सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना स्पष्ट दिसत असतानाही मोबाईल फोन पडून गहाळ झाल्याच्या खोट्या तक्रारीची पोलिसांकडून नोंद
पनवेल Panvel, दि. ४: आजकाल मोबाईल फोन चोरीला जाण्याच्या बातम्या वरचेवर कानावर पडत असतात. बहुतेकदा चोरीला गेलेला मोबाईल हा परत सापडतंच नाही. यामागे अनेक कारणं असतात. त्यातल्या त्यात मुख्य कारणं म्हणजे पोलिसांत उशिरा तक्रार दाखल केली जाणे, आणि जरी वेळेत तक्रार दाखल केली तरी पोलिसांकडून युद्ध पातळीवर तपासकाम न होणे अशी आहेत. नुकतीच पनवेल येथे घडलेली मोबाईल चोरीची घटना आणि त्यानंतरचा पोलिसांचा कारभार याच प्रकारात मोडणारा आहे. सोमवार दिनांक ३० जून २०२५ रोजी पनवेल येथील शिवाजी चौकाजवळील एका डायग्नोस्टिक सेंटर मधून एक सोडून तब्बल दोन मोबाईल फोन चोरीला गेले. बरोबर ११ वाजून ४९ मिनिटांनी एका इसमाने या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये प्रवेश केला व मोजून पंधरा मिनिटांत म्हणजेच १२ वाजून ४थ्या मिनिटाला रिसेप्शन काउंटरवर ठेवलेला ऍपल कंपनीचा आय फोन व ओप्पो कंपनीचा एफ १७ प्रो असे एकूण दोन मोबाईल फोन लंपास केले. हे दोन्ही फोन इथे कामाला असेलल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या मालकीचे होते. हि बाब जेव्हा या महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात आली तेव्हा तिने आपल्या पतीसह थेट पनवेल शहर पोलीस स्थानक गाठले.
“फोन हरवला असू दे किंवा चोरी होऊदे दोघांना एकच कायदा लागतो” – पोलीस उप निरीक्षकाने तोडले तारे
पनवेल शहर पोलीस स्थानकात गेल्यावर या महिलेने चोरीचा सर्व घटनाक्रम उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सांगितला सोबतीला घटना घडली त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे बिल, आयएमईआय (IMEI) क्रमांक असे सर्व तपशील ही पुरवले. काही वेळाने पोलिसांनी महिलेला नोंद झालेल्या तक्रारीची प्रत दिली व पोलीस तपासाला सुरुवात करत असून लवकरच तुम्हाला तुमचे दोन्ही मोबाईल फोन मिळतील असे आश्वासन दिले. पनवेल शहर पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर महिलेने व तिच्या पतीने नोंद केलेल्या तक्रारीची प्रत वाचली असता त्यांना धक्काच बसला. कारण पोलिसांनी मोबाईल फोन चोरीला गेल्याचा रीतसर दखलपात्र गुन्हा(FIR) नोंदवून घेण्याऐवजी ‘हरवलेल्या मालमत्तेची नोंदणी’ (Registration of Lost of Property) अंतर्गत तक्रारीची नोंद केली. शिवाय या तक्रारीत धडधडीत खोटे लिहिले आहे कि महिलेचे दोन्ही मोबाईल फोन त्या काम करत असेलल्या ठिकाणी पडून गहाळ झाले आहेत. यावेळी त्यांनी तात्काळ पनवेल शहर पोलीस स्थानकात जात चौकशी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय अस्पतवार(Sanjay Aspatwar Police Sub-Inspector) यांना अशी खोटी व चुकीची तक्रार का नोंदवून घेतली म्हणून जाब विचारला. तर त्यांनी आपल्याला “फोन हरवला असू दे किंवा चोरी होऊदे दोघांना एकच कायदा लागतो” असे सांगत गुंडाळलं असं महिलेचं म्हणणं आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून सदर महिला व तिचे पती पनवेल शहर पोलीस स्थानकाच्या फेऱ्या मारत आहेत. पोलीस त्यांना तपास चालू आहे, लवकरच तुम्हाला तुमचे मोबाईल मिळतील असं ठेवणीतलं उत्तर देत आहेत.
मोबाईल चोरीच्या या प्रकरणात मुळात पोलिसांनी तक्रारच चुकीच्या प्रकारे नोंदवलेली आहे. पोलिसांनी रीतसर महिलेचा जबाब नोंदवून घेत, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी तपशिलांसह दखलपात्र गुन्ह्याची(FIR) नोंद करणे गरजेचे होते. कारण हे प्रकरण चोरीचे आहे व हा सगळा घटनाक्रम तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. एवढे स्पष्ट पुरावे असतानाही जबाबदार पोलीस अधिकारी असे कसे वागू शकतात हा मोठा सवाल आहे. शिवाय, त्याहून महत्वाची बाब म्हणजे हि चोरीची घटना घडल्यानंतर पुढच्या अवघ्या काही तासांतच पोलिसांना आरोपीचा माग काढणं व चोरलेले दोन्ही मोबाईल हस्तगत करणं शक्य होतं. कारण, या आरोपीचा चेहरा सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतोय. आरोपीने चोरीनंतर मोबाईल जरी बंद ठेवला असला तरीही परिसरातील व पनवेल शहरभर सरकारतर्फे बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मार्फत पोलिसांना या आरोपीपर्यंत सहज पोहोचता आलं असतं यात काही शंका नाही. पनवेल शहर पोलिसांकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यामुळे सदर महिलेने नवी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस आयुक्त ते थेट राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त या प्रकरणी तात्काळ कारवाई करणार का?
राज्याचं पोलीस खातं नक्कीच सक्षम आहे, यात काही दुमत नाही. परंतु, पोलीस स्थानकात आपली तक्रार घेऊन आलेल्या माणसाला टाळता कसं येईल याचाच विचार जर पोलीस कर्मचारी-अधिकारी करत असतील तर मग न्याय मागायचा कोणाकडे. बरं आज तंत्रज्ञानाची साथ पोलिसांना लाभतेय त्यामुळे बऱ्याच गुन्ह्यांची उकल करणं तसंच आरोपींपर्यंत वेळेत पोहोचणं पूर्वीच्या मानाने पोलिसांना शक्य आहे. सध्या महाराष्ट्राचा गृह विभाग “विकसित महाराष्ट्र २०४७” अंतर्गत नागरिकांचा पोलीस व्यवस्थेवर अभिप्राय घेत आहे. या मोहीमे मागे पोलिसांची कार्यपद्धती सुधारणे हा हेतू असल्याचे सांगितले जातेय. परंतु, पोलिसांची कार्यपद्धती सुधारण्यासाठी, हा असा फार्स करण्यापेक्षा पोलीस यंत्रणेतीलच सक्षम अधिकाऱ्यांची फौज उभारून त्यांच्याकडूनच प्रशिक्षण, विद्यमान यंत्रणेचे परीक्षण व संशोधन केले गेले तर नक्कीच दखल घेण्याजोगे बदल घडतील इतकं नक्की. तूर्तास या मोबाईल चोरीच्या प्रकरणात चोराचा माग काढणे व खोटी तक्रार नोंदवून घेणाऱ्या पनवेल शहर पोलीस स्थानकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी जर वेळेत योग्य ती कारवाई केली नाही तर सबंध पोलीस दलासाठी हि घटना एक लांच्छन ठरेल इतकं नक्की.
* Photo Credit – NM Police Website
