Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र ही संत, कर्तृत्ववानांची भूमी आहे. या भूमीतूनच देशाला अनेक परंपरा आणि सुधारणा देण्याचे काम झाले आहे. राज्य शासनही हाच धागा पकडून महामानवांच्या विचारांनुसार काम करीत आहे. आपले राज्य पायाभूत सोयी सुविधा उभारणी, परकीय गुंतवणूक यामध्ये देशात अव्वल असून  सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रेसर आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढत देशात व राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आधारित कारभार सुरू असल्याचे प्रतिपादन केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन २०१९-२० ते २०२२-२३ मधील विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस येथे झाला. या सोहळ्यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार किशोर जोरगेवार, ज्ञानेश्वर म्हात्रे, भरत गोगावले, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आदी उपस्थित होते.

समाजाच्या शोषित, वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शासन करीत असल्‍याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की शासनाने सामाजिक न्याय विभागासाठी सर्वात जास्त २१ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पैशांअभावी शिक्षण सोडावे लागू नये म्हणून शिष्यवृत्ती व शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येतात. शिष्यवृत्तीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करून महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचे भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी देशात आपल्या राज्यात प्रथमच दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात आला आहे. लाड समितीने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या शिफारशी लागू करण्यात येत आहेत.  मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगार, प्रशिक्षण व संशोधनासाठी बार्टी संस्था काम करीत आहे. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येत आहे. परदेशातील उच्च शिक्षणासाठीसुद्धा मदत करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, लंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या घराचे स्मारकात रूपांतर केले. मुंबईत इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू आहे. राज्यात रमाई आवास योजनेतून साडेचार लाख घरकुल बांधण्यात आली आहेत. शासनाने नागरिकांना योजनांचा लाभ त्यांच्या जवळ जावून देण्याचे ठरविले आणि शासन आपल्या दारी कायर्क्रम राबविण्यात आला. आतापर्यंत २० कार्यक्रमांमधून ४ कोटी ६० लाख लोकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. हा कार्यक्रम लोकाभिमुख बनला आहे.  हे शासन आपत्तीमध्ये धावून जात आपत्तीग्रस्त लोकांचे दु:ख दूर करण्याचे काम करीत आहे.

पुरस्कारार्थींचा सन्मान करण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, मागील चार वर्षाचे प्रलंबित असलेले ३९३ पुरस्कार आपण देत आहोत. पुरस्कार नवीन काम करण्याची ऊर्जा देतात. पुरस्कार प्राप्त व्यक्तीच्या कामाची प्रेरणा अन्य घेवून चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे समाजाच्या जडण – घडणीत अनुकूल परिणाम दिसून येतो, असेही मुख्यमंत्री शिंदे यांवेळी म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कळवा जि. ठाणे या इमारतीचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविकात सचिव भांगे यांनी पुरस्कार  व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *