राज्यात पुढील आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार
मुंबई, दि. ०१ : महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीदरम्यान सक्रिय झालेला कमी दाबाचा पट्टा (ऑफ-शोअर ट्रफ) तसेच मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातून पसरल्यामुळे राज्यात पुढील काही दिवस पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, दि. ६ जुलै पर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ते बहुतांश भागांत चांगल्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात दि. २ आणि ३ जुलै रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, उर्वरित दिवसांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपसचिव दत्तात्रय कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ ते ४ जुलै या कालावधीत कोकणातील काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दि. २ आणि ३ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानंतर दि. ४ ते ६ जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही अतिवृष्टी होण्याची शक्यता कायम असल्याचे सांगण्यात आले आहे.
याशिवाय दि. ३० जून ते ४ जुलै या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी वीज कडाडत असताना उघड्यावर न थांबणे, झाडांखाली आश्रय न घेणे आणि अनावश्यक प्रवास टाळणे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, शहरी भागातील रस्ते जलमय होणे, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणे तसेच घाटमार्गांवर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विशेषतः घाटमार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रवासापूर्वी संबंधित प्रशासनाकडून वाहतूक आणि रस्त्यांच्या स्थितीची अद्ययावत माहिती घेऊनच प्रवास करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानामुळे समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, तसेच स्थानिक प्रशासन आणि मत्स्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कृषी क्षेत्रासाठीही काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भातशेती आणि भाजीपाला रोपवाटिकांमध्ये साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा तातडीने निचरा करावा, जेणेकरून पिकांचे नुकसान टाळता येईल. तसेच पशुपालकांनी जनावरांना सुरक्षित गोठ्यात ठेवून पाऊस, वीज आणि वादळी वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्था सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत हवामान विभाग आणि प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

