Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“रंगभूमी हे अभिनेत्याचे माध्यम आहे तर चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे” – अभिनेता मनोज बाजपेयी

“‘गुलमोहोर’ हा चित्रपट तीन पिढ्यांच्या माध्यमातून कुटुंब आणि घर यांच्या अर्थाचा धांडोळा घेतो” – दिग्दर्शक राहुल व्ही. चित्तेला

“‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट अल्पवयीन बालकांच्या सुरक्षिततेच्या विषयावर भाष्य करतो” – दिग्दर्शक अपूर्व सिंग कर्की

गोवा/मुंबई, दि. २५: गोवा येथे आयोजित ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘भारतीय पॅनोरमा’ विभागामध्ये राहुल व्ही. चित्तेला लिखित, दिग्दर्शित ‘गुलमोहोर’ हा चित्रपट सादर झाला. हा चित्रपट, बात्रा कुटुंबातील विविध सदस्यांच्या वैयक्तिक कथांच्या गुंफणीतून कुटुंब आणि घर यांचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो.

पत्र सूचना कार्यालयातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत, माध्यमे आणि इतर प्रतिनिधींशी संवाद साधताना, ‘गुलमोहोर’ या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे अभिनेते मनोज बाजपेयी म्हणाले की दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सेटवर निर्माण केलेले घरगुती वातावरण ‘कुटुंब’ या विषयावर आधारित हृदयस्पर्शी चित्रपटाचे चित्रीकरण करताना एखाद्या कार्यशाळेसारखे उपयुक्त ठरले. “कुटुंब ही संकल्पना आणि त्यातील भावना चित्रीकरणाच्या पल्याड पोहोचली होती. कॅमेऱ्यासमोर आम्ही वडील, मुलगा, मुलगी, आई अशी पात्रे रंगवत होतो आणि चित्रीकरण संपल्यानंतर आम्ही एखाद्या कुटुंबाप्रमाणेच एकत्र येऊन आपापल्या कल्पना, हास्य आणि जेवण यांचीही देवाण-घेवाण करत होतो. या वातावरणाने सर्व तरुण कलाकारांना आपापल्या भूमिकेत शिरण्यास आणि त्या भूमिकेचे बारकावे समजून घेण्यास मदत केली. एक कुटुंब, त्यातील सदस्य आणि त्यांचे आपापसांतील नातेसंबंध हा चित्रपट दर्शवतो. या घरगुती वातावरणाशिवाय हे शक्य झाले नसते,” असे बाजपेयी म्हणाले.

रंगभूमीकडून चित्रपटांच्या दिशेने झालेल्या स्थित्यंतराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मनोज बाजपेयी म्हणाले की ते सर्वप्रथम स्वतःला रंगभूमीवरील कलाकार मानतात. ‘बँडीट क्वीन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी, भविष्यात रंगभूमीवरील कलाकारांना आर्थिक अडचणींमुळे ज्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकेल अशा समस्या अधोरेखित केल्या आणि आपल्याला चित्रपटांचा मार्ग स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. “रंगभूमी हे अभिनेत्याचे माध्यम आहे तर चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे”, अशा शब्दात रंगभूमीचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले, “मी जेव्हा एखाद्या चित्रपटाचा भाग असतो तेव्हा त्यातील माझ्या कामगिरीचे श्रेय घेणे मला कठीण जाते कारण आत खोलवर कुठेतरी मला हे ठाऊक असते की हे काम दिग्दर्शकाच्या कल्पनेतून साकार झालेले आहे.”

‘गुलमोहोर’ या कौटुंबिक चित्रपटामागची संकल्पना विषद करताना चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल व्ही. चित्तेला यांनी सांगितले की कुटुंब आणि घर यांच्या व्याख्या काळासोबत बदलत जातात आणि आपले वय झाले की त्या बदलतात. मात्र याच दोन गोष्टी नेहमीच महत्त्वाच्या असतात. “हा चित्रपट तीन पिढ्यांच्या संदर्भात कुटुंब आणि घर यांच्या अर्थाबद्दल भाष्य करतो. ‘गुलमोहोर’ या शीर्षकाबद्दल माध्यम प्रतिनिधींना अधिक माहिती देताना ते म्हणाले, “‘गुलमोहोर’ हा काव्यात्मक शब्द आहे आणि तो मला गुलजार यांच्या अर्थवाही गाण्यांची आठवण करून देतो. गुलमोहोराची फुले पटकन उमलतात आणि पटकन गळूनही पडतात आणि त्यांची प्रतिमा, मी चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असलेल्या कथेशी चपखल जुळते. हा चित्रपट दिल्लीमध्ये चित्रित केला आहे आणि दिल्ली शहर हे या चित्रपटातील एका पात्राप्रमाणे आहे.”

गुलमोहोर चित्रपटातील एक कलाकार शांती बालचंद्रन हिच्यासाठी मनोज बाजपेयी, शर्मिला टागोर, सिमरन आणि अमोल पालेकर अशा दिग्गज कलाकारांसोबतचा हा हिंदी चित्रपट सृष्टीतील पदार्पणातील तिचा चित्रपट म्हणजे एखाद्या स्वप्नाप्रमाणे होता. मल्याळी आणि हिंदी चित्रपटांतील फरक सांगताना शांती बालचंद्रन हिने सांगितले की हिंदी चित्रपटांची एक कॉर्पोरेट औपचारिक रचना असते, मात्र मल्याळी चित्रपटात असे नसते. “पण गुलमोहोर चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी मला सेटवरील स्नेहपूर्ण आणि कौटुंबिक भावनांमुळे ते कॉर्पोरेट वातावणा जाणवले नाही,” तिने सांगितले.

मनोज बाजपेयी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व सिंग कर्कीदेखील या संभाषणात सहभागी झाले. सत्य घटनेपासून प्रेरणा घेऊन तयार केलेल्या  ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटाची कथा सत्र न्यायालयातील एक वकील पी. सी. सोळंकी याने एकट्याच्या बळावर पाच वर्ष दिलेल्या लढ्याची कहाणी आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आणि राजकीय पाठबळ असलेल्या प्रभावी आणि सामर्थ्यशाली स्वामीविरुध्द हा वकील उभा राहतो. “हा चित्रपट अल्पवयीन मुलामुलींच्या सुरक्षेच्या समर्पक विषयावर भाष्य करतो. या चित्रपटात अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी समाजव्यवस्थेशी लढा देणाऱ्या वकिलाची भूमिका मनोज बाजपेयी यांनी केली आहे. मात्र, या चित्रपटातील खरा लढवैय्या किंवा पहिला ‘बंदा’तर ती मुलगी आहे, जी तिच्यावर झालेल्या अन्यायविरुध्द आवाज उठवते,” असे ते पुढे म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *