चंद्रपूरच्या उपक्रमाचा विस्तार करण्याची मंत्री डॉ. अशोक वुईके यांची घोषणा
चंद्रपूर, दि. २८ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील प्रत्येक आदिवासी प्रकल्पांत मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे राबविण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली. चंद्रपूर येथील यशस्वी उपक्रमाचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत बोर्डा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
डॉ. वुईके यांनी सांगितले की, सध्या खासगी संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या उन्हाळी शिबिरांची फी जास्त असल्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबांना आपल्या मुलांना अशा शिबिरांमध्ये सहभागी करून घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन चंद्रपूर प्रकल्पाने गेल्या तीन वर्षांपासून मोफत प्रशिक्षण शिबिराची संकल्पना यशस्वीपणे राबविली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कौशल्य आणि सर्जनशीलता वाढीस लागल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे तर सांस्कृतिक आणि पारंपरिक कलांचे प्रशिक्षण दिले जात आहे. धनुर्विद्या, गोंडी व वारली चित्रकला, संगीत, विविध वाद्ये, कराटे, लाठी-काठी, योग, क्ले आर्ट, तसेच मुलींसाठी मेहंदी कला आणि बांबू आर्ट अशा विविध कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच सांस्कृतिक जाणीवही बळकट होत आहे.
या वर्षी आयोजित शिबिरात चंद्रपूर प्रकल्पातील ८ शासकीय आश्रमशाळा, २४ अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य आश्रमशाळेतील एकूण २३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांनाच प्रशिक्षक म्हणून घडविण्याची अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर हेच विद्यार्थी आपल्या शाळांमध्ये इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असल्याने ज्ञानाचा प्रसार अधिक व्यापक होणार आहे.
डॉ. वुईके यांनी पुढे सांगितले की, आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या परंपरा, कला आणि जीवनशैलीची ओळख करून देत त्यांच्यात अभिमानाची भावना निर्माण केली जात आहे. या उपक्रमामुळे शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक वारशाचे जतनही होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ढोल पथकाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. क्रांतिवीर बिरसा मुंडा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी प्रास्ताविकात या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संचालन अनुराधा लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रामदास खवशी यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यभर या उपक्रमाचा विस्तार झाल्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार प्रशिक्षणाची संधी मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक आणि कौशल्य विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
