Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पावसाळापूर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याचे नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे नियोजन

पावसाळापूर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याचे नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे नियोजन

नवी मुंबई, दि. २९: पावसाळी कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही याची काळजी घेऊन आवश्यक पूर्वतयारी करावी आणि ३० मे पर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करावीत असे निर्देशित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महापालिकेसह शहरातील इतर सर्व प्राधिकरणांनी आपत्ती नियंत्रणाच्या दृष्टीने पावसाळ्याआधी व पावसाळा कालावधीत परस्पर समन्वय आणि संवाद राखावा असे सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियोजन बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव तथा प्र. अतिरिक्त आयुक्त शरद पवार व शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई तसेच इतर नमुंमपा विभागप्रमुख व विभाग अधिकारी तसेच सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नवी मुंबई पोलीस व वाहतुक पोलीस, एपीएमसी, रेल्वे, महावितरण, एमटीएनएल, एपीएमसी, आरएएफ, नागरी संरक्षण दल, महानगर गॅस लिमी., टीबीआयए, मच्छीमार संघटना आदी विविध प्राधिकरणांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे ऑनलाईन उपस्थित होते.
याप्रसंगी आयुक्तांनी पावसाळ्याच्या अनुषंगाने करावयाचा अत्यावश्यक कामांचा सविस्तर आढावा घेतला तसेच सध्याचा निवडणूक आचारसंहिता कालावधी लक्षात घेऊन ही कामे करण्यासाठी शासन पातळीवरुन आवश्यक परवानग्या घेणे गरजेचे असल्याचे लक्षात घेत याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशित केले. या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन प्रक्रिया तातडीने करुन ही कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणी करावी असेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
महानगरपालिकेच्या क्षेत्रात एमआयडीसी भागात मोठया प्रमाणावर रस्ते व इतर कामे सुरु असून ती कामे जलद पूर्ण करावीत तसेच दरड कोसळण्याच्या संभाव्य जागांची एमआयडीसी व महानगरपालिकेच्या क्षेत्रीय अधिका-यांनी संयुक्त पहाणी करुन त्या परिसरात नागरिकांचे वास्तव्य असल्यास त्यांना धोका लक्षात आणून देऊन त्यांचे स्थलांतरण करावे अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात असलेल्या झोपडपट्टया स्थलांतरणाबाबतही निर्देशित करण्यात आले. दिघा इलठणपाडा धरणाच्या खाली असणा-या झोपड्यांच्या स्थलांतरणविषयक आवश्यक कार्यवाही करण्याचे यावेळी सूचित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शहरातील मुख्य व मध्यवर्ती सायन पनवेल महामार्ग असल्याने तो खड्डेमुक्त व सुस्थितीत रहावा या दृष्टीने संपूर्ण काळजी घ्यावी तसेच तुर्भे उड्डाणपूलाचा एक आर्म तोडण्याचे काम सुरु असून वाहतूक पोलीसांच्या सहयोगाने वाहतूकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही व विशेषत्वाने पावसाळी कालावधीत याची अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
अशाच प्रकारे एमएमआरडीए मार्फत सुरू असलेल्या कामांमुळे नाल्यांच्या प्रवाहाला अडथळा होणार नाही तसेच काही ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करावी असेही निर्देश देण्यात आले. महावितरणाची झाकण तुटलेली सबस्टेशन, उघडया केबल यांची दुरुस्ती तातडीने करण्याचे सूचित करत विशेषत्वाने मोठया ट्रान्सफॉर्मरच्या आसपास असणा-या अस्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. याकरिता किमान आठवडयातून एकदा त्यांची साफसफाई करण्याची नियमित प्रणाली राबवावी अशाही स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. महानगर गॅस लिमीटेडने आवश्यक ती खबरदारी घेऊन वॉल्व्हच्या जागा जिओ टॅगींग कराव्यात व पावसाळी कालावधीत विशेष खबरदारी घ्यावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्यंतिक गरजेशिवाय कोणत्याही नवीन खोदकामाची परवानगी देऊ नये व दिलेल्या परवानग्यांची कामे १५ मे पर्यंत पूर्ण करुन ते खोदकाम पूर्ववत केले जाईल याची दक्षता घ्यावी असेही निर्देशित करण्यात आले. वाहतूक पोलीस विभागाने मांडलेल्या सूचनेनुसार नमुंमपा क्षेत्रात सुरु असलेली उड्डाणपूलांची कामे जलद पूर्ण करावीत तसेच पावसाळी कालावधीत मोठया भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास पाणी साचण्याच्या संभाव्य जागांवर आवश्यक पम्पीग मशीन व मनुष्यबळ कार्यांन्वित राहील याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. यादृष्टीने पावसाळी कालावधीतील नालेसफाई व गटारे सफाईची कामे काटेकोरपणे व जलद गतीने विहित कालावधीत पूर्ण करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले व सर्व पावसाळापूर्व कामांची स्वत: पहाणी करुन आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. सिडको व रेल्वे प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने रेल्वे स्टेशन्समधील आवश्यक कामे पूर्ण करावीत व महानगरपालिकेसह तिन्ही प्राधिकरणांच्या अभियंत्यांनी संयुक्त पहाणी करुन आवश्यक कार्यवाही करण्याची खबरदारी घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
एपीएमसी मार्केट हा शहरातील एक महत्वाचा भाग असून येथील अंतर्गत स्वच्छतेबाबत संबंधित प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी व अंतर्गत नालेसफाई आणि विशेषत्वाने पावसाळी कालावधीतील स्वच्छतेची काळजी काटेकोरपणे घ्यावी असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. पावसाळा कालावधीत महानगरपालिकेचा मुख्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्ष तसेच विभागीय नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन केंद्रातील कक्ष हे २४ X ७ आवश्यक मनुष्यबळासह व यंत्रसामुग्रीसह सुसज्ज राहतील याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. त्याचप्रमाणे आठही विभाग कार्यालय स्तरावर आपत्तीकाळात अडचणीच्या प्रसंगी नागरिकांना तात्पुरत्या निवा-याच्या जागा निश्चित करुन तेथे अन्नपदार्थांसह गरजेच्या वस्तू उपलब्ध राहतील याचे आत्तापासूनच नियोजन करुन ठेवावे अशाही सूचना देण्यात आल्या.
या कालावधीत रॅपीड ॲक्शन फोर्स, नागरी संरक्षण दल, मच्छिमार संघटना यांची मोठया प्रमाणावर मदत होते. त्यांच्या ऑनलाईन उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनाही मदतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. पावसाळी कालावधीतील साथरोग नियंत्रणासाठी तसेच मलेरिया व डेंग्यूसारख्या संभाव्य आजारांबाबत आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला करतांनाच पुरेसा औषधसाठा करुन ठेवण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र हेल्पलाईन कार्यान्वित करण्याबाबतही कार्यवाहीचे निर्देश यावेळी देण्यात आले. त्याचप्रमाणे या कालावधीत पाण्याच्या शुध्दतेकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देशित करण्यात आले. शालेय विभाग तसेच परिवहन सेवा यांनाही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पावसाळी कालावधीपूर्वी धोकादायक झाडे व झाडांच्या फांदयांची गरजेएवढी छाटणी करण्याबाबत कार्यवाही सुरु करावी व पावसाळी कालावधीत जोरदार वा-यामुळे पडणा-या फांद्या लगेच उचलण्याबाबतच्या कार्यवाहीचे विभागवार नियोजन करावे असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. धोकादायक इमारती हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याचे लक्षात घेत धोकादायक इमारतीत राहणा-या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या स्थलांतराबाबत कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे बांधकाम साईट्सवर धूळ नियंत्रण व पावसाळी कालावधीत अपघात होऊ नये तसेच त्याठिकाणी डास उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ नयेत यादृष्टीने संबंधितांना पूर्वसूचना देण्याचे व खबरदारी घेण्याचे निर्देशित करण्यात आले.
कोणतीही आपत्ती आल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा आपत्ती येऊच नये यादृष्टीने खबरदारी घेणे व तरीही नैसर्गिक आपत्ती आलीच तर त्यामध्ये हानी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याकरिता ही पूर्व नियोजन बैठक महत्वाची असून बैठकीत झालेल्या विस्तृत चर्चेनुसार नियोजन करावे आणि त्याची गांभीर्याने अंमलबजावणी करावी अशा सूचना देत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांनी १५ मे पर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करावीत असे निर्देश दिले व त्यानंतर स्वत: पहाणी करणार असल्याचेहि त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *