केसपेपर विभाग अंधारात तर कुठे पान-गुटख्याने लालेलाल झालेल्या भिंती रुग्णालयाची ‘शोभा’ वाढवतायत
पनवेल, दि. २६: वेळ अंदाजे सायंकाळी ५ वाजताची. “गुमनाम है कोई, बदनाम है कोई…कीस को खबर कौन है वो, अंजान है कोई…” पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत शिरताच भोवतालचं भयाण वातावरण पाहून १९६५ सालच्या ‘गुमनाम’ या चित्रपटातलं भय रसातलं हे गाणं मनात भुणभूणायला लागतं. बऱ्याच अंशी बंद असलेल्या अथवा अपुरा प्रकाश देणाऱ्या लाईट्स, रुग्णालयाची अंतर्गत रचना, रंग संगती, एक ठेवणीतला दर्प मन आणखी विषण्ण करतो. बरं, ज्या ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जातात, त्यांची शुश्रुषा केली जाते त्या वॉर्डसची परिस्थितीही काही वेगळी नाही. येथेही बऱ्याच ट्यूब लाईट्स बंद असल्यामुळे आतलं वातावरण एवढं उदासवाणं कि, जगण्याची उमेद सोडून नैराश्यापोटी रुग्णाने थेट शवागारातल्या पेट्यांमध्येच निजावं. मुळात सरकारी रुग्णालयं उभारताना ती भयाणंच वाटायला हवीत या हेतूनेच त्यांची रचना केली जाते की काय अशी शंका यावी.
केस पेपर विभागात मागील अनेक दिवसांपासून अंधाराचं साम्राज्य
२०१९ साली कार्यान्वित झालेल्या महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचं हे वर्णन जरा अतिशयोक्तीपूर्ण वाटत असलं तरी सत्य आहे. उपलब्ध माहितीनुसार, १२० खाटांच्या या रुग्णालयात २० खाटा या ट्रौमा सेंटरसाठी राखीव असून १० वेंटीलेटर आणि १० डायलिसीस मशिनची ही व्यवस्था करण्यात आली होती.
या रुग्णालयात प्रवेश केल्यावर अनेक ठिकाणी पान-गुटख्याच्या पिचकारीने रंगलेल्या भिंती, कोपरे तुमचं प्रामुख्याने लक्ष वेधून घेतात. पण या साऱ्यावर कहर म्हणजे, केस पेपर काढण्यासाठी जिन्याखाली उभारण्यात आलेलं एक अंधारं खोपटं. ज्यासमोर तुम्हाला केस पेपर काढण्यासाठी रांगेत उभे असलेले रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक दिसतील. या जागेत मागील अनेक दिवसांपासून लाईटच नसल्याची बाब महाराष्ट्र वार्ताच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आली आहे. येथील कर्मचारी चक्क पूर्ण वेळ अंधारात काम करत असून कित्येकदा कागदावरील मजकूर वाचण्यासाठी मोबाईलच्या टॉर्च चा वापर त्यांना करावा लागतोय. या ठिकाणी खिडकीसमोर उभ्या राहणाऱ्या लोकांपेक्षा खिडकीपलीकडे अंधारकोठडीत कॉम्पुटर स्क्रीनवर डोळे फोडून रुग्णाचे तपशील नोंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय जास्त होतेय. याच सोबत अंधारामुळे जर रुग्णाचे चुकीचे तपशील संगणकात नमूद झाले तर मोठ्या मनःस्तापाचा सामना रुग्णाला करावा लागू शकतो.
साधारणपणे कोणताही रुग्ण बारा होण्यामागे योग्य उपचारांसोबत त्या रुग्णालयातील स्वच्छता, प्रसन्न वातावरण यांचाही मोठा वाटा असतो. पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयातील वातावरण पाहून आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला जातो का याबाबत शंकाच आहे. शिवाय, रुग्णालयाच्या डागडुजीसाठी मिळणाऱ्या पैशांचा योग्य विनियोग केला जातोय असं म्हणण्याची सोय नाही. हे पैसे कोणाकोणाच्या खिशात जातात हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. शासनाच्या इतर विभागांप्रमाणे आरोग्य विभागालाही भ्रष्टाचाराच्या अजगराचा विळखा पडलाय हे उघड गुपित आहे.
हे चित्र पालटण्यासाठी आगामी काळात, महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शिवाजी पाटील काही विशेष प्रयत्न करतात का हे पाहणे लक्षणीय ठरेल.
तुमच्याही प्रशासनाविरोधात काही तक्रारी असतील अथवा गैरकारभार, आर्थिक घोटाळे आदींबाबत तुमच्याकडे ठोस माहिती असेल तर ती पुराव्यांसह आम्हाला 8850303463/9372236332 वर व्हॉटसप्प व news@maharashtravarta.com वर ईमेल मार्फत पाठवू शकता.
