क्षमतावृध्दी कार्यशाळेतून नमुंमपा अधिकारी-कर्मचारी यांना ए.आय.सह अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार्यालयीन कामकाज व तणावरहित आरोग्यपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन
नवी मुंबई, दि. १२: सर्वच क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून या बदलांचा अंगिकार करीत स्वत:ला अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज आहे. विविध विषयांवरील तज्ज्ञांच्या माहितीप्रद व्याख्यानांतून मिळणा-या ज्ञानाचा उपयोग संस्थेच्या प्रगतीसाठी अधिकारी, कर्मचारी यांनी करावा आणि यामधून जनतेला अधिक उत्तम रितीने सेवा पुरविण्यासाठी कृतीशील व्हावे.
नावातच नाविन्य असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या सेवासुविधांची गुणवत्ता उंचावत राहिल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचाविल्या असून त्यांची पूर्तता करताना अधिक जोमाने व सुनियोजितपणे काम करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन या कार्यशाळेचे आयोजन केले होते. प्रत्येक विभागाने वर्षभरात करावयाच्या आपापल्या कामाची रूपरेषा ठरवून घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी असे सांगतानाच कार्यालयीन स्वच्छतेअंतर्गत आत्ता केलेली अभिलेखाचे निंदणीकरण, नष्टीकरण व जतन ही कार्यवाही करण्याचा प्रत्येक वर्षीचा वेळ निश्चित करावा व त्यानुसार कार्यवाही करावी असे त्यांनी निर्देशित केले. आपण करीत असलेल्या प्रत्येक कामात सुधारणा करण्याची दृष्टी ठेवावी हे सांगताना नव्या तंत्रज्ञानाचा अंगिकार करावा हे आयुक्तांनी प्रामुख्याने सांगितले.
सध्या कृत्रिम बुध्दीमत्ता अर्थात ए.आय. चा वापर सुरू झाला असून यापुढील काळात ए.आय.चा वापर सर्वच क्षेत्रात प्रभावीपणे होणार आहे. त्यादृष्टीने नमुंमपा अधिकारी यांनी ए.आय. तंत्रप्रणालीचा कार्यालयीन कामकाजात वापर करावा या उद्देशाने विजयभूमी विद्यापीठाचे संचालक तथा ए.आय.तज्ज्ञ डॉ. अर्पित यादव आणि असोसिएटस डीन डॉ.सालुर पटनाईक यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी ए.आय. तंत्रज्ञानाची विस्तृत माहिती देत प्रात्यक्षिकासह ए.आय.वापराचा सराव करून घेतला. याकरिता प्रशासन विभागाने उपस्थित राहणा-या सर्वांना आधीच सोबत लॅपटॉप अथवा टॅब घेऊन येण्याची सूचना दिली होती.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी सादरीकरणाव्दारे अर्थसंकल्पानुसार प्रत्येक विभागाने जमा व खर्चाच्या बाजूच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजन पध्दतीची सविस्तर माहिती दिली. आयुक्त महोदयांनी अर्थसंकल्पात मांडलेले 147 संकल्प हे नवी मुंबई शहराचे व्हिजन असून त्यानुसार कार्यवाही करण्याचे त्यांनी सूचित केले.
दुस-या सत्रात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते, उद्याने, पाणीपुरवठा आदी सोयी सुविधांच्या दर्जा नियंत्रणासाठी विकसित दक्ष अॅपची माहिती देणारे सादरीकरण नानासाहेब जाधव यांनी केले. यामध्ये त्यांनी थेट प्रक्षेपणात्मक सादरीकरण करून दक्ष ॲपची कार्यप्रणाली समजून सांगितली. या ॲपचा प्रभावी उपयोग करून आपल्या कामात सुधारणा घडविण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना आयुक्तांनी केली. न्यूट्रिशिअन तज्ज्ञ शिल्पी मल्होत्रा यांनी आरोग्याची काळजी घेणे ही आपली प्रधान जबाबदारी असल्याचे सांगत आजारपणाला दूर ठेवण्यासाठी करावयाचे दैनंदिन व्यायाम, योगासने, आहार याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या मनातील शंकांचे समाधान केले.
संमोहन तज्ज्ञ नवनाथ गायकवाड यांनी अत्यंत दिलखुलास शैलीत स्वयं व्यवस्थापन आणि क्षमता वृध्दी या विषयावर उपस्थितांशी हसत-खेळत संवाद साधत ताणतणाव विरहित जीवनाचे महत्व सांगितले तसेच त्यासाठी करावयाच्या छोट्या छोट्या गोष्टींची प्रात्यक्षिके करून घेतली. उपस्थितांना प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी करून घेत त्यांनी सभागृह भारून टाकले.
नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या दररोजच्या व्यस्त कार्यालयीन वातावरणामध्ये काहीसा बदल घडवून त्यांना क्षमतावृध्दी कार्यशाळेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अनुभवसंपन्न तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळावा यादृष्टीने नेरूळ येथील कोर्टयार्ड हॉटेलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता कोर्टयार्डमार्फत सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते.
अधिकारी – कर्मचारी यांना बदलत्या तंत्रज्ञानाशी जोडून कार्यालयीन प्रणालीत अधिक सुनियोजिता व कामात गतीमानता आणणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य असून ही नागरिकांना अधिक उत्तम रितीने सेवा पुरविण्यासाठी महत्वाची बाब आहे हे लक्षात घेत क्षमतावृध्दी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा लाभ निश्चितच नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाला होईल व यातून त्यांची कार्यक्षमता वाढीस लागेल. नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा अंगिकार नियमित कामकाजात केला जाईल व त्याव्दारे सेवा गुणवत्तेत वाढ होईल. आणि याचा लाभ नागरिकांना होऊन महानगरपालिकेची प्रतिमा उंचावेल असा विश्वास व्यक्त करीत 100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत आयोजित क्षमतावृध्दी कार्यशाळेसारखे उपक्रम यापुढील काळातही वेगवेगळ्या विषयांवर आयोजित केले जातील असे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
