Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, नव्हे तो होईलच : शिवसेना

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, नव्हे तो होईलच : शिवसेना

सध्या शिवसेना भाजप युतीच्या नेत्यांमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यावर कलगीतुरा रंगला आहे. विशेषतः भाजपच्या बाजूने रावसाहेब दानवे या विषयावर विशेष भाष्य करताना दिसत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखात नेमका याच सुप्त संघर्षाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. या अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे कि, “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, नव्हे तो होईलच; पण हे काही न सुटणारे कोडे नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व आमच्यात जसे ठरले तसेच घडेल व या कोड्याचे आधीच सोडवलेले उत्तर योग्य वेळी बाहेर पडेल. तोपर्यंत भाजप व शिवसेनेच्या मंडळींनी ‘युती’च्या प्रकृतीस ओरखडा न लावता बोलत राहायचे, ‘‘मुख्यमंत्री, आमचाच बरं का! तसे दोघांत ठरले आहे!’’ युती विजयाचा यापेक्षा दुसरा कोणताही ‘फॉर्म्युला’ असूच शकत नाही. रावसाहेब दानवे यांचे आभार तरी किती मानावेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचेही कोडे सोडवले आणि शिवसेनेलाही कोडे सोडवायला मदत केली. मुख्यमंत्री आपलाच! एकदा दोघांचे ठरलंय म्हटल्यावर फुकटचे वाद कशाला?”

सविस्तर अग्रलेख : 

राजकारणात कोणताही प्रश्न अनुत्तरित राहत नाही. वेळ आली की सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळत असतात. उभ्या, आडव्या, तिरप्या शब्दांची कोडीही डोकी खाजवल्यावर सुटतच असतात. राजकारणातल्या प्रश्नांची कोडीही त्याच पद्धतीने सुटत असतात. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे भिजत घोंगडे पडले होते तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता की, ‘‘युतीचे नक्की काय होणार?’’ नंतर युतीचे कोडे सुटले तेव्हा नवा प्रश्न पुढे आला तो म्हणजे, ‘‘साहेब, युती झाली. आता जागावाटपाचे कसे काय होणार? म्हणजे समसमान जागावाटपाचा गुंता कसा सोडवणार?’’ हा जागावाटपाचा गुंताही सुटल्यावर नवे कोडे अनेकांना पडले. ते म्हणजे, ‘‘साहेब, युतीशिवाय तर पर्यायच नव्हता. ती तर दोघांची गरजच होती. जागावाटपाचा घोळही संपलाच आहे, पण मुख्यमंत्रीपदाचे काय? मुख्यमंत्री भाजपचा की शिवसेनेचा?’’ सध्या हा प्रश्न चघळला जात आहे. मुख्यमंत्री पदाचा प्रश्न आहेच हो, पण तो काही इतका जटील नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर त्यांचे नेते सांगतात, ‘‘काळजी करू नका, मुख्यमंत्री आपलेच.’’ इकडे आम्हीही सांगतो, ‘‘पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच!’’ हे असे आपापल्या कार्यकर्त्यांना सांगणे म्हणजे ते चुकीचे आहे असे नाही. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणजे एक इरसाल आणि दिलखुलास माणूस. भाजपच्या सदस्य नोंदणी उद्घाटनासाठी दानवे संभाजीनगरात आले. त्यांची पुन्हा कुणीतरी छेड काढली, ‘‘साहेब, भाजपचा मुख्यमंत्री होणार का?’’ यावर ते झटकन पटकन म्हणाले, ‘‘भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही असं कोण म्हणतं?’’ दानवे यांचे शतप्रतिशत बरोबर आहे. दानवे यांच्या जागी शिवसेनेचा एखादा नेता असता तर

त्याने तरी वेगळे काय सांगितले

असते? ‘‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का?’’ या प्रश्नावर दानवेंप्रमाणेच शिवसेनेकडूनही ‘‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही असं कोण म्हणतं? तो तर होणारच आहे!’’ असेच उत्तर मिळणार. मात्र हे प्रश्न आणि कोडी पत्रकारांनाच पडली आहेत. मुख्यमंत्री शिवसेना आणि भाजपचाच होणार. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचे निकाल काय सांगतात? राज्यात शिवसेना-भाजप युतीवर जनतेने विश्वास टाकला आहे. उद्याची विधानसभा निवडणूकही ‘युती’ प्रचंड बहुमताने जिंकणार आहे. राज्य घडवावे, लोकांना चांगले दिवस यावेत यासाठी सत्ता राबवावी हाच आमचा हेतू आहे. सत्तेच्या किल्ल्या जनतेची किंवा राज्याची लूट करण्यासाठी आम्हाला नकोत. ‘युती’च्या गाठी पुन्हा बांधल्या गेल्या आहेत त्या याच कार्यासाठी. सत्तेचा किंवा पदाचा अमरपट्टा या जगी कुणीच बांधून आलेला नाही. प्रत्येकाला एक दिवस रिकाम्या हातानेच निरोप घ्यायचा आहे याचे भान ठेवायला हवे. राजकारणातले मोठमोठे सिकंदर गेल्या दहा-पंधरा वर्षांत कसे मातीमोल झाले ते आपण पाहिले आहे. शेवटी मागे राहते ते माणसाचे कर्म. त्याच्याच नोंदी इतिहासाच्या पानांवर कायम राहतात. हिटलर लक्षात राहतो जागतिक महायुद्धामुळे, तर बाबा आमटे स्मरणात राहतात ते सामाजिक कार्यामुळे. गांधीजी तर देशासोबत जगाचेच राष्ट्रपिता ठरले. इंदिरा गांधी लक्षात राहतात पाकिस्तानची दोन शकले करण्याचे शौर्य गाजवल्याने. अटलजींसारखे व्यक्तिमत्व कवी हृदयाचे प्रखर राष्ट्रवादी म्हणून अजरामर झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निरोप घेतला तेव्हा त्यांच्या

विजयाच्या आणि सत्कार्याच्या

घोषणा देत त्यांच्या मागून अश्रू ढाळत चालणारा चाळीस-पन्नास लाखांचा जमाव म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या उत्तुंग कर्तृत्वाची साक्षच होती. बाळासाहेब तर मुख्यमंत्रीही नव्हते आणि आजी-माजी पंतप्रधानही नव्हते. मात्र त्यांनी  पन्नास-साठ वर्षे जनतेला भरभरून दिले. आज मुख्यमंत्री खुर्चीवर आहे म्हणून सत्ताधीश. नंतर विचारतोय कोण? देशातले असे अनेक ‘माजी’ आजही अंधारात चाचपडत आहेत. महाराष्ट्राचे भवितव्य शिवसेनेनेच घडवले आहे. लढा मराठीचा असेल नाही तर महाराष्ट्राच्या अखंडतेचा, प्रश्न रोजगाराचा असेल नाही तर शेतकऱ्यांचा. शिवसेना ठामपणे उभी आहेच. आम्ही आज सत्तेत तसे म्हटले तर आहोत. काही गोष्टी अवजड किंवा अवघड असू शकतात, पण सत्तेत असूनही पीक विमा योजनेतील गोंधळातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही समांतर कामे सुरू केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री खुर्चीवर असता तरी आम्ही यापेक्षा वेगळे वागलो नसतो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, नव्हे तो होईलच; पण हे काही न सुटणारे कोडे नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व आमच्यात जसे ठरले तसेच घडेल व या कोड्याचे आधीच सोडवलेले उत्तर योग्य वेळी बाहेर पडेल. तोपर्यंत भाजप व शिवसेनेच्या मंडळींनी ‘युती’च्या प्रकृतीस ओरखडा न लावता बोलत राहायचे, ‘‘मुख्यमंत्री, आमचाच बरं का! तसे दोघांत ठरले आहे!’’ युती विजयाचा यापेक्षा दुसरा कोणताही ‘फॉर्म्युला’ असूच शकत नाही. रावसाहेब दानवे यांचे आभार तरी किती मानावेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचेही कोडे सोडवले आणि शिवसेनेलाही कोडे सोडवायला मदत केली. मुख्यमंत्री आपलाच! एकदा दोघांचे ठरलंय म्हटल्यावर फुकटचे वाद कशाला?

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *