असल्याची खात्री करावी आणि कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनाही त्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन या कार्यक्रमात करण्यात आले. याशिवाय पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, स्वच्छतेच्या सवयी कशा जोपासाव्यात आणि आजारांपासून बचावासाठी कोणती खबरदारी आवश्यक आहे, याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.
‘कॅच द रेन’ अभियानातून जलसंचयनाचा संदेश
पावसाचे पाणी साठविण्याच्या ‘कॅच द रेन’ अभियानाची माहितीही विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. घणसोली सेक्टर ७, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ७६, ऐरोली सेक्टर ७ येथील जमनाबाई जनार्दन मढवी शाळा, तसेच ऐरोली सेक्टर १७ येथील विसावा सोसायटी आणि घणसोली जिजामातानगर परिसरात जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यात आली.
या वेळी पिण्याचे पाणी वाया न घालविणे, घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे साठवणूक टाकीत जमा करणे (रेन वॉटर हार्वेस्टिंग), तसेच वृक्षारोपणाद्वारे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, याविषयी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे संस्कार रुजविण्यावर भर
‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाची अंमलबजावणी नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या मोहिमेत नागरिकांच्या सक्रिय सहभागाबरोबरच नवी मुंबईच्या भावी पिढीमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि जलसंवर्धनाबाबत सकारात्मक सवयी विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येत असून, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर उभारणीसाठी लोकसहभाग अधिक मजबूत करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

