Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राजकीय शिमग्यात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची जयंती विसरलात का? वाचा त्यांच्या बद्दल

राजकीय शिमग्यात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची जयंती विसरलात का? वाचा त्यांच्या बद्दल

वासुदेव बळवंत फडके ( ४ नोव्हेंबर १८४५ – १७ फेब्रुवारी १८८३). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचा एक आद्य प्रवर्तक. फडक्यांचे मूळ घराणे कोकणातील केळशी (रत्नागिरी जिल्हा) येथील. वासुदेवांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. दोन-तीन दिवस किल्ला तटवून अगतिक झाल्यावरच त्यांनी किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला. किल्ल्याजवळ असलेल्या पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण ता. पनवेल (रायगड) गावी पुढे फडके कुटुंबाचे वास्तव्य झाले. बळवंतरावांचा मुलगा वासदेव. त्याचा जन्म शिरढोण येथेच झाला.

सातव्या वर्षापासून त्याच्या शिक्षणास सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. १८५५–६० या पाच वर्षांत माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले. घरगुती अडचणींमुळे म्हणा किंवा शिक्षणाची आवड बेताची असल्यामुळे म्हणा; पण वासुदेवाने इंग्रजी पाचवीनंतर शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली. पहिली नोकरी जी. आय्. पी. रेल्वेत केली.

वरिष्ठांपुढे उगाच विनम्र होण्याचा गुण अंगी नसल्यामुळे त्यांची रेल्वेमधली नोकरी सुटली व नंतरची ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही फार दिवस टिकली नाही. शेवटी १८६३ मध्ये वासुदेव बळवंत लष्कराच्या हिशेबी खात्यात आले. त्यात ते २१ फेब्रुवारी १८७९ पर्यंत म्हणजे बंडाचा बावटा उभारीपर्यंत राहिले.

मुंबईहून त्यांची बदली १८६५ साली पुणे येथे झाली आणि पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली. कचेरीतील वातावरण यांत्रिक आणि वासुदेव बळवंताची वृत्ती तर अत्यंत संवेदनशील आणि बेगुमान. वेळेवर रजा मंजूर न झाल्यामुळे आजारी आईची भेट झाली नाही, तेव्हा वासुदेव बळवंतांनी वरिष्ठांपर्यंत आपली तक्रार नोंदविली. त्यांच्या आयुष्याला क्रांतिकारक वळण लावणारी ही एक महत्त्वाची घटना होय.

पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना १८७१ मध्ये झाली व तिच्या मार्फत महादेव गोविंद रानड्यांची स्वदेशी चळवळीवर दोन व्याख्याने झाली. ही व्याख्याने आणि देशी वर्तमानपत्रांचा प्रचार यांनी फडक्यांच्या क्रांतिकारक वृत्तीला खतपाणी पुरविले. ते पुण्यात देशभक्तिपर व्याख्याने देऊ लागले.

१८७६–७८ या दरम्यान महाराष्ट्रात मोठे दुष्काळ पडले. त्यातच प्लेग-पटकींसारख्या साथीच्या रोगांची भर पडली. गोरगरिबांचे पाण्याचे आणि खाण्याचे फार हाल झाले. शेतकऱ्यांची गुरेढोरे मेली आणि सर्वत्र मोठा हाहाःकार उडाला. वासुदेव बळवंतांनी पुणे, नगर, नासिक या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली.

या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे, त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला. एकाच वेळी सर्व ठिकाणी उठाव व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे साथीदार त्यांना मिळाले नाहीत. शिवाय पांढरपेशा सुशिक्षित वर्गात त्यांना पाठिंबा मिळेना; तेव्हा मागासवर्गातील रामोशी, धनगर अशांकडे ते वळले आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही मोहीम हाती घेतली.

पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. सरकारी खजिने, सावकार, बनिये यांच्यावर धाडी घालण्याच्या योजना आखण्यात आल्या. शासनाची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वे, तुरुंग, तार आणि टपाल कचेऱ्या उद्ध्वस्त करण्याचे ठरले. २२ फेब्रुवारी १८७९ रोजी संध्याकाळी रामोशांच्या मोठ्या जमावाला जेवण घालण्यात येऊन कोणास चांदीचे कडे, तर कोणास शेलापागोटे, कोणाच्या हातावर पाच-दहा रुपये ठेवण्यात आले आणि जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड उभारल्याचे जाहीर करण्यात आले.

पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी, दावडी, वाल्हे, हर्णे, सोनापूर, चांदखेड इ. सह्याद्रीच्या कुशीतील गावे लुटली. सावकार लुटून पैसा उभारावयाचा आणि नव्या टोळ्या उभारून सरकारला ‘त्राही भगवन’ करून सोडावयाचे, असा वासुदेव बळवंतांचा विचार होता. रामोशी लुटालूट करण्यात निष्णात होते; पण पैशापलीकडे त्यांना राष्ट्रभक्ती, देशप्रेम इ. काही ठाऊकच नव्हते. जी लूट मिळाली, ती घेऊन ते आपापल्या गावी पांगले. मार्चच्या शेवटी वासुदेव बळवंतांजवळ जेमतेम दहा–पंधरा रामोशी उरले.

हताश अंतःकरणाने वासुदेव बळवंत पुण्यास परतले. तेथून उरळी कांचनला जाऊन त्यांनी रेल्वेमार्गाने सोलापूर गाठले. पुढे ते गाणगापूर मार्गे श्रीशैलम् येथील श्री मल्लिकार्जुनाच्या पवित्र मंदिरात विपन्नावस्थेत गेले. तेथे मल्लिकार्जुनास आत्मसमर्पण करण्याचे त्यांनी ठरविले (१७ एप्रिल १८७९). त्याच दिवशी वासुदेव बळवंतांनी आपल्या आत्मचरित्रलेखनास सुरुवात केली. या सुमारास त्यांना रघुनाथ मोरेश्वर भट नावाचे गृहस्थ भेटले व त्यांनी मदतीचा हात पुढे केला.

त्यामुळे वासुदेव बळवंतांनी आत्मसमर्पणाचा विचार सोडून दिला व पुण्याकडे जाण्याचे ठरविले. दरम्यान रघुनाथ भटांनी इस्माईल खान या रोहिल्यांच्या पुढाऱ्याशी त्यांचा परिचय करून दिला. सु. ५०० रोहिले इस्माईल खानसह त्यांना येऊन मिळाले. शिवाय रघुनाथ भटाने आणखी काही माणसे मिळवून दिली. अशा प्रकारे सु. ९०० माणसांचे पाठबळ वासुदेव बळवंतांना प्राप्त झाले.

वाटाघाटी पुऱ्या होणाच्या आधीच वासुदेव बळवंत गाणगापुरास आहेत, ही बातमी ब्रिटिश सरकारच्या कानावर गेली. सरकारने त्यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले आणि मेजर डॅन्यीएलला त्या मोहिमेवर धाडले. वासुदेव बळवंत हे धानुरला (गाणगापुरला) आहेत, असे समजताच त्याने गावाला वेढा दिला; पण वासुदेव बळवंत तेथून पळून गेले; तथापि त्यांचे कागदपत्र मात्र शत्रूच्या हाती पडले. त्यांत मुंबईच्या लष्कराचा एक नकाशा, गव्हर्नरचा खून, इतर यूरोपीयांचे खून यांबद्दल १०,००० ते ५,००० पासूनची बक्षिसे जाहीर केली होती, शिवाय हैदराबाद येथील मौलवी मुहम्मदसाहेब या प्रतिष्ठित गृहस्थास वासुदेवांची शिफारस करणारे एक पत्र होते. मौलवीसाहेब निजामाच्या सैन्यातील अरब, रोहिले आणि शीख यांच्या पलटणीचे मुख्य सेनाधिकारी होते.

वासुदेव बळवंताचे हे सर्व गुप्त बेत कळल्यामुळे मे. डॅन्यीएलने निजामाचा पोलीस आयुक्त अब्दुल हक याच्या मदतीने वासुदेवांचा पाठलाग सुरू केला. फितुरीमुळे त्यांना त्यांचा ठावठिकाणा मिळाला आणि विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी या गावी एका बौद्ध विहारात त्यांना निद्रिस्त अवस्थेत त्यांच्या काही अनुयायांसह पकडण्यात आले (२१ जुलै १८७९). पुणे येथे त्यांच्यावर दंड संहितेच्या १२१ए, १२२, १२४ए इ. कलमांन्वये खटला चालविण्यात आला. न्या.

न्यूनहॅम यांनी त्यांना जन्मठेपेची- काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली. पुढे त्यांची रवानगी १८८० च्या जानेवारीत एडनच्या तुरुंगात झाली. तेथून आत्महत्या करण्याचा व पळून जाण्याचा वासुदेव बळवंताचा प्रयत्न फसला. तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा यांमुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच अखेरीस त्यांनी अन्नग्रहण सोडले. ते एडन येथील कारावासातच मरण पावले.

वासुदेवांचे खासगी जीवन फारसे सुखावह नव्हते. विद्यार्थिदशेत त्यांनी सोमण घराण्यातील मुलीशी पहिले लग्न केले (१८५९). तिच्यापासून त्यांना मथुरा नावाची मुलगी झाली. ही पत्नी १८७३ मध्ये मरण पावली. त्यांनी दुसरे लग्न गोपिकाबाई नांवाच्या ९ वर्षांच्या मुलीशी केले (१८७३); पण त्यांना फारसे वैवाहिक सुख लाभले नाही. गोपिकाबाई पुढे १९४० मध्ये निधन पावल्या.

वासुदेव बळवंतांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्यासाठी जो सशस्त्र लढा पुकारला, तो एकाकी होता. त्यांना पुरेसे अनुयायी लाभले नाहीत व शस्त्रसामग्रीही मिळाली नाही; तथापि भारतात त्यांनी पहिल्यांदाच सशस्त्र लढ्याची मुहूर्तमेढ रोवली. ही सशस्त्र उठावाची चळवळ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देशभर पसरली. म्हणून त्यांना ‘लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ म्हणतात. त्यांच्या कार्याचा उचित गौरव शिरढोण येथे त्यांचा स्मारकस्तंभ उभारून करण्यात आला आहे (१९४०).

 

माहिती स्रोत : विकासपीडिया

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *