Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वाचा वीर सावरकरांनी सांगितलेला संस्कृतिरक्षणाचा खरा अर्थ आणि यज्ञकर्म

न उलगडलेले अपरिचित असे विज्ञाननिष्ठ सावरकर (भाग १)

सध्या देशात पुरोगामी आणि सनातनी असे दोन गट पडलेले दिसत आहेत. यात बरेच तथाकथित संस्कृतीरक्षक नवनवे फतवे काढत आहेत. सावरकरांच्या निबंधातील हा भाग या सनातनी व पुरोगामी या दोहोंसाठी. सनातनी सावरकरांचे विचार न समजता आंधळेपणाने फक्त अनुनय करत आहेत तर पुरोगामी गट सावरकरांबाबत सावध भूमिका घेत दोन हात लांब थांबत आहेत. तसे पाहायला गेले तर हे दोनही गट सारखेच अंधारात चाचपडत आहेत. खुलेपणाने विचारांची चिकित्सा करण्यासाठी कचरत आहेत. येत्या काळातील ही लेखमाला या दोहोंसाठी.

विज्ञाननिष्ठ निबंध (१)

संस्कृतिरक्षणाचा खरा अर्थ आणि यज्ञकर्म

संस्कृतिरक्षणाचा खरा अर्थ, प्राचीन काळी वेळोवेळी ज्या ज्या उलटसुलट प्रथा त्या काळच्या ज्ञानाज्ञानाप्रमाणे ‘संस्कृत’ वाटल्या त्या साऱ्यांची तशीच्या तशी पुनरावृत्ती करणे, त्या रूढी आज व्यर्थ वा विक्षिप्त वा विघातक ठरत असल्या तरीही त्या तशाच चालू ठेवणे, हा नव्हे. जी वेदकाळची रूढी किंवा आचारात्मक धर्म आज विज्ञानाच्या दिव्यतर प्रकाशात समाजघातक रोगाणूनी लडबडलेला दिसतो ती ती रूढी वा आचार आजच्या संस्कृतीत न मोडता दुष्कृतीतच मोडला पाहिजे. मग तो प्राचीन काळी लोकांना परवडला असो वा नसो, संस्कृत वाटला असो वा नसो. आज जे संस्कृत म्हणून अभिमानाने राक्षवयाचे ते, प्राचिनातले आजही संस्कृती ठरणारे, मनुष्यास हितकारक असणारे, तेवढे तेवढेच काय ते होय.

प्राचिनातले जे आजही उत्तम अनुकार्य, उदात्त, अपेक्षणीय, प्रगत नि प्रबुद्ध ठरते ते ते आजचे संस्कृत, ते ते रक्षिणे म्हणजे खरे खरे संस्कृतिरक्षण होय. तसे प्राचीन संस्कृतिरक्षण हे आजचे कर्तव्य होय, प्राचीन दृष्कृतिरक्षण हे नव्हे.

त्या संस्कृतिरक्षणाच्या कर्तव्याहूनही पुढचे कर्तव्य म्हणजे संस्कृतीविकसन! प्राचिनातले जे आजच्या विज्ञानातही संस्कृत वाटते ते राक्षूनच चालणार नाही तर त्यात नवीन सत्याची नी यथ्याची भर टाकून संस्कृतीवर्धन केले पाहिजे. ते मुख्य कर्तव्य! त्यास जे अडथळा करील, त्या कसोटीस जे हिणकस ठरेल त्यास त्यागिणे म्हणजे संस्कृतिरक्षण, संस्कृतीविकसन.

यज्ञसंस्था त्या कसोटीस आज हिणकसच ठरते. लाखो मनुष्ये नाचण्याच्या अंबिलीचा भुरकाही मिळेना म्हणून ज्या राष्ट्रात पटापट भुकेने मरताहेत त्या राष्ट्रात प्रत्यक्ष लाभत अगदी कुचकामाच्या ठरलेल्या ह्या यज्ञसंस्थेस संस्कृती म्हणून आगीचे डोंबाळे भडकावून त्यात खंडोगणती अन्नाचे ढीग नी मणोगणती तुपाचे हौद समंत्रक समारंभपूर्वक जाळीत बसणे म्हणजे, नकळत आगलावेपणा होत आहे; संस्कृतिरक्षण नव्हे!

तरीही यज्ञाचे कर्मकांड होते तरी कसे इतकेच ऐतिहासिक दृष्टीने विस्मरू द्यावयाचे नसेल तर ऐतिहासिक संग्रहालयात ब्राह्मणे नि मीमांसादिक ग्रंथरक्षण केले की पुरे. त्याहीपेक्षा प्रत्यक्ष यज्ञ सदा पेटवलेला नी मंत्रघोष चाललेला पिढ्यान पिढ्या दाखवण्याची उत्कृष्ट सोय विज्ञानाने केली आहे! एकेका यज्ञाचा एकेक बोलपट एकदा केव्हातरी काढून ठेवला की पुन्हा तुपाचा एक बिदुही न दवडता वाटेल तेव्हा यज्ञ चाललेला प्रत्यक्ष पाहता येईल.

©स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

(विज्ञाननिष्ठ सावरकर, PDF page – 47)

(विशेष धन्यवाद – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *