Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सरकारकडून २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्या खरेदीस सुरुवात

कांदाप्रश्नी कृषीमंतत्री धनंजय मुंडे यांनी घेतली केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची भेट

कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ आणि शीतगृह उभारणार

मुंबई, दि. २२: राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धाऊन गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नीदेखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असून कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ वाढविण्यात येणार आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी तसेच केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा २४१० रुपये क्विंटल दराने नाफेड खरेदी करणार असून हा ऐतिहासिक निर्णय असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील कांदा प्रश्नाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

निर्यातीसाठी कंटेनरमध्ये असलेला कांदाही नाफेड खरेदी करणार असून गरज भासल्यास  केंद्राकडून आणखी सहकार्य करण्याची ग्वाही गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. लासलगाव, मनमाड, आळेफाटा तसेच नाशिक जिल्ह्यातील इतर ठिकाणीही नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आज सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक घेऊन या प्रश्नी ठोस पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. कांदा साठवणुकीसाठी शीतगृहांची आवश्यकता आहे. असे झाल्यास साठवणुकीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघेल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यासाठी तातडीने दोन तीन पर्यायांवर पणन विभागाने विचार करावा, तसेच आवश्यकता भासल्यास खासगी कंपन्यांचा सहभाग घ्यावा, असेही निर्देशही दिले आहेत.

राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा नाफेडने खरेदी करण्याचा निर्णय ऐतिहासिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कांद्याची महाबँक ही संकल्पनाही राबवण्यात येत असून यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती निर्णय घेत आहे. १३ ठिकाणी कृषक समृद्धी प्रकल्प उभारणार आहे. याठिकाणी रब्बी कांदा पिकासाठी १० लाख टन इतकी शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक क्षमता उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यातून प्रत्यक्ष अणि अप्रत्यक्षरित्या ६० हजारपेक्षा जास्त रोजगार निर्माण होऊन कांद्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागेल. कांदा बाजाभाव घसरणीबाबत विविध शिफारशींवर सुद्धा विचार सुरु आहे. यामध्ये काही तत्काळ अमंलबजावणी करण्याच्या आणि काही दीर्घकालीन उपाययोजनासुद्धा आहेत. केंद्राला निर्यात शुल्क कमी करण्याबाबतही विनंती करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यातदेखील कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली, तेव्हा कांदा उत्पादकांच्या मदतीला राज्य शासन धावून गेले होते. उशीराच्या खरीप हंगामातील लाल कांदा विक्री झालेल्या शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रती क्विंटल अनुदान जाहीर केले असून एकूण ३ लाख ३६ हजार लाभार्थींना अनुदान देण्यात येत आहे.

“कांदा चाळींसाठी वाढीव निधीची तरतूद करणार” – उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्र शासनाच्या ‘ऑपरेशन ग्रीन’ अंतर्गत अहमदनगर क्लस्टरमध्ये, राहुरी येथे हिंदुस्तान ॲग्रो को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, या २५ हजार शेतकरी सभासद असणाऱ्या संस्थेच्या कांदा प्रकल्पासाठी ११७ कोटी रुपयांची मान्यता दिली आहे. हा प्रकल्प तातडीने राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानही दिले असून शासनाला शेतकरी व ग्राहक दोघांचाही विचार करावा लागतो. कांदा चाळींसाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल. चाळीसाठी १८ टक्के अनुदान देण्यात येते, त्यातही वाढ करण्याचा विचार आहे. कांदा निर्यातमूल्य कमी करण्याचीही मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या सर्वच प्रश्नांवर शासन संवेदनशील आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

कांदाप्रश्नी कृषीमंत्र्यांनी घेतली केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची भेट

कांदा निर्यातीवर ४० % निर्यातशुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी आमदार अतुल बेनके उपस्थित होते. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कांदा खरेदीसाठी प्रती क्विंटल २४१० रुपये हा जाहीर केलेला दर समाधानकारक असून शेतकऱ्यांनी नाफेड आणि एनसीसीएफला कांदा विक्री करावी, तसेच शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावे, केंद्र सरकार आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मंत्री मुंडे यांनी यावेळी दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही केंद्रीय मंत्री श्री गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *