Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्र वार्ता राजकीयवाणी! अखेर शिवसेना एकटी पडली, एकहाती “प्रताप” दाखवणार?

शिवसेनेचा अभिमन्यू-कर्ण होणार की ती अर्जुनासारखी लढणार? वाचा सविस्तर विश्लेषण

शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिलेलं पत्र आज दिवसभर माध्यमात व्हायरल होत होतं. या पत्रात त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन पक्षांवर आसूड ओढत शिवसेनेशी महाविकास आघाडीत राहून हे पक्ष गद्दारी करत असल्याचा थेट आरोप केला आहे. थोडक्यात सरनाईक नेमकं काय म्हणाले ते पाहुयात आणि त्यांनंतर एकूणच राजकीय क्षितिजावर शिवसना नेमकी कुठे आहे याचं विश्लेषण करूयात.

“या परिस्थितीमधे जे राजकारण सुरू आहे, त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील, तर या स्थितीत मला पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल”

“काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं त्या पक्षांच्या लोकांना वाटत आहे. काँग्रेसनं एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र आहे. महाविकासआघाडीतले काही मंत्री-नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठिशी लागू नये, म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासोबत छुपी हातमिळवणी करत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं लगेच होता, पण आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेनेच्या आमदारांची होत नाहीत” – शिवसेना आ. प्रताप सरनाईक

आज बाहेर आलेल्या पत्राची प्रताप सरनाईक यांना १० जून म्हणजेच १० दिवसांपूर्वी पोच मिळाली असून नेमकं काल शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन झाल्यावरंच बरोबर आजच हे पत्र बाहेर कसं आलं हे मोठं कोडं आहे. सोमवार दिनांक १४ जून रोजी महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम ने “राष्ट्रवादीच शिवसेनेचा शत्रू नंबर १” या मथळ्याखाली एक लेख प्रसिद्ध केला होता. यात शिवसेनेला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडूनच सर्वात जास्त धोका आहे असे मत व्यक्त केलं होतं. याला जवळपास राज्यातील ५० विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील पहिल्या स्थानासाठी असलेल्या ‘टशन’ चा सप्रमाण आधार दिला होता.

‘ती’ बातमी वाचण्यासाठी लिंक क्लीक करा – https://www.maharashtravarta.com/shivsena-ncp-aghadi/

या साऱ्या पार्श्वभूमीवर नेमकं आज आ. सरनाईक यांचं माध्यमात फिरत असलेलं पत्र फार मोठी खळबळ उडवून गेलं आहे. मुळात आ. प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर व परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्यामागे सध्या ‘ईडी’ चा ससेमिरा लागला आहे. हा ‘लागला’ म्हणण्यापेक्षा ‘लावला’ आहे म्हणणे संयुक्तीक ठरेल. याला आधार म्हणजे माजी खासदार व भाजप चे ज्येष्ठ नेते किरीट सोमैय्या हेच या सर्व नेत्यांच्या मागे हात धुवून लागल्याचे चित्र आहे. शिवाय वेळोवेळी ते मातोश्री लाही ‘प्रकरण’ काढण्याची हूल देत असतात.

चालू घडामोडींचे योग्य विश्लेषण करायचे झाले तर अनेक पैलूंवर प्रकाश टाकणे क्रमप्राप्त आहे. आज शिवसेनेला व उद्धव ठाकरेंना शत्रू किती? असा प्रश्न जर विचारला गेला तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व अगदी वंचित बहुजन आघाडी असे जवळपास सारेच पक्ष त्यांचे प्रमुख शत्रू आहेत असं म्हणणं वावगं ठरू नये. शिवसेनाचा एक पक्ष म्हणून जर विचार केला तर आजही त्याची वाढ खुंटलेलीच आहे. त्याचं कारण ३० वर्षे भाजपशी असलेली युती व तदनंतर आताच्या महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेला घरोबा असं देऊ शकतो. शिवसेनेला स्वतःची नैसर्गिक वाढ करण्याची संधीच मिळाली नाही. पण आजची सेनेची स्थिती काहीशी कठीणच म्हणावी.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून भाजपकडून सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या निकटवर्तीयांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न हाणून पाडणे ही अशक्यप्राय गोष्टच आहे. हा दबाव जसा शिवसेना नेत्यांवर आहे तसाच तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि इतर नेत्यांवरही आहे. त्यामुळे राष्ट्रवादी च्या गोटातही सारं आलबेल आहे असं मानू नये. उपमुख्यमंत्री अजित पवार कधी आपले रंग बदलतील याची खुद्द शरद पवार यांनाही कल्पना नसेल. या साऱ्याची जाणीव एक पक्षप्रमुख म्हणून नक्कीच उद्धव ठाकरे यांना असणार. परंतू फक्त जाणीव असून काय फायदा. शिवसेनेतील लोकांमधून निवडून येण्याची कोणतीही कुवत नसलेल्या काही ‘बडव्यां’ना राष्ट्रवादी काँग्रेसशी सख्य करण्यात जास्त आनंद वाटतोय असं जुन्या नेत्यांना वाटतंय. मुळात राजकारणात कोणीही कोणाचा कायम शत्रू नसतो की मित्र. आणि हे सूत्र शिवसेना गेली ५५ वर्ष वापरत आलेली आहे त्यामुळेच ती महाराष्ट्राच्या राजकारणात अद्याप तगून राहिली आहे.

परंतू शिवसेनेच्या काही नेत्यांकडून शिवसैनिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत राहण्यासाठी जाणीवपूर्वक ‘ब्रेनवॉश’ केला जातोय असं दिसतंय. याला आधार म्हणजे सध्या सोशल मीडियारील शिवसेनेच्या फेसबुक ग्रुप व पेज वर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा चाललेला उदोउदो व सोबतीला या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा या ग्रुपवर वाढत असलेला लक्षणीय वावर. या साऱ्यातून वाट काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्याच शिवसैनिकांना भविष्यात अपरिहार्यपणे करावी लागू शकणारी राजकीय ‘तडजोड’ गळी उतरवणे नक्कीच कठीण जाणार आहे.

मुळात शिवसेनेतील नेते आपला अभिमन्यू झाला आहे हे मान्यच करायला तयार नाहीत त्यामुळे ही बाब कार्यकर्त्यांना कोणत्या तोंडाने सांगायची हा त्यांच्या समोरचा मोठा सवाल आहे. याच सोबत भाजपमधील फडणवीस, किरीट सोमैय्या, नारायण राणे आणि कंपनीही पुन्हा शिवसेनेशी युती होता कामा नये यासाठी येत्या काळात आणखी आक्रमक झालेली पहायला मिळू शकते.

महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांची अनके घोटाळ्यांमुळे मलिन झालेली प्रतिमा उद्धव ठाकरे यांच्या मि. क्लीन प्रतिमेमुळे एका क्षणात उजळून निघाली. शिवसेनेशी आघाडी झाली नसती तर ही प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी त्यांना आणखी १० वर्षे खर्च करावी लागली असती ही गोष्ट शिवसैनिकांना नजरेआड करून चालणार नाही इतकं नक्की. बाकी सध्या अभिमन्यू सारखी लढणारी शिवसेना आपले आमदार भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याची संधी देत दानशूर कर्ण होणार की अर्जुनासारखी लढणार हे येता काळच ठरवेल…

आमचे या सदरातते हे लेखही वाचा

शिवसेना सत्तेत! परंतू बाळासाहेबांची ‘संघटना’ रसातळाला ….

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *