Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विश्वविजेत्या भारतीय शुटिंगबॉल संघाचे प्रशिक्षक नमुंमपा क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांचे आयुक्त राजेश नार्वेकर यांचेकडून अभिनंदन

विश्वविजेत्या भारतीय शुटिंगबॉल संघाचे प्रशिक्षक नमुंमपा क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांचे आयुक्त राजेश नार्वेकर यांचेकडून अभिनंदन

नवी मुंबई, दि. ६: नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या विश्वचषक शुटिंगबॉल स्पर्धेत भारतीय शुटिंगबॉल संघाने कॅनडाच्या शुटिंगबॉल संघावर मात करीत शुटिंगबॉलचे पहिले विश्वविजेतेपद पटकाविले. या संघाचे प्रशिक्षक असलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांचे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी समस्त नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने अभिनंदन करीत सत्कार केला आणि प्रशिक्षक म्हणून त्यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे नवी मुंबई शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावल्याबद्दल कौतुक केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ आणि सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, परिवहन व्यवस्थापक तथा उपआयुक्त योगेश कडुसकर, परिवहन विभागाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे उपस्थित होते. शूटिंगबॉल हा भारतीय पारंपरिक खेळ असून भारतासह इतर अनेक देशांत खेळला जातो. या खेळासाठी आंतरराष्ट्रीय शूटिंगबॉल फेडरेशनचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, राज्यसभा सदस्य आणि महासचिव रविंद्र तोमर यांच्या अथक प्रयत्नाने यापूर्वी इंडो-नेपाळ, इंडो- बांगलादेश आणि एशियाकप अशा तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आता आंतरराष्ट्रीय शूटिंगबॉल फेडरेशनच्या वतीने “पहिली शूटिंगबॉल वर्ल्ड कप” स्पर्धा जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली येथे दि. 2 व 3 मार्च 2024 रोजी संपन्न झाली.
या स्पर्धेकरिता भारतीय शूटिंगबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांची नियुक्ती झाली होती. शूटिंगबॉल या मान्यताप्राप्त खेळातील नामांकित खेळाडू म्हणून शूटिंगबॉल खेळात मागील 32 वर्षांच्या प्रदीर्घ यशस्वी कारकिर्दीत त्यांनी अनेक वर्ष भारतीय शूटिंगबॉल संघात प्रतिनिधित्व केले असून भारतीय शूटिंगबॉल संघाचे कर्णधारपदही भूषविले आहे.
याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेचा शूटिंगबॉल संघ बांधून या शूटिंगबॉल संघांचे प्रतिनिधित्व करीत त्यांनी सातत्याने 15 वर्षे संपूर्ण देशात महानगरपालिकेचा नावलौकिक केलेला आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये या संघासह सहभागी होऊन अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सांघिक पारितोषिके या संघाने तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून रेवप्पा गुरव यांनी पटकाविलेली आहेत. शूटिंगबॉल खेळात पंचींग या अतिशय महत्त्वाच्या स्थानावरील उत्कृष्ट खेळाडू म्हणून रेवप्पा गुरव यांचा नावलौकिक असून त्यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत उत्कृष्ट पंचर म्हणून असंख्य पारितोषिके पटकाविलेली आहेत.
असा अनुभवसंपन्न शुटिंगबॉलपटू प्रशिक्षक असल्याने भारतीय संघात उत्साह होता. याच उत्साहाने त्यांनी स्पर्धेतील कॅनडा, श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, यूएई, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, नेपाळ अशा सर्व देशांसोबतच्या सामन्यांमध्ये आपले कौशल्य प्रदर्शित करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. या विश्वविजयामध्ये प्रशिक्षक श्री. रेवप्पा गुरव यांच्या मार्गदर्शनाचा विशेष महत्वाचा वाटा होता.
नुकत्याच पार पडलेल्या या वर्ल्ड कप मध्ये भारतासह कॅनडा , बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ या देशाचे संघ सहभागी झाले होते. भारतीय संघांचे सराव शिबिर झज्जर, हरियाणा येथे पार पडली यामध्ये प्रशिक्षक म्हणून अत्यंत उत्तम मार्गदर्शन करत संघाचे कसून तयारी करुन घेतली. शूटिंगबॉल खेळाच्या पहिल्या आणि ऐतिहासिक अशा वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी सामन्यात सर्वच संघांवर मात करत भारतीय संघाने उपांत्य फेरीत नेपाळ संघाचा 21 / 08 आणि 21 / 12 अशा गुणांनी पराभव केला तसेच दुस-या उपांत्य फेरीत कॅनडाने बांगलादेशला 21 / 08 आणि 21 / 10 अशा गुणांनी दोन सेटमध्ये नमवले आणि भारत व कॅनडा हे दोन संघ अंतिम फेरीत दाखल झाले.
अंतिम फेरीत भारत आणि कॅनडा या दोन्ही तुल्यबळ संघामधील लढतीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अंतिम सामन्यामध्ये कॅनडा संघासोबत तीनपैकी पहिला सेट 21 / 08 असा चुरशीचा झाला. दुसरा सेट सुरु होण्यापूर्वी प्रशिक्षक म्हणून रेवप्पा गुरव यांनी संघांमध्ये नवोदित खेळाडूंना खेळण्याची संधी देत खेळाडू बदलून कॅनडा संघातील खेळाडूंना आक्रमक शॉट मारण्याची संधी न देता भारतीय संघालाच आक्रमक शॉट मारण्याचे तंत्र अंगिकारत प्रतिस्पर्धी संघावर सतत दबाव निर्माण केला. त्यामुळे दुसरा सेटही 21 / 16 अशा गुणांनी जिंकत भारतीय संघाने पहिल्या शुटींगबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरले. यामध्ये भारतीय शुटिंगबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून रेवप्पा गुरव यांच्या कुशल डावपेचांचे व मार्गदर्शनाचेही कौतुक झाले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून ते महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी असल्याने या माध्यमातून महानगरपालिकेचाही नावलौकिक होत आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याची दखल घेत क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांचा सत्कार केला तसेच त्यांना आगामी यशस्वी वाटचालीबद्दल शुभेच्छा प्रदान केल्या.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *