बुलढाणा पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई
बुलढाणा, दि. २८ : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या वाचनाच्या कार्यक्रमापूर्वीच प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतल्याने जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर जाहीर वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच पोलिसांनी आंबी यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना स्थानबद्ध केले. सध्या त्यांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अलीकडेच आमदार गायकवाड यांनी या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उल्लेखावरून आंबी यांना फोनवरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यात मोर्चा आणि पुस्तकाचे जाहीर वाचन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार होते.
या कार्यक्रमासाठी राज्यभरातून सुमारे ५०० पेक्षा अधिक कार्यकर्ते बुलढाण्यात दाखल झाले होते. प्रकाशक प्रशांत आंबी, शेतकरी नेते अजित नवले, बी. जी. कोळसे पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी या उपक्रमात सहभागी होणार होते. मात्र, पोलिसांनी आधीच कारवाई करत आंबी यांना ताब्यात घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
शेतकरी नेते अजित नवले यांनी या कारवाईचा तीव्र निषेध करत, “लोकशाही मार्गाने सभा घेण्याचाही अधिकार आता उरला नाही का?” असा सवाल उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप काढून टाकण्यात आला असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही हटवण्यात आली आहे.
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आम्ही त्या पुस्तक वाचनाला जाणार आहोत. आम्ही शांतपणे बसून वाचन ऐकू. जर त्यांनी महाराजांचा सन्मान राखून वाचन केले, तर आम्ही टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करू. मात्र, पुस्तकात सुमारे ३०० ते ४०० वेळा ‘शिवाजी’ असा उल्लेख आहे. वाचन करताना प्रत्येक ठिकाणी ‘शिवाजी महाराज’ असेच संबोधले पाहिजे. अन्यथा शिवभक्तांच्या भावना भडकल्या, तर त्याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांवर राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.
या सर्व घडामोडींमुळे बुलढाणा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच तीव्र झाला असून, पुढील घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
