जाहिरात दुरुस्त करण्याचे मंत्री डॉ. अशोक ऊईके यांचे आदेश
मुंबई, दि. २९ : आदिवासी विकास विभागाच्या नाशिक आयुक्तालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या चौकीदार भरती जाहिरातीमध्ये अनुसूचित जमाती संवर्गासाठी एकही पद राखीव नसल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप केला आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाहिरात दुरुस्त करून सुधारित जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
२७ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीबाबत विविध स्तरांवरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अनुसूचित जमाती समाजातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप झाल्यानंतर मंत्री डॉ. ऊईके यांनी विभागाचे सचिव आणि आयुक्त यांच्यासोबत तातडीची व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक घेतली. या बैठकीत २० नोव्हेंबर २०२५ च्या शासन निर्णयातील तरतुदींचा आढावा घेऊन जाहिरातीत आवश्यक दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले.
मंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी स्पष्ट केले की, चौकीदार भरती प्रक्रियेसाठी शुद्धीपत्रक जारी करण्यात येणार असून अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी योग्य त्या प्रमाणात पदे राखीव ठेवली जाणार आहेत. तसेच अट्रॉसिटी कायद्यांतर्गत पीडितांच्या वारसांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यासोबतच आदिवासी विकास विभागातील वर्ग-४ मधील तब्बल १५१ पदे पुनरुज्जीवित करण्यात येणार असून, विशेष बाब म्हणून या पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सुधारित प्रक्रियेत अनुसूचित जमाती संवर्गासाठी आरक्षण सुनिश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे आदिवासी समाजात निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी विभागाकडून सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. “अनुसूचित जमाती उमेदवारांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन मंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी केले. राज्य सरकारच्या या हस्तक्षेपामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि आरक्षणाच्या नियमांचे पालन सुनिश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
