प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६ साठी नामांकन प्रक्रिया सुरू; अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै
नवी दिल्ली, दि. ३ : देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या बालकांचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६ यासाठी नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी अर्ज व नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली असून पात्र बालकांनी तसेच त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी आणि संस्थांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बालकांच्या असामान्य कर्तृत्वाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येते. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या आणि समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या बालकांना या पुरस्काराद्वारे सन्मानित केले जाते.
या पुरस्कारासाठी नामांकन केवळ केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. इच्छुक अर्जदारांनी संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज सादर करावयाचा आहे.
कोण पात्र आहे?
३१ जुलै २०२६ रोजी वय ५ ते १८ वर्षे दरम्यान असलेली बालके या पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहेत. विशेष बाब म्हणजे कोणतीही व्यक्ती, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था किंवा संघटना पात्र बालकाचे नामांकन करू शकते. तसेच बालक स्वतःदेखील स्वतःचे नामांकन सादर करू शकते.
सहा क्षेत्रांमध्ये पुरस्कार
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पुढील सहा श्रेणींमध्ये प्रदान केला जातो :
- साहस
- समाजसेवा
- पर्यावरण
- क्रीडा
- कला आणि संस्कृती
- विज्ञान आणि तंत्रज्ञान
या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बालकांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव केला जाणार आहे.
अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती
अर्जदारांनी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर नोंदणी अथवा प्रवेश करून नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल पत्ता यांसह आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यानंतर सुरू असलेल्या नामांकन विभागात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६ हा पर्याय निवडून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल.
अर्जामध्ये नामनिर्देशित बालकाची सविस्तर माहिती, त्याने केलेल्या कार्याचे वर्णन, त्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम याबाबत जास्तीत जास्त एक हजार शब्दांमध्ये माहिती देणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित पुरावे, प्रमाणपत्रे, पूरक कागदपत्रे आणि अलीकडील छायाचित्र जोडणे आवश्यक राहील.
अर्ज संपादनाची सुविधा
अर्जदारांना अर्ज पूर्ण करण्यापूर्वी तो मसुदा स्वरूपात जतन करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंतिम सादरीकरणापूर्वी आवश्यक बदल करता येणार असून अर्ज सादर झाल्यानंतर त्याची डाउनलोड करता येणारी प्रत उपलब्ध होणार आहे.
कर्तबगार बालकांना राष्ट्रीय व्यासपीठ
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा केवळ सन्मान नसून देशातील प्रतिभावान, धाडसी, समाजाभिमुख आणि नाविन्यपूर्ण विचार करणाऱ्या बालकांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे प्रभावी व्यासपीठ मानले जाते. मागील काही वर्षांत या पुरस्कारामुळे अनेक बालकांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.
महिला व बाल विकास मंत्रालयाने पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरातील पात्र व कर्तृत्ववान बालकांचे नामांकन करून त्यांना राष्ट्रीय सन्मान मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या अशा बालकांचा गौरव करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे.
अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळावर नोंदणी अथवा लॉगइन करणे आवश्यक
-
- नामांकन संकेतस्थळ : (Nomination Portal) : https://awards.gov.in
