Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोविड चाचणी रिपोर्ट देण्यास अक्षम्य दिरंगाई; पनवेल मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

पनवेल मनपा चांगली कार्यपद्धती कधी अवलंबणार?

संबंधितांवर कारवाई कधी? – ज्येष्ठ पत्रकार हृषीकेश ठाकूर

पनवेल, दि. २३: पनवेल महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची मालिका काही केल्या संपताना दिसत नाहीये. कधी कोविड सेंटर मधील नर्सेसची डॉक्टरांवर दादागिरी तर कधी कोविड रुग्णाला श्वानदंशाचे इंजेक्शन देण्याचा प्रताप, एक ना अनेक प्रकरणं. परंतू यावेळी तर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सिक्सरंच मारलाय. महाराष्ट्र वार्ता चे विभागीय प्रतिनिधी हृषीकेश ठाकूर व त्यांच्या परिवाराला पनवेल महापालिकेच्या बेजबाबदार कारभाराचा अनुभव आलाय.

ठाकूर व त्यांच्या परिवारातील तीन सदस्य वत्सला कमलाकांत ठाकूर(वय ८२), क्षमा हृषीकेश ठाकूर(पत्नी) व गौरव हृषीकेश ठाकूर(मुलगा) यांची कोरोना रॅपिड टेस्ट दिनांक १५ मार्च रोजी पॉसिटीव्ह आली होती. यानंतर त्यांची RT-PCR चाचणी करण्यात आली व त्याचे रिपोर्ट अलिबाग वरून आल्यावर तुम्हाला मिळतील असे कोविड चाचणी केंद्रावरील परिचारिकांकडून सांगण्यात आले.

आज जवळपास ७ दिवस उलटले अद्याप RT-PCR चाचणीचे रिपोर्ट काही आले नाहीत. ठाकूर परिवारातील गौरव ठाकूर यांचा रिपोर्ट शेजाऱ्यांनी काल आणला व तो निगेटिव्ह निघाला हे विशेष! हृषीकेश ठाकूर यांच्या हृदयावर गतवर्षीच बायपास सर्जरी झाली असून अद्याप त्यांचे कॅथेड्रल काढण्यात आलेले नाही. शिवाय त्यांच्या आई वत्सला ठाकूर या ज्येष्ठ नागरिक असून अशा वेळी जर काही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढवलीच तर त्यांना रुग्णालयात दाखल करताना मोठी अडचण निर्माण होऊ शकते याचे भान पालिकेच्या आरोग्य विभागास नसावे ही मोठी थट्टा आहे. तसेच कोविड चाचणीचे रिपोर्ट देण्यास एवढा विलंब लागणे हेही अनाकलनीय आहे. जर गौरव ठाकूर यांना दुसऱ्या दिवशीच RT-PCR चाचणी अहवाल प्राप्त झाला असता तर त्यांना दुसरीकडे क्वारंटाईन करता आले असते. पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नाहक त्यांना आठवडाभर आपल्या कोविड बाधित परिवारसोबतच राहावे लागले.

केंद्र आणि राज्य शासनाने कोविड महामारीशी मुकाबला करण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा उभी केली असूनही पनवेल मनपाला नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यात अपयश का यावे हे मोठे कोडे आहे. निधीचा योग्य विनियोग पालिका प्रशासनाकडून नीट होतोय की नाही हे कळणे पनवेलकरांना आता गरजेचे आहे.

हृषीकेश ठाकूर म्हणाले की, “पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक इमारतीत उभारण्यात आलेल्या कोविड चाचणी केंद्राची अवस्थाही फार दयनीय असून येथे स्वच्छतेचा अभाव जाणवला तसेच परिचारिकांनी पीपीई किटही परिधान केला नव्हता. परिवारातील सर्व सदस्यांच्या चाचण्या पॉसिटीव्ह आल्यावर आम्हाला तपासणीसाठी डॉक्टर उपस्थित नव्हते व येथील नर्सेसनीच आम्हाला औषधं दिली.”

मुळात RT-PCR चाचणी चे सॅम्पल अलिबाग येथील लॅब मध्ये पाठविण्यापेक्षा जवळच असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या चाचणी केंद्रात पाठवणे सोप्पे ठरेल. परंतू या सर्व बाबींकडे लोकप्रतिनिधींचे वारंवार दुर्लक्ष होत असून ही मंडळी टक्केवारीत गुंतली असून यांना नागरिकांच्या हिताशी काहीएक देणे घेणे नसल्याचे म्हणत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

सध्या पनवेल महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून विरोधीपक्ष नेतेपद शेकापकडे आहे. परंतू सर्व कारभार ‘अंडरस्टँडिंग’ मध्ये चालत असल्याने लोकांच्या मूलभूत गरजांकडे या मंडळींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे असाही आरोप ठाकूर यांनी केला.

हृषीकेश ठाकूर व त्यांच्या परिवाराला होत असलेल्या मनस्तापाची भरपाई काही केल्या भरून निघू शकत नाही. परंतू या सर्व भोंगळ कारभाराला जबाबदार असलेल्यांना घरी बसवणे हे मात्र पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हाती असून सोबतच आता त्यांनी स्वतःच जमिनीवर उतरून परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे नाहीतर कोविड च्या दुसऱ्या लाटेत पनवेल मध्ये हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही.

खालील लिंकवर क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter || INSTARAM ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *