महाराष्ट्रात तांदूळ विक्री मोहिमेला वेग; भारतीय अन्न महामंडळाकडून ई-लिलाव आणि विशेष अभियान सुरू
मुंबई, दि. २९ : खुल्या बाजारातील तांदळाचा पुरवठा वाढवून किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाने महाराष्ट्रात मोठी विक्री मोहीम सुरू केली आहे. मुक्त व्यापार विक्री योजना अंतर्गत तांदळाची ई-लिलावाद्वारे तसेच विशेष समर्पित अभियानाच्या माध्यमातून विक्री करण्यात येत असून व्यापारी, घाऊक खरेदीदार आणि उत्पादकांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाकडून ऑगस्ट २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बाजारात तांदळाचा पुरेसा पुरवठा उपलब्ध राहावा आणि वाढत्या किमतींना आळा बसावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
तांदळाच्या खरेदीसाठी इच्छुक असलेल्या व्यापाऱ्यांनी एफसीआयच्या ई-लिलाव सेवा प्रदाता एमजंक्शन सर्विसेस लिमिटेड यांच्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी अर्ज केल्यानंतर सुमारे ७२ तासांत नोंदणी पूर्ण केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
२९ आणि ३० एप्रिल रोजी होणाऱ्या नियोजित ई-लिलावामध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल १० हजार मेट्रिक टन तांदळाची विक्री केली जाणार आहे. या ई-लिलावात प्रति ग्राहक किमान १ मेट्रिक टन आणि कमाल ७ हजार मेट्रिक टन तांदूळ खरेदी करता येणार आहे.
याशिवाय, विशेष समर्पित अभियानांतर्गत आणखी ५० हजार मेट्रिक टन तांदूळ आणि ४० हजार मेट्रिक टन बिगर एफआरके कस्टम मिल तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या तांदळामध्ये पंजाबमधील १० हजार मेट्रिक टन आणि आंध्र प्रदेशमधील ३० हजार मेट्रिक टन तांदळाचा समावेश आहे. या श्रेणीत सहभागी होणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांसाठी किमान खरेदी मर्यादा २ हजार ६५० मेट्रिक टन निश्चित करण्यात आली आहे.
लिलावात यशस्वी झालेल्या खरेदीदारांना संबंधित महाव्यवस्थापकांना तांदूळ ज्या रेल्वे स्थानकावर प्राप्त होणार आहे, त्याची माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. अन्नधान्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बाजारपेठेत पुरवठा साखळी मजबूत ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. खुल्या बाजारात तांदळाचा पुरवठा वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळेल आणि किमती स्थिर ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
