Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल तुम्हाला ‘हे’ ठाऊक आहे का?

राष्ट्रीय क्रीडादिन व मेजर ध्यानचंद जन्मदिन विशेष

भारताला हॉकीचे सुवर्णयुग दाखवलेल्या
‘हॉकीचे जादुगार’ मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून आज सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्त या महान खेळाडूच्या जीवनावर आम्ही प्रकाश टाकत आहोत.

भारतीय हॉकीतील नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे. ड्रिबिलींगमधील त्यांचे कर्तृत्व एवढे भन्नाट होते की, चेंडू लोहचुंबकाप्रमाणे त्यांच्या स्टिककडे आकर्षित होतो असाच साऱ्यांचा समज व्हायचा.

१९३६ मधील भारत-जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या अंतिम लढतीत ध्यानचंद यांच्या याच नजाकतीने अगदी हुकूमशहा अ‍ॅडाल्फ हिटलर यांनाही वेड लावले होते. त्यांच्या या असामान्य कौशल्याने भारावलेल्या हिटलर यांनी त्यांना जर्मनीचे नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ‘ऑफर’ दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती.

अशा या महान खेळाडूचा गौरव म्हणून त्यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून २००२ पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. आपल्या कारकिर्दीत खेळात असमान्य कर्तृत्व दाखविणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणाऱ्या क्रीडापटूला ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे २९ ऑगस्ट २००५ मध्ये ध्यानचंद यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सामेश्वर दत्त सिंग हे इंडियन आर्मीत असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. याच कारणामुळे पहिल्या सहा वर्षांनंतर ध्यानचंद यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.

त्यांच्या वडिलांना निवृत्तीनंतर उत्तर प्रदेशातील झांशीमध्ये एक जमिनीचा तुकडा मिळाला आणि तेथेच ते स्थायिक झाले. ध्यानचंद यांना मूलसिंग व रूपसिंग हे दोन भाऊ होते. त्यांना लहानपणी कुस्तीची आवड होती, पण आर्मीत दाखल होईपर्यंत हॉकीची त्यांना फारशी माहिती नव्हती. १९२२ मध्ये १६व्या वर्षी ते आर्मीत दाखल झाले. त्या वेळी आर्मीच्या रेजिमेंटमध्ये होणाऱ्या हॉकी सामन्यांत खेळताना त्यांच्या ड्रिबिलींगचे कौशल्य मेजर बाले तिवारी यांच्या नजरेत भरले आणि त्यांनी ध्यानचंद यांच्याकडून हॉकीचे तंत्र व कौशल्य घोटवून घेतले.

त्यामुळे १९२२ ते १९२६ या काळात रेजिमेंटच्या तसेच विविध स्पर्धामध्ये त्यांनी आपल्या असामान्य कौशल्याची मोहर उमटवली. या त्यांच्या कर्तृत्वामुळे न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या इंडियन आर्मी संघात त्यांची निवड झाली. त्या दौऱ्यात त्यांनी १८ सामने जिंकले, दोन बरोबरीत सुटले व एकमेव लढत त्यांनी गमावल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव झाला. नंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी लढतींत पहिली त्यांनी जिंकली तर दुसऱ्या लढतीत मात्र निसटता पराभव झाला. या दौऱ्यावरून परतताच ध्यानचंद यांना लान्स नाईक बढती मिळाली.

अ‍ॅमस्टरडॅम येथे १९२८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथमच हॉकीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय हॉकी महासंघाने भारतीय संघाची निवड करण्यासाठी आंतर-परगण्यांच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. यात युनायटेड प्रोव्हिन्सेस, पंजाब, बंगाल, राजपुताना व सेंट्रल प्रोव्हिन्सेस या पाच संघांचा समावेश होता. या स्पर्धेत युनायटेड प्रोव्हिन्सेस संघाकडून खेळण्यासाठी ध्यानचंद यांनी आर्मीची परवानगी मिळविली.

सेंटर फॉर्वर्ड म्हणून खेळणारे ध्यानचंद आणि इनसाईड राईट मार्टिन यांनी अनोखा ताळमेळ दाखवत या स्पर्धेत धमाल उडवली व युनायटेड प्रोव्हिन्सेसने ही स्पर्धा आरामात जिंकली. ध्यानचंद यांच्या कौशल्यपूर्ण खेळाने सर्वानाच भुरळ घातली आणि ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघातील त्यांचा प्रवेश निश्चित झाला.

ऑलिम्पिकसाठी अ‍ॅमस्टरडॅमला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ मुंबईत आला, पण मुंबईविरुद्धच्या सराव सामन्यात त्यांना ३-२ असा पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचा निरोप समारंभ तसा थंडच झाला.

मात्र भारताने नंतर इंग्लंडमधील ११ सराव सामने आणि नंतर ऑलिम्पिकसाठी अ‍ॅमस्टरडॅम येथे दाखल झाल्यानंतर सराव सामन्यांमध्ये हॉलंड, बेल्जियम, जर्मनीसारख्या संघांना सराव सामन्यात धूळ चारली होती. पहिल्याच ऑलिम्पिक लढतीत भारताने ऑस्ट्रियाला ६-० असे नमवून तर बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झर्लंड या संघांवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.

अंतिम फेरीत यजमान नेदरलँडवर ३-० असा विजय मिळवत ध्यानचंद यांनी भारताला हॉकीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पाच लढतींत त्यांनी तब्बल १४ गोल केल्याने हॉकी विश्वात हॉकीतील जादूगार अशी त्यांची कीर्ती पसरली. जाताना थंडे स्वागत झालेल्या या संघाचे विजयानंतर मात्र मायदेशात जल्लोशात स्वागत झाले. १९३२च्या ऑलिम्पिकमध्येही भारतीय संघाने अपराजित राहत अंतिम फेरीत अमेरिकेवर २४-१ असा मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी घातली.

१९३६च्या बर्लिन ऑलिम्पिकसाठी भारतीय संघ बर्लिनला पोहोचला आणि पहिल्याच सराव सामन्यात त्यांना जर्मनीकडून ४-१ असा पराभव सहन करावा लागला. या पराभवाने डिवचलेल्या ध्यानचंद यांच्या संघाने प्रत्यक्ष स्पर्धेत मात्र हंगेरी, अमेरिका, जपान, फ्रान्स या संघांविरुद्ध लीलया विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र तेथे यजमान जर्मनीविरुद्धच लढत होणार असल्याने भारतीय संघ थोडा नव्‍‌र्हस होता. मात्र अंतिम सामन्याला सुरुवात होताच ध्यानचंद यांच्या जादूई खेळाने जयमानांना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही व भारताने ८-१ असा विजय मिळवत ऑलिम्पिक सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साजरी केली. तीन ऑलिम्पिकमधील १२ लढतींत ध्यानचंद यांनी ३३ गोल लगावले.

क्रिकेटमधील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि ध्यानचंद यांची गाठ एकदा पडली. १९३५ मध्ये भारतीय हॉकी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्यांची भेट झाली. त्या वेळी ब्रॅडमन यांनी ध्यानचंद यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना, ध्यानचंद हे क्रिकेटमध्ये धावा कराव्यात त्याप्रमाणे गोल करतात, असे म्हटले होते. एकाअर्थी ते खरेच आहे, कारण आपल्या कारकिर्दीत यांनी एक हजारापेक्षा अधिक गोल केले आहेत.

’’ १९२८ अ‍ॅमस्टरडॅम, १९३२ लॉस एंजेलिस आणि १९३६ बर्लिन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताला सुवर्णपदके मिळवून दिली होती. १९५६ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

माहिती संकलन – अमरीन पठाण

Credit – Vikaspedia

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *