२० ऑगस्टपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची संधी
नवी मुंबई, दि. १५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या पदवीधरांसाठी नवी मुंबईत एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या अभ्यासक्रमासाठी २० ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दोन सत्रांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. शनिवार आणि रविवार या दिवशी वर्ग होणार असून, मराठी तसेच इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याचे मूल्यांकन आणि प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाकडून दिले जाणार आहे.
कोणाला घेता येईल प्रवेश?
या अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली नाही. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे समाजशास्त्र, राज्यशास्त्र किंवा संबंधित विषयांचीच पदवी असणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अभ्यासक्रमाचे वर्ग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सेक्टर-१५, ऐरोली, नवी मुंबई तसेच जे. पी. नाईक भवन, पहिला मजला, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथे आयोजित केले जात आहेत. मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, कलिनाचे संचालक प्रा. वाल्मीक के. सरवदे यांच्या नियंत्रणाखाली हा अभ्यासक्रम सुरू आहे.
अभ्यासक्रमात काय शिकवले जाणार?
अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात सामाजिक न्यायाच्या विचारप्रवाहाबरोबरच डॉ. आंबेडकरांचे सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विचार, आंबेडकरांचे विचार व समकालीन प्रश्न, ‘जातिनिर्मूलन’, डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि संशोधन पद्धतीशास्त्र या विषयांचा समावेश आहे.
दुसऱ्या सत्रात याच विषयांचा पुढील स्तरावरील अभ्यास केला जाणार असून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’, डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचार तसेच नोकरीवरील प्रशिक्षण किंवा क्षेत्रकार्य यांचा समावेश करण्यात आला आहे.
अभ्यासक्रमाची रचना पुढीलप्रमाणे आहे :
पहिले सत्र
- सामाजिक न्यायाचा विचारप्रवाह – भाग १ : ४ श्रेयांक
- डॉ. आंबेडकरांचे सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विचार – भाग १ : ४ श्रेयांक
- आंबेडकरांचे विचार आणि समकालीन प्रश्न – भाग १ : ४ श्रेयांक
- जातिनिर्मूलन : २ श्रेयांक
- डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचार – भाग १ : ४ श्रेयांक (ऐच्छिक विषय)
- संशोधन पद्धतीशास्त्र : ४ श्रेयांक
दुसरे सत्र
- सामाजिक न्यायाचा विचारप्रवाह – भाग २ : ४ श्रेयांक
- डॉ. आंबेडकरांचे सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विचार – भाग २ : ४ श्रेयांक
- आंबेडकरांचे विचार आणि समकालीन प्रश्न – भाग २ : ४ श्रेयांक
- बुद्ध आणि त्यांचा धम्म : २ श्रेयांक
- डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचार – भाग २ : ४ श्रेयांक (ऐच्छिक विषय)
- नोकरीवरील प्रशिक्षण / क्षेत्रकार्य : ४ श्रेयांक
प्रवेशासाठी कुठे संपर्क साधाल?
अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या कार्यालयाशी ९३७२७३४२४७ किंवा ७३५०४०८६८६ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नवी मुंबई महानगरपालिकेचे समाजसेवक श्री. दशरथ गंभीरे यांच्याशी ९७०२३०९०५४ या क्रमांकावरही संपर्क करता येणार आहे.
ऑनलाइन प्रवेशासाठी muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल. तसेच dacfsj.coordinator@mu.ac.in या ई-मेलवर अभ्यासक्रमासंदर्भात माहिती घेता येईल.
प्रवेशाची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२६ असल्याने इच्छुक पदवीधरांनी त्यापूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
