कधीकाळी लातूर पॅटर्न म्हणून नावाजलेला लातूर विभाग शेवटच्या स्थानावर
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यंदा राज्याचा एकूण निकाल ९१.८७ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात १.४२ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी राज्याचा निकाल ९३.२९ टक्के इतका होता. यंदाही राज्यात मुलींनीच सरशी कायम राखत मुलांपेक्षा अधिक उत्तीर्णतेची नोंद केली आहे.
राज्यातील सर्व विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे. तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. पुणे विभागानेही चांगली कामगिरी करत राज्यात दुसरे स्थान मिळवले आहे.
मंडळाने विद्यार्थ्यांसाठी निकाल पाहण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली असून विद्यार्थ्यांना सात वेगवेगळ्या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. निकाल जाहीर होताच राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले.
मुलींची पुन्हा आघाडी
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी उत्तीर्णतेमध्ये बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९४.७३ टक्के लागला असून मुलांचा निकाल ८९.१४ टक्के इतका आहे. यामुळे मुली मुलांपेक्षा तब्बल ५.५९ टक्क्यांनी अधिक उत्तीर्ण ठरल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, नियमित अभ्यास, सातत्य आणि ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष शिक्षणाचा योग्य वापर यामुळे मुलींची कामगिरी अधिक प्रभावी ठरत आहे.
विभागनिहाय निकाल
राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे :
- पुणे – ९१.२५ टक्के
- नागपूर – ८८.६७ टक्के
- छत्रपती संभाजीनगर – ८८.६८ टक्के
- कोल्हापूर – ८९.९७ टक्के
- अमरावती – ९०.९२ टक्के
- नाशिक – ९०.७२ टक्के
- लातूर – ८४.१४ टक्के
- कोकण – ९४.१४ टक्के
- मुंबई – ९०.०८ टक्के
कोकण विभागाने राज्यात सर्वाधिक निकालाची नोंद करत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर लातूर विभागाचा निकाल तुलनेने कमी लागल्याने शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.
शाखानिहाय निकालात विज्ञान शाखा अव्वल
शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९६.४४ टक्के इतका लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल ९२.७१ टक्के आहे. कला शाखेचा निकाल ८६.४५ टक्के लागला असून व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ८७.७५ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.
निकालातील महत्त्वाची वैशिष्ट्ये
यंदाच्या बारावी परीक्षेत काही महत्त्वपूर्ण बदल आणि उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मंडळाने प्रथमच डिजिटल पद्धतीने गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पंधराव्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळांमधून गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे वितरित केली जाणार आहेत.
परीक्षेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पेपर वाहतुकीसाठी जीपीएस सक्षम डिजिटल लॉक प्रणालीचा वापर करण्यात आला. तसेच कॉपीमुक्त अभियान अधिक कठोरपणे राबवण्यात आले. याच पार्श्वभूमीवर यंदा निकालात काही प्रमाणात घट झाल्याचे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
परीक्षेदरम्यान एकूण १ हजार ९८३ गैरप्रकार समोर आले असून सुमारे १०० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार खेळाडू, एनसीसी, स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.
पुरवणी परीक्षा जून-जुलैमध्ये
बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून जून-जुलै २०२६ दरम्यान पुरवणी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना लवकरच अर्ज प्रक्रिया आणि वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
