पशुधन संरक्षणासाठी ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे पहिल्या टप्प्यात वितरण; हॉटस्पॉट तालुक्यांमध्ये विशेष मोहीम
नाशिक, दि. १४ : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगाच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला गती दिली आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी आवश्यक गोटपॉक्स लसमात्रांच्या उत्पादनाला वेग देण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात एकूण उपलब्ध उत्पादनाच्या ४० टक्के म्हणजेच ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे जिल्हानिहाय नियोजनबद्ध वितरण सुरू करण्यात आले आहे. राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी ही मोहीम युद्धपातळीवर राबवून तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
राज्यात मागील काही वर्षांत लम्पी चर्मरोगामुळे पशुपालकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. दूध उत्पादनात घट, जनावरांच्या आरोग्यावर होणारे परिणाम आणि पशुधन मृत्यूची शक्यता लक्षात घेता या आजाराच्या प्रतिबंधासाठी व्यापक लसीकरण मोहीम हाच सर्वात प्रभावी उपाय मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे येथील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात गोटपॉक्स लसींचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे.
राज्यातील २१ व्या पशुगणनेनुसार जिल्हानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन लसमात्रांचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यांमध्ये लसींचा पुरवठा सुरळीत राहावा आणि लसीकरण मोहिमेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने विशेष नियोजन केले आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. लसींची वाहतूक आणि साठवणूक करताना शीतसाखळी व्यवस्थापन अबाधित राखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. लस प्राप्त होताच अधिक दूध उत्पादन देणाऱ्या तसेच उच्च उत्पादनक्षमतेच्या पशुधनाचे प्राधान्याने लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मोहिमेच्या प्रगतीवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी अहवाल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना लसीकरण मोहिमेचा दैनंदिन एकत्रित अहवाल विहित नमुन्यात दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे लसीकरणाची गती, प्रगती आणि उपलब्धता यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
हॉटस्पॉट तालुक्यांमध्ये विशेष लक्ष
गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून आला होता, त्या हॉटस्पॉट तालुक्यांमध्ये विशेष प्राधान्याने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी या भागांतील पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे.
याशिवाय सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैद्यक, पशुसेवादाते आणि स्थानिक प्रशासन यांचे सहकार्य घेऊन व्यापक जनजागृती केली जात आहे. ग्रामीण भागातील पशुपालकांपर्यंत लसीकरणाचे महत्त्व पोहोचवण्यासाठी विशेष मोहीमही सुरू करण्यात आली आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी पशुधनाचे संरक्षण महत्त्वाचे
पशुसंवर्धन विभागाच्या मते, राज्यातील लाखो शेतकरी आणि पशुपालकांच्या उपजीविकेचा आधार पशुधन आहे. दुग्धव्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पशुधनाचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे लम्पी चर्मरोगासारख्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे.
पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी पशुपालकांना आवाहन करताना सांगितले की, गोटपॉक्स लसीकरण हा लम्पी चर्मरोगावरील सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय असून प्रत्येक पात्र जनावराचे वेळेत लसीकरण करून घ्यावे. तसेच विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करून राज्यव्यापी मोहिम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा.
राज्य शासन आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविण्यात येणारी ही व्यापक मोहीम राज्यातील पशुधन सुरक्षित ठेवण्यास आणि भविष्यातील संभाव्य रोगप्रसार रोखण्यास महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

