Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या राज्यातील पावसाची सद्यस्थिती

राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबई, दि. १३ : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस चालू आहे. पावसामुळे राज्याच्या काही भागात दुर्घटना घडल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी, पुराच्या पाण्यात सहा जण वाहून गेले, तर शिलापूर येथे एकाचा मृत्यू झाला आहे. पुरात वाहून गेलेल्या अन्य पाच जणांचा बचाव पथकातर्फे शोध सुरू आहे. नंदुरबारमध्येही पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात मागील ३६ तासापासून पाऊस सुरु असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात अनेक गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने, गावांचा संपर्क तुटला आहे. मुदखेड तालुक्यातल्या सीता नदीला पूर आला असून, या पूरात दोन व्यक्ती अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आज इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. शहराजवळच्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचं एक दार काल उघडण्यात आलं असून, गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. या बंधाऱ्याच्या खालच्या भागात असलेल्या बेळगाव उच्च पातळी बंधाऱ्याची दोन दारं काल दुपारी उघडण्यात आल्यामुळे गोदावरी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात आठ दिवस सतत पाऊस होत असल्याने पैनगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून नांदेड जिल्ह्यातला सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पी. एचडी अभ्यासक्रम कार्य परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. १४ ते १६ जुलै दरम्यान होणारी ही परीक्षा आता २५ ते २७ जुलै दरम्यान होईल. एम.ए. आणि एम.कॉमची बहिस्थ पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आजपासून सुरु होणारी परीक्षा आता १८ जुलै पासून सुरु होणार असल्याचं, विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे.

लातूर जिल्ह्यातही काही दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीवरील प्रकल्प भरत आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून आवश्यकतेनुसार मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीत पाणी सोडलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठावरच्या शेतकरी, नदीकाठी वस्ती करुन राहीलेल्या नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

हिंगोली आणि बीड जिल्ह्यातही काल सलग पाचव्या दिवशी पाऊस सुरु होता. उस्मानाबाद जिल्ह्यातही अनेक भागात काल पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातही सतत पाऊस सुरुच असल्यानं, गलाटी, लेंडीसह बहुतांश नद्या, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. डिग्रस बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यातही काल सर्वदूर पाऊस झाला. नाशिकमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोडण्यात आलेल्या विसर्गानं पैठणच्या नाथ सागरामध्ये ५० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत आहे. नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. नाथ सागराच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होणार असल्यानं धरण विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचा आदेश पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिला आहे. नाथसागरातला पाणीसाठा काल संध्याकाळी ४० टक्के झाला होता.

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. अधून मधून पावसाचा जोर वाढत होता. जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरिपातल्या पिकांची वाढ खुंटली असून, आंतरमशागतीची कामं रखडली आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत खरिपातल्या ८३ टक्के क्षेत्रावरच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *