नवी मुंबईत सहाव्या अखिल भारतीय भाषा परिषदेचे आयोजन
नवी मुंबई, दि. १४ : मातृभाषेचा अभिमान जपत देशाच्या राजभाषेलाही योग्य स्थान मिळाले पाहिजे, असा सूर नवी मुंबईत झालेल्या सहाव्या अखिल भारतीय भाषा परिषदेत उमटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदीप्रेमाचा उल्लेख करताना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ते हिंदीत संवाद साधतात, तेव्हा भारतीय म्हणून अभिमान वाटत असल्याचे सांगितले. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हिंदी दिवसाच्या निमित्ताने या परिषदेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल उपस्थितांची क्षमा मागत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषेच्या स्वाभिमानापासून आपल्या भाषणाची सुरुवात केली. महाराष्ट्रात या परिषदेचे आयोजन होणे ही विशेष बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वी अशा स्वरूपाच्या परिषदांकडे केवळ औपचारिक उपक्रम म्हणून पाहिले जात होते; मात्र अमित शाह यांच्या पुढाकारामुळे या परिषदेचे आयोजन देशातील विविध राज्यांमध्ये करण्याची दिशा निश्चित झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मातृभाषेसोबत अन्य भाषा शिकण्यावर भर
भाषेच्या विकासासाठी मातृभाषेचे ज्ञान अत्यावश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले. नव्या शिक्षण धोरणात प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर मातृभाषेला महत्त्व देण्यात आले असून, त्यासोबतच अन्य एका भाषेचे शिक्षण घेण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.
भाषेचा सन्मान हा केवळ भावनिक विषय नसून राष्ट्राच्या आत्मविश्वासाशी जोडलेला असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. जागतिक व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदीतून संवाद साधतात, याचा उल्लेख करत त्यांनी “जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदी जातात, हिंदी बोलतात तेव्हा छाती फुगते”, अशी भावना व्यक्त केली.
संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणाऱ्या भारतीय नेत्यांमध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांचाही उल्लेख फडणवीस यांनी केला. विकसित देश आपल्या भाषेतून जगाशी संवाद साधतात, त्यामुळे भारतानेही आपल्या भाषांचा सन्मान आणि वापर वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदीला सर्वसामान्य संवादाची भाषा बनविण्यात साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचे योगदान असल्याचा संदर्भही मुख्यमंत्र्यांनी दिला. ब्रिटिश काळातील प्रशासकीय व्यवहार, हिंदीचा वाढता स्वीकार आणि त्यानंतरच्या काळात हिंदी व इंग्रजीला राजभाषेचा दर्जा देण्याच्या प्रक्रियेचाही त्यांनी उल्लेख केला.
महाराष्ट्र सर्वाधिक बहुभाषिक राज्य : अमित शाह
अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या भाषिक वैविध्याचा विशेष उल्लेख केला. मराठी भाषेबद्दल आदर व्यक्त करताना तिच्या अभिजात भाषेच्या दर्जाचा संदर्भ त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचेही शाह यांनी नमूद केले. “भारतात महाराष्ट्रापेक्षा अधिक बहुभाषिक एकही राज्य नाही”, असे सांगत त्यांनी महाराष्ट्राची बहुभाषिक ओळख अधोरेखित केली.
भाषा ही विविध भागांतील लोकांना जोडण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकते, यासाठी शाह यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा दाखला दिला. विनोबा भावे यांच्या कथनाचा त्यांनी पुढीलप्रमाणे उल्लेख केला, ‘जर मी हिंदीचा वापर केला नसता, तर मी भूदान आणि ग्रामदानचा क्रांतिकारक संदेश घेऊन काश्मीर, आसाम आणि केरळमधील प्रत्येक गावातील माझ्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो नसतो. ती अधिकृत भाषाच होती जिने मला प्रत्येक गावाशी संवाद साधायला शिकवले.’
शिक्षणात मातृभाषेला महत्त्व
नवीन शिक्षण धोरणातील मातृभाषेच्या स्थानाकडेही अमित शाह यांनी लक्ष वेधले. प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर मुलांना मातृभाषेतून शिकण्याला प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“मूल आपली मातृभाषा शिकल्याशिवाय मोठे होऊ शकत नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे मातृभाषा, हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये परस्पर सन्मानाची भावना वाढविणे आवश्यक असल्याचा संदेश या परिषदेतून देण्यात आला.
हिंदी दिवसाच्या निमित्ताने नवी मुंबईत झालेल्या या परिषदेत हिंदीच्या वापरासोबतच भारतीय भाषांचे वैविध्य आणि मातृभाषेचे महत्त्व यावरही चर्चा झाली. महाराष्ट्राच्या बहुभाषिक परंपरेचा संदर्भ देत भाषा ही विविधतेतून संवाद आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्याचे माध्यम ठरू शकते, असा सूर या कार्यक्रमातून पुढे आला.
