अंबरनाथमधील उसाटणे परिसरात छापा; अवैध इंधन साठवणूक आणि काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
ठाणे, दि. १४ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात उसाटणे परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’च्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने धडक कारवाई करत सुमारे ₹१ कोटी २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध इंधन साठवणूक आणि संभाव्य काळाबाजाराच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे. संबंधित आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
प्राप्त झालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे राज्य दक्षता पथकाने रविवारी अंबरनाथ येथील उसाटणे परिसरातील न्यूओ लॉजिस्टिक पार्कजवळ, राज्यस्तरीय प्लॉट क्रमांक २० समोरील जागेवर छापा टाकला. तपासणीदरम्यान काही टँकरची सील तोडून ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ची बेकायदेशीर साठवणूक आणि देवाणघेवाण सुरू असल्याचे उघड झाले. घटनास्थळी दोन व्यक्ती या व्यवहारात प्रत्यक्ष सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले.
कारवाईदरम्यान पथकाला जीजे-१२ बीवाय-७५६० क्रमांकाचा टँकर पूर्णपणे भरलेल्या अवस्थेत आढळला. या टँकरमध्ये सुमारे २९ हजार ७०० किलो मिक्स हायड्रोकार्बन ऑईल साठवलेले असल्याचे निदर्शनास आले. त्याच ठिकाणी एमएच-४३ ई-१९० क्रमांकाचा आणखी एक टँकर उभा होता. या टँकरमध्ये विद्युत मोटारीच्या साहाय्याने इंधन साठविण्याचे काम सुरू असल्याचेही तपासात स्पष्ट झाले.
याशिवाय एमएच-४६ सी-१२८२ क्रमांकाच्या मालवाहू वाहनात २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बॅरलमध्ये तेलाची साठवणूक सुरू असल्याचे आढळले. वाहनामध्ये २२० लिटर क्षमतेचे २० रिकामे प्लास्टिक बॅरल्सही सापडले. घटनास्थळी जमिनीवर आणखी ८० रिकामे बॅरल्स, एक विद्युत मोटार आणि एअर ऑपरेटेड डायाफ्राम पंपही जप्त करण्यात आला.
अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या इंधन, टँकर, वाहने, बॅरल्स आणि इतर उपकरणांसह एकूण सुमारे ₹१ कोटी २० लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. प्राथमिक चौकशीत संबंधितांकडे आवश्यक परवाने, परवानग्या अथवा वैध कागदपत्रे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अवैध साठवणूक, वाहतूक आणि वितरणाच्या संपूर्ण साखळीचा तपास सुरू करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून इंधन आणि पेट्रोलियमजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहारांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. अशा प्रकारच्या अवैध साठवणुकीमुळे शासनाचा महसूल बुडण्याबरोबरच आग, स्फोट आणि पर्यावरणीय धोके निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे.
या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, इंधनाचा स्रोत, वाहतूक साखळी, खरेदी-विक्री व्यवहार आणि संभाव्य काळाबाजार यांचा तपासही केला जाणार आहे. यामध्ये इतर व्यक्ती किंवा संस्थांचा सहभाग असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ही कारवाई राज्य दक्षता पथकाचे सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी योगेश जंगले, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, रवींद्र राठोड, राजेश सोरते, देवानंद थोरवे, पवन कुंभले, राहुल इंगळे आणि अरुण काते यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
दरम्यान, अवैध इंधन साठवणूक, वाहतूक आणि काळाबाजाराविरोधातील मोहिमा आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती तत्काळ प्रशासन किंवा पोलीस यंत्रणेला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
