“सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई, दि. २३ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणात ‘भारत टॅक्सी’ सेवेचा अधिकृत शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘भारत टॅक्सी’ ही सहकार क्षेत्रातील नवी क्रांती असून प्रवासी आणि चालक या दोघांसाठीही सुरक्षित, पारदर्शक आणि परवडणाऱ्या प्रवासाचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू झालेल्या या सहकार मॉडेलमुळे प्रवाशांना रास्त दरात सुरक्षित सेवा मिळेल, तर चालकांना आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग उपलब्ध होईल.
मान्यवरांच्या उपस्थितीत सेवेचा शुभारंभ
या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री (सहकार व नागरी विमान वाहतूक) मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, मंदाताई म्हात्रे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, तसेच विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी व सहकार क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
खासगी ॲग्रीगेटर्सला पर्याय
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ओला आणि उबरसारख्या खासगी ॲग्रीगेटर्सनी वाहतूक क्षेत्रात योगदान दिले असले, तरी सण-उत्सव किंवा पावसाळ्यात होणारी अवाजवी भाडेवाढ आणि चालकांकडून आकारले जाणारे मोठे कमिशन यामुळे प्रवासी आणि चालक दोघांनाही आर्थिक फटका बसत होता.
या पार्श्वभूमीवर ‘भारत टॅक्सी’ ही सहकार तत्त्वावर आधारित सेवा सुरू करण्यात आली असून ती प्रवासी आणि चालक यांना थेट जोडणारी प्रणाली आहे. एका मोबाईल ॲपद्वारे कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी सेवा उपलब्ध होणार असून मध्यस्थांची गरज राहणार नाही.
मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या दीड किलोमीटरसाठी केवळ ३१ रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर २१ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. काळी-पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर तयार केलेले हे भाडे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यातील असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील स्थानिक व प्रकल्पग्रस्त कुटुंबांना या उपक्रमाचा मोठा लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या माध्यमातून भूमिपुत्र आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने डिजिटल स्वाक्षरीसह ॲग्रीगेटर धोरणाची चौकट तयार केली असून आर्थिक व्यवहारांवर सहकार विभागाचे नियंत्रण राहणार आहे.
पहिल्या टप्प्यात ६०० टॅक्सींचे अनावरण करण्यात आले असून पुढील काळात १ हजारांहून अधिक टॅक्सी या सेवेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सुरुवातीला मुंबई आणि पुणे येथे सेवा सुरू होणार असून नंतर महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये तिचा विस्तार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चालक आता सभासद आणि मालक
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, ‘सहकार टॅक्सी’ संस्थेमुळे चालक आता केवळ कर्मचारी न राहता संस्थेचे सभासद आणि मालक बनले आहेत. संस्थेच्या नफ्यातील लाभांश थेट चालकांच्या खात्यात जमा होणार आहे.
त्यांनी सांगितले की, देशभरातील सुमारे ८ लाख चालक या संस्थेशी जोडले गेले असून अल्पावधीत ७७ कोटी रुपये कोणतेही कमिशन न आकारता थेट चालकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
दिल्ली आणि गाझियाबादनंतर आता मुंबई महानगर प्रदेशात ही सेवा सुरू झाली असून लवकरच पुणे आणि नागपूरमध्येही तिचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सहकार क्षेत्राला नवी दिशा
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, सहकार हे केवळ संस्था चालविण्याचे माध्यम नसून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे प्रभावी साधन आहे.
‘भारत टॅक्सी’च्या माध्यमातून डिजिटल बुकिंग, पारदर्शक व्यवहार, सुरक्षित प्रवास आणि परवडणारे दर यांचा लाभ प्रवाशांना मिळणार असून हजारो बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्र अधिक सक्षम होत असल्याचे सांगत, राज्यातील साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या आर्थिक मदतीसह विविध सुधारणा उपक्रमांचाही उल्लेख केला.
सामंजस्य करार आणि शेअर प्रमाणपत्रांचे वितरण
कार्यक्रमात सहकार टॅक्सी को-ऑप. लिमिटेड आणि शासन यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात सचिन साळुंखे, सीमा संतोष देवगिरीकर, आनंदराव पावस्कर, संतोष सिंग आणि हितेश मणिलाल दांड यांना शेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
तसेच अक्षय विठ्ठल कीर्ती, नीरज बळीराम नाईक, तुषार पद्माकर पाटील, दिलीप लक्ष्मण पाटील, विलास कर्वे, सुदर्शन बालकृष्ण म्हात्रे, रोहिदास गायकवाड आणि प्रदीप नारायण म्हात्रे या चालकांना किटचे वितरणही करण्यात आले.
‘सहकारातून समृद्धी’ला नवी चालना
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी ‘भारत टॅक्सी’ हा उपक्रम ‘सहकारातून समृद्धी’ या राष्ट्रीय संकल्पनेला बळ देणारा ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगितले. पूर्वी कृषी आणि दुग्ध व्यवसायापुरता मर्यादित असलेला सहकार आता डिजिटल अर्थव्यवस्था आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेपर्यंत विस्तारला असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पुढाकारामुळे तंत्रज्ञान आणि सहकाराचा संगम साधत हजारो चालकांना मालकी हक्क, सामाजिक सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि सन्मानाचे उत्पन्न मिळण्याचा नवा मार्ग उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
