Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आचारसंहिता नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याकडे काटेकोर लक्ष देण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

आचारसंहिता नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याकडे काटेकोर लक्ष देण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश
नवी मुंबई, दि. २३: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून आचारसंहिता पालन केली जात असल्याबद्दल विभागीय पातळीवर काटेकोरपणे दक्ष रहावे व कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतच्या आढावा बैठकीत दिले.
आदर्श आचारसंहितेच्या नियामानुसार प्रचार फलक यांना परवानगी देण्यात यावी. परवानगी देताना सर्वांना समान न्याय देण्यात यावा. अशाच प्रकारे प्रचारासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याबाबतही समान भूमिका ठेवण्यात यावी. कोणत्याही प्रकारे विनापरवानगी होर्डींग, बॅनर्स, झेंडे लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच खाजगी संस्थांच्या जाहिरातीही हटविण्यात याव्यात. उद्घाटने, शुभारंभ यांच्या कोनशिला झाकून घेण्यात याव्यात. अशा सर्व बाबींकडे आठही विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर स्वत: पाहणी करून गांभीर्याने लक्ष द्यावे असे आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. त्याचप्रमाणे एनएमएमटी बसेस व बसस्थानके याठिकाणीही विनापरवानगी फलक लागणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यासोबतच लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने विविध प्रसार माध्यमांचा अधिक चांगला उपयोग करून व्यापक जनजागृती करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. यामध्ये, विभाग कार्यालय पातळीवर मतदान जनजागृती कक्ष स्थापन करावा व या कक्षाव्दारे नागरिकांना मतदानाविषयी, त्यांचा मतदार क्रमांक व मतदान केंद्र आदी बाबींविषयी माहिती द्यावी, मतदान करण्यासाठी संपर्क साधून प्रोत्साहित करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे आपापल्या विभागीय क्षेत्रातील सोसायट्या, वसाहती, उद्योगसमुह याठिकाणी भेटी देऊन मतदान करणेविषयी जनजागृती करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले.
लोकसभा निवडणूकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा यादृष्टीने क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन रेल्वे स्टेशन, बसडेपो, मार्केट, मॉल, मार्ट्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, मंगल कार्यालये, रूग्णालये, सभागृहे, उद्याने अशा वर्दळीच्या ठिकाणी विविध माध्यमांतून मतदानाविषयी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ॲप अशा समाजमाध्यमांचाही प्रभावी वापर करावा तसेच एनएमएमटी बसेसवर फलक लावून व बसेसमध्ये ऑडिओ सूचना प्रसारित करून जनजागृती करण्याचे सूचित करण्यात आले.
प्रचार, प्रसिध्दीप्रमाणेच मतदान केंद्रांची सर्व आवश्यक सुविधांसह सिध्दता करून ठेवण्याचेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. ही केंद्रे निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे तळमजल्यावर असावीत असे सूचित करीत या केंद्रावर पाणी, विद्युत, स्वच्छतागृहे, रॅम्प अशा व्यवस्थेसह प्रामुख्याने व्हिलचेअरचीही व्यवस्था करणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुव्यवस्थित रितीने पार पडणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्याकडे काटेकोर लक्ष देण्यासोबतच या निवडणूकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित विभागांचे विभागप्रमुख व सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना आढावा बैठकीत दिले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *