नागपुरात बागेश्वर बाबा विरुद्ध अंनिस संघर्ष तीव्र
नागपूर, दि. २९ : धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा आणि श्याम मानव यांच्यातील वाद पुन्हा एकदा चांगलाच तापला असून नागपुरात दोन्ही बाजूंनी एकमेकांना खुले आव्हान देण्यात आले आहे. बागेश्वर बाबांनी व्हिडिओ संदेशाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला थेट आव्हान दिल्यानंतर अंनिसचे संस्थापक सदस्य श्याम मानव यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत बाबांना पत्रकारांसमोर तथाकथित चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे.
नागपुरात आयोजित दरबाराच्या पार्श्वभूमीवर बागेश्वर बाबा यांनी व्हिडिओद्वारे म्हटले की, “प्रदेश तुमचा आहे, मंचही तुमचाच आहे. ज्यांना काही खाज असेल त्यांनी माझ्या दरबारात यावे.” आपण कोणाकडेही जाणार नसून नागपुरात दोन दिवस दरबार भरवून तेथेच सर्व सादरीकरण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “३० तारखेनंतर बाबा पळून गेला असे कोणी म्हणू नये,” असे म्हणत त्यांनी २०२३ मधील जुन्या वादाचाही उल्लेख केला.
दरम्यान, श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांवर कठोर टीका करत त्यांना “ढोंगी” संबोधले. बाबांकडे कोणतीही दैवी शक्ती नसून ते लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बागेश्वर बाबांना सार्वजनिकरीत्या आपले दावे सिद्ध करण्याचे आव्हान दिले.
श्याम मानव म्हणाले की, बागेश्वर बाबांनी पत्रकार आणि जनतेसमोर दहा अनोळखी व्यक्तींची अचूक माहिती सांगून दाखवावी. शेजारच्या खोलीतील वस्तू, भक्तांची नावे, मोबाईल क्रमांक तसेच त्यांच्या घरातील वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, हे अचूक ओळखून दाखवावे. जर हे सिद्ध झाले, तर त्यांना ८० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
याचबरोबर मानव यांनी आणखी एक मोठी घोषणा करत म्हटले की, “जर बाबांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी ९० टक्के उत्तरे अचूक दिली, तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमची बंद करू आणि त्यांचे कायमस्वरूपी भक्त बनू.”
दरम्यान, नागपुरातील या वादामुळे धार्मिक श्रद्धा आणि अंधश्रद्धा विरोधी चळवळ यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सामाजिक माध्यमांवरही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून समर्थक आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि बागेश्वर धाम समर्थक यांच्यातील हा वाद आगामी दिवसांत आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
