वारकरी, शेतकरी आणि भाविकांच्या सेवेसाठी शासन कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
पंढरपूर, दि. २५ : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली. यावेळी मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने या दाम्पत्याला सोबत घेऊन पारंपरिक पद्धतीने महापूजा पार पडली. महापूजेनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पंढरपूर मंदिर परिसर विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास आवश्यक झाला आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेत सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हा प्रकल्प येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम तसेच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.
“कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल”
पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक येतात. येथे अत्यंत कमी जागा आहे. आता मोठी जागा तयार करणे गरजेचे आहे. यावर्षी हे काम सुरू करायचे आहे. कॉरिडॉर विकासात येथील व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे मिळतील, भाडेकरूंची व्यवस्था होईल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी होईल.” त्यांनी यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या मंदिर विकासाच्या कामांचा मोठा भाग पूर्ण झाल्याचेही सांगितले.
यंदाच्या वारीत दर्शनासाठी लागली २५ किलोमीटरहून अधिक रांग
यंदाच्या आषाढी वारीत विक्रमी गर्दी झाल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, “यावेळी वारीने एक नवा उच्चांक गाठला आहे. यावर्षी २५ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची दर्शनासाठी रांग लागली होती. परंतु दर्शनासाठी २५ तास लागले तरीही कोणीही नाराज न होता, न थकता त्या ठिकाणी आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत हे दर्शन घेत आहेत. चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी वाळवंटात अतिशय सुंदर व्यवस्था केल्यामुळे तिथला कचरा, विष्ठा आदी संपूर्ण स्वच्छता झाली आहे. त्यामुळे अतिशय सुंदर वाळवंट आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आपण सर्वजण करत असलेली सेवा श्री विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल, अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो.”
“ही पूजा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि जगभरातील पांडुरंगाच्या भक्तांच्या वतीने”
महापूजेचे महत्त्व स्पष्ट करत मुख्यमंत्री म्हणाले, “लाखो भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघतात. अनेक वारकरी कळसाच्या दर्शनावरच समाधान मानतात. जणू काही विठुरायाचीच भेट झाली आहे, अशा भावनेने लोक जातात. या अनोख्या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणे, ही देखील एक पर्वणी आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून केलेली ही पूजा संपूर्ण महाराष्ट्रातील आणि जगभरातील पांडुरंगाच्या भक्तांच्या वतीने केलेली पूजा आहे.”
शेतकरी, वारकरी आणि सर्वसामान्यांच्या सेवेलाच विठ्ठलसेवा
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “येणारा वारकरी हा शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, उद्योजक अशा सर्व क्षेत्रातील आहे. विठुरायाची सेवा जरी आपल्याला करता आली नाही, तरी वारकऱ्यांची, शेतकऱ्यांची सेवा केली तरी ती सेवा विठुरायापर्यंत पोहोचते. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडावे, यासाठी ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आणि थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.”
मंदिर विकासासाठी शासनाचे मोठे योगदान – गहिनीनाथ महाराज औसेकर
प्रास्ताविक करताना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, “श्री विठ्ठल मंदिराला पाठबळ देणे, निधी देणे आणि विकास करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आज विठुमाऊलीच्या दर्शनासाठीच्या रांगेचे अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केले आहे. दर्शन रांगेत ५० ते ६० हजार वारकरी असले तरी पालकमंत्र्यांनी राज्य शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या सुविधा केल्यामुळे दर्शन सुसह्य झाले आहे.”
मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार; वर्षभराचा मोफत एसटी प्रवास पास प्रदान
यावर्षीच्या शासकीय महापूजेचे मानकरी बाबासाहेब माधव माने आणि सौ. प्रभावती माने (मु.पो. गौरगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) या दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजेनंतर सन्मान करण्यात आला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने त्यांना वर्षभरासाठी मोफत एसटी प्रवासाचा पासही प्रदान करण्यात आला.
‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे वितरण
आषाढी वारीदरम्यान पाणी संवर्धन, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी आणि वृक्षसंवर्धन या विषयांवर जनजागृती करणाऱ्या दिंड्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत –
- प्रथम क्रमांक – श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर
- द्वितीय क्रमांक – वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालना
- तृतीय क्रमांक – गोऱ्हेकर संस्था, आळंदी देवाची
विजेत्या दिंड्यांना पुरस्कारासह धनादेश प्रदान करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला अभिवादन करत, पंढरपूरच्या विकासाबरोबरच भाविकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

