पावसाळी आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश
मुंबई, दि. १३ : पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या पूरस्थिती, वाहतूक कोंडी, रेल्वे सेवा विस्कळीत होणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित आणि प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. रेल्वे, महापालिका, बेस्ट, जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो प्रशासन, अग्निशमन दल आणि इतर संबंधित विभागांनी समन्वय साधून सर्वसमावेशक आपत्कालीन आराखडा तयार करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
मुंबईतील रेल्वे हद्दीतील नालेसफाई, मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वे मुख्यालयात आयोजित समन्वय बैठकीत पालकमंत्री ॲड. शेलार बोलत होते. बैठकीस मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक हिरेश मीणा, पश्चिम रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक पंकज सिंग, मुंबई शहर व उपनगरचे जिल्हाधिकारी, रेल्वे, महापालिका आणि अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री शेलार यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यास किंवा पूरस्थिती निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी रेल्वे स्थानकांवर होण्याची शक्यता असते. अशा वेळी प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढणे, स्थानकाबाहेरील वाहतूक सुरळीत ठेवणे, नागरिकांना पिण्याचे पाणी व अन्न उपलब्ध करून देणे, तसेच आपत्कालीन मदत यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करणे यासाठी एकात्मिक कृती आराखडा तयार करावा.
रेल्वे आणि महापालिकेच्या नियंत्रण कक्षांमध्ये अधिक प्रभावी समन्वय असावा, सीसीटीव्ही यंत्रणा, सूचना प्रणाली आणि आपत्कालीन संपर्क व्यवस्था एकमेकांशी जोडली जावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. रेल्वे स्थानकांतील आणि परिसरातील पादचारी पूल, वाहतूक पूल तसेच होर्डिंग्जचे संरचनात्मक परीक्षण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
मस्जिद बंदर परिसरातील रेल्वे हद्दीत असलेल्या धोकादायक ठरलेल्या सुमारे २४ इमारती आणि काही झोपड्यांच्या पुनर्वसनासंदर्भात सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत पश्चिम रेल्वे प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारीची माहिती देताना सांगितले की, चर्चगेट ते विरार मार्गादरम्यान पावसाचे पाणी जलदगतीने बाहेर काढण्यासाठी रेल्वे मार्गाखाली एकूण १५ सूक्ष्म बोगदे तयार करण्यात आले असून त्यापैकी ४ बोगद्यांची कामे यावर्षी पूर्ण झाली आहेत. तसेच पाणी उपसण्यासाठी १२६ पंपांची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे २,४०० वॅगन गाळ काढण्यात आला आहे.
मध्य रेल्वे प्रशासनानेही यावर्षी पावसाळी तयारी अधिक मजबूत केल्याची माहिती दिली. मध्य रेल्वे मार्गावर २२० पंप कार्यान्वित करण्यात आले असून सुमारे ३५० किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गालगत असलेल्या १६० नाले आणि गटारांची साफसफाई पूर्ण करण्यात आली आहे. दोन्ही रेल्वे मार्गांवर पर्जन्यमापक यंत्रणा आणि सीसीटीव्ही प्रणाली बसविण्यात आल्याने हवामान आणि पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
कांजूरमार्ग येथील उषानगर नाला आणि कुर्ला येथील ब्राह्मणवाडी नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने पावसाचे पाणी अधिक वेगाने वाहून जाण्यास मदत होणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनीही आपत्कालीन व्यवस्थापनासंदर्भातील सूचना मांडल्या. मागील काही वर्षांच्या तुलनेत रेल्वे आणि महापालिका प्रशासनामधील समन्वय अधिक प्रभावी झाला असून यावर्षी पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
मान्सून काळात मुंबईसारख्या महानगरात रेल्वे, रस्ते वाहतूक, आपत्कालीन सेवा आणि नागरी सुविधांचे अखंड संचालन महत्त्वाचे असल्याने सर्व विभागांनी परस्पर सहकार्य आणि तांत्रिक समन्वयाच्या माध्यमातून कार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी केले. त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सक्षम ठेवण्याचे निर्देशही दिले.
