Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांतून नवी मुंबईत मतदानविषयक व्यापक जनजागृती

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांतून नवी मुंबईत मतदानविषयक व्यापक जनजागृती

नवी मुंबई, दि. २६: प्रत्येक नागरिकाने लोकसभा निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावावा यादृष्टीने स्वीप उपक्रमांतर्गत मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून त्याकरिता विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये ज्या ठिकाणी लोक जास्त संख्येने एकत्र येतात अशा समारंभ, उत्सव या कार्यक्रमांठिकाणी जाऊन मतदान करण्याचे महत्व पटवून दिले जात आहे तसेच मतदान शपथ घेऊन मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे.
समाजातील विविध घटकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करण्यात येत असून कोपरखैरणे येथील स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यालयात परिसर सखी विकास संस्थेच्या वतीने आयोजित कचरा वेचक महिलांच्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी तथा नमुंमपा क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे व सहा. नोडल अधिकारी विभा सिंग यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत कचरा वेचक महिलांचे मतदान करण्याविषयी प्रबोधन केले. याप्रसंगी उपस्थित महिलांनी आपण स्वत: तर मतदान करुच आणि इतरांनाही मतदान करण्यास सांगू अशी सामुहिक शपथ ग्रहण केली.
May be an image of crowd
अशाच प्रकारे वाशीतील विष्णुदास भावे नाटयगृह येथे आयोजित ऐरोलीच्या डीएव्ही स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी स्वीप जनजागृती अंतर्गत शिक्षक, पालक व विदयार्थ्यांसमोर मतदानाचा हक्क बजावण्याविषयी आवाहन करण्यात आले. उपस्थितांमधील मतदारांनी सामुहिकरित्या बोट उंचावून आपण मतदान करणार असल्याची ग्वाही दिली.
पटनी रोड येथील वेस्ट साइड व क्रोमा या मोठ्या व्यावसायिक दुकानांमध्येही मतदान विषयक जनजागृती करण्यात आली. अशा स्वरूपाच्या सर्व मोठया आस्थापनांना व संस्था कार्यालयांना भेटी देऊन मतदानाचे आवाहन केले जात आहे. ऐरोली येथील मध्यवर्ती पोस्ट ऑफिस मध्येही जाऊन तेथील अधिकारी-कर्मचारी व पोस्टमन यांचे मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. तसेच ऐरोलीगावातील उत्सवाप्रसंगीही मतदानाचे आवाहन करण्यात आले.
दिघा विभाग कार्यालयाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत मतदान करण्याची शपथ घेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याविषयीचे आवाहन पोहोचविण्यासाठी प्रत्येक अधिकारी – कर्मचारी यांनी आपले योगदान दयावे असे सूचित केले.
दि. २० मे रोजी २५ ठाणे लोकसभा मतदार संघाची निवडणुक होत असून यामध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या सबलीकरणाला हातभार लावावा यादृष्टीने क्षेत्रीय स्तरावर व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यापूर्वीच आढावा बैठकीत दिले असून त्या अनुषंगाने महानगरपालिका स्तरावरूनही मतदार जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *