नवी मुंबईतील नालेसफाई कामांची पालिका आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी
नवी मुंबई, दि. १६ : पावसाळ्यापूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई कामांना गती देण्यासाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विविध विभागांचा प्रत्यक्ष दौरा करून कामांची पाहणी केली. दिघा विभागापासून सुरू झालेल्या या पाहणीमध्ये ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, महापे ते वाशीपर्यंतच्या नाल्यांची सखोल तपासणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना कामे १५ मेपर्यंत निर्धारित वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
पावसाळ्यात नागरिकांना अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासनाने पूर्वनियोजन केले असून कामांची गुणवत्ता आणि गती यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. लवकरच उर्वरित विभागांचाही आढावा घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या पाहणीदरम्यान शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, उद्यान विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
नालेसफाई करताना उगमस्थानापासून खाडीपर्यंत संपूर्ण स्वच्छता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. गाळाचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार यंत्रसामग्रीचा वापर करावा, तसेच दिघा परिसरातील नाल्यातील मोठ्या वायर्स व्यवस्थित बांधून ठेवून पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील याची खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले.
नैसर्गिक नाल्यांमध्ये येणाऱ्या दूषित पाण्याचे स्रोत शोधून ते मलनि:स्सारण वाहिन्यांशी जोडणे किंवा त्यावर प्रक्रिया करूनच पाणी सोडणे, यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. नाल्यांतील अडथळे दूर करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवणे, तसेच काठावरील झाडाझुडपे हटविणे यालाही प्राधान्य देण्यात आले.
वाशी येथील सेक्टर ८ मधील धारण तलाव परिसरात उभारण्यात येत असलेल्या पंपिंग स्टेशनच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. या ठिकाणी फ्लॅप गेट दुरुस्ती आणि १० मेपर्यंत पंप उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले.
महानगरपालिका क्षेत्रातील १४ धारण तलाव शहरासाठी महत्त्वाचे संरक्षण कवच मानले जातात. मात्र, गाळ साचल्यामुळे त्यांची साठवण क्षमता सुमारे ८० टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ संस्थेकडून अहवाल प्राप्त करून गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू असून साठवण क्षमता पूर्वीपेक्षा २० टक्क्यांनी वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच खारफुटीचे पर्यायी पुनर्रोपण करण्यासाठी आवश्यक मंजुरी प्रक्रियाही सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
महानगरपालिका क्षेत्रातील २८ मोठ्या नाल्यांची स्वच्छता १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून रस्त्यांलगतच्या सांडपाणी वाहिन्या, गटारे आणि झोपडपट्टी भागातील नाले यांची स्वच्छता ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय एमआयडीसी, पीडब्ल्यूडी, सिडको, एमएमआरडीए, एपीएमसी आदी विविध प्राधिकरणांसोबत समन्वय बैठक घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील पावसाळ्यापूर्व कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात उर्वरित भागांतील पाहणी करून स्वच्छता आणि नालेसफाई कामांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
