तुर्कीयेमधून कुख्यात अमली पदार्थ तस्कर सलीम डोला ला भारतात आणलं; एनसीबीची मोठी कारवाई
नवी दिल्ली, दि. २८ : आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीविरोधातील मोहिमेत भारताला मोठे यश मिळाले असून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने कुख्यात ड्रग तस्कर मोहम्मद सलीम डोला याला तुर्कीयेमधून भारतात परत आणण्यात यश मिळवले आहे. केंद्र सरकारच्या ‘नार्को सिंडिकेटविरोधातील शून्य सहिष्णुता’ धोरणांतर्गत ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली.
एनसीबी ने आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्था, इंटरपोल आणि विविध देशांतील सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने ‘ऑपरेशन ग्लोबल-हंट’ अंतर्गत ही मोहीम राबवली. आज पहाटे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे पोहोचताच एनसीबीने सलीम डोलाला ताब्यात घेतले.
या कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “नार्को सिंडिकेटविरोधात मोदी सरकारची शून्य सहिष्णुता कायम आहे. एनसीबीने तुर्कीयेमधून मोहम्मद सलीम डोलाला परत आणून मोठे यश मिळवले आहे. ड्रग कार्टेल्सना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेत भारतीय यंत्रणांनी जागतिक नेटवर्कच्या माध्यमातून सीमेपलीकडेही आपली पकड मजबूत केली आहे. आता ड्रग माफियांसाठी जगात कुठेही सुरक्षित आश्रयस्थान उरलेले नाही.”
मोहम्मद सलीम डोला हा गेली अनेक वर्षे भारतीय तपास यंत्रणांच्या शोधात होता. मार्च २०२४ मध्ये भारताच्या विनंतीवरून इंटरपोलकडून त्याच्याविरोधात रेड नोटीस जारी करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक अमली पदार्थ तस्करी प्रकरणांमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचा आरोप आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, डोलाने मध्य पूर्व, आफ्रिका आणि युरोपमधील विविध देशांमध्ये अमली पदार्थ तस्करीचे मोठे आंतरराष्ट्रीय जाळे उभे केले होते. हेरॉईन, चरस, मेफेड्रोन, मँड्रॅक्स आणि मेथाम्फेटामाइन यांसारख्या अमली पदार्थांच्या मोठ्या खेपांशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये त्याचे नाव समोर आले आहे. भारतातील विविध वितरण नेटवर्कला मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ पुरवण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुजरात एटीएस आणि मुंबई पोलिस देखील त्याच्या मागावर होत्या. यापूर्वी २०२५ मध्ये त्याचा मुलगा ताहिल सलीम डोला आणि इतर साथीदारांना संयुक्त अरब अमिरातीमधून प्रत्यार्पणानंतर मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
तुर्कीयेतील अधिकारी, इंटरपोल आणि भारतीय तपास यंत्रणांमधील समन्वयामुळे ही कारवाई शक्य झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कविरोधात भारताने उभारलेल्या मजबूत कारवाईचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात आहे.
