Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ११२९ कोटी रकमेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ११२९ कोटी रकमेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

नवी मुंबई, दि. १५: राज्याच्या ग्रोथ इंजिनची नवी मुंबई ही अश्वशक्ती असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या 1129 कोटी रकमेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा निवासस्थान येथून दूरदृष्टी प्रणालीद्वारे ऑनलाइन संपन्न झालेल्या या विशेष समारंभप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांसमवेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय बनसोडे, ऐरोली विधानसभा सदस्य आमदार गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदा म्हात्रे, विधान परिषद सदस्य आमदार रमेश पाटील व इतर विधानसभा – विधानपरिषद सदस्य आणि झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती विजय नाहटा, माजी खासदार संजीव नाईक, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, योगेश कडुसकर, डॉ. राहुल गेठे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील व शिरीष आरदवाड आणि महानगरपालिकेचे सर्व कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईत येऊन सर्व प्रकल्पांचे लोकार्पण करायला आवडले असते मात्र कार्य बाहुल्यामुळे तसेच आचारसंहिता जवळ आल्यामुळे ऑनलाइन उद्घाटन करावे लागते आहे याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला. यावेळी सिडको महामंडळाच्याही विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले. नावातच नाविन्य असणारे नवी मुंबई हे शहर नेहमीच नवनवीन प्रकल्प राबविण्यामध्ये आघाडीवर असून पर्यावरणपूरक विकास हे महाराष्ट्र शासनाचे धोरण असून आजही विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नवी मुंबईने पायाभूत सुविधा, भूमिपुत्रांचा विकास आणि लोककल्याणकारी कामांवर भर दिला असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. वेगवान निर्णय, गतिमान विकास हे सरकारचे धोरण असून ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा यामध्ये सर्वांगीण विकासाची मोठी क्षमता असल्याचे सांगत मुख्यमंत्री महोदयांनी नवी मुंबई हे त्यामधले एक महत्त्वाचे शहर असल्याचे विशेषत्वाने नमूद केले.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रास्ताविकपर मनोगतात नवी मुंबईच्या विकासकामांचा धावता आढावा घेतला. नागरिकांना आवश्यक असणाऱ्या दर्जेदार सुविधापुर्ती सोबतच शहराच्या नावलौकिकात भर घालणारे 900 कोटींचे विशेष प्रकल्प सद्यस्थितीत सुरू असल्याची माहिती देत आयुक्तांनी 1129 कोटी रक्कमेच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत असल्याचे सांगितले. आज लोकार्पण व भूमिपूजन होत असलेल्या सुविधांमध्ये आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, पर्यावरण, सुशोभिकरण, दळणवळण, परिवहन, शहर सुरक्षा, अग्निशमन, ऐतिहासिक वारसा जतन, वाचन संस्कृती वृद्धी, ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव दाखवणाऱ्या विविध सुविधा प्रकल्प आणि इमारती यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
या लोकार्पण आणि भूमिपूजन झालेल्या प्रकल्प सुविधांमध्ये नियोजित छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा व ऐतिहासिक संग्रहालय, से. 10 ए, ऐरोली शिलान्यास (रू. 14 कोटी), घणसोली येथे पामबीच मार्गावर घणसोली – ऐरोली खाडीपूल बांधणे भूमिपूजन (493 कोटी), नमुंमपा क्षेत्र सीसीटीव्ही यंत्रणा व नमुंमपा मुख्यालयातील कमांड सेंटर लोकार्पण (126 कोटी), से. 38, सीवुड नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्र इमारत लोकार्पण (4 कोटी 18 लक्ष),
यासोबतच अमृत योजना 2.0 अंतर्गत 290 कोटी 13 लक्ष रक्कमेच्या विविध सुविधा कामांचे भूमिपूजन ह्यामध्ये बेलापूर विभागातील से. 20 व से. 25 येथे मलउदंचन केंद्र बांधणे आणि से. 6 बेलापूर येथील मलउदंचन केंद्रामधील पंपीग मशीनरी बदलणे, नेरुळ विभागातील से. 10 ए शिरवणे येथे मलउदंचन केंद्र बांधणे आणि से. 4 नेरुळ येथील मलउदंचन केंद्रामधील पंपीग मशीनरी बदलणे, वाशी विभागातील से. 03, से. 12 व से.28 येथे मलउदंचन केंद्र बांधणे, तुर्भे विभागातील से. 09 सानपाडा मलउदंचन केंद्र बांधणे आणि से. 30 वाशी येथील मलउदंचन केंद्रामधील पंपीग मशीनरी बदलणे, कोपरखैरणे विभागातील से. 01 ए व से. 2 ए येथील मलउदंचन केंद्रामधील पंपीग मशीनरी बदलणे, ऐरोली विभागातील यादव नगर येथे 2 द.ल.लि. क्षमतेचे मलप्रक्रिया केंद्र बांधणे, बेलापूर विभागातील से. 12 येथे सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्याकरिता 7.5 द.ल.लि क्षमतेचे टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट बांधणे, बेलापूर विभागात 24 x 7 पाणीपुरवठा यंत्रणा उभारणे व त्या आनुषंगिक काम करणे, ज्वेल ऑफ नवी मुंबई नेरुळ येथील तलावाचे पुनरुज्जीवन करणे व आनुषंगिक कामे करणे आणि कोपरखैरणे विभागात से. 19 येथील धारण तलावाचे पुनरुज्जीवन करणे व आनुषंगिक कामे, त्याचप्रमाणे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथे 150 दशलक्ष लिटर क्षमतेचे फिल्टर बेड बांधणे कामाचा शुभारंभ (56 कोटी 71 लक्ष), नमुंमपा क्षेत्रातील रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करणे कामाचा शुभारंभ (13 कोटी 84 लक्ष), से. 30, नेरुळ येथील शाळा इमारत लोकार्पण (11 कोटी) , से. 15, घणसोली येथील शाळा इमारत लोकार्पण (85 कोटी), से. 14 कोपरखैरणे नागरी आरोग्य केंद्र इमारत लोकार्पण (3 कोटी 65 लक्ष), से. 3 ऐरोली येथील अग्निशमन केंद्र इमारत लोकार्पण (11 कोटी), विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथील ग्रंथालय लोकार्पण (4 कोटी), से. 22 तुर्भे विभाग कार्यालय इमारत भूमिपूजन ( 9 कोटी) आणि नमुंमपा परिवहन उपक्रम, तुर्भे आगार प्रशासकीय इमारत लोकार्पण (3 कोटी 50 लक्ष) अशाप्रकारे एकूण 1129 कोटी रक्कमेच्या सुविधा कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *