Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नीलांबरी जोशी यांना ‘माध्यमकल्लोळ’ पुस्तकासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य वाङ्‌मयीन पुरस्कार जाहीर

मनोविकास प्रकाशन संस्थेस २०२३ सालासाठीचा राज्य शासनाचा श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर

मुंबई/पुणे, दि. १०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने दरवर्षी राज्य वाङ्‌मयीन पुरस्कार दिले जातात. विविध विभागांतर्गत दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. मराठीतील आघाडीच्या लेखिका नीलांबरी जोशी यांना त्यांच्या ‘माध्यमकल्लोळ’ या पुस्तकासाठी राज्यशास्त्र/समाजशास्त्र विभागांतर्गत दिला जाणारा २०२२ सालासाठीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशन Manovikas Prakashan संस्थेने ‘माध्यमकल्लोळ’ हे माध्यम विश्वाचा विस्तृतपणे धांडोळा घेणारे ५६५ पानी पुस्तक प्रकाशित केले आहे. योगायोग म्हणजे मनोविकास प्रकाशन संस्थेस २०२३ सालासाठीचा राज्य शासनाचा श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे.

जाणून ‘माध्यमकल्लोळ’ पुस्तकात नेमक्या कोणत्या विषयांना स्पर्श केला गेलाय

या पुस्तकात एकूण तीन भाग आणि दहा प्रकरणं आहेत. पहिल्या ओळख या भागातल्या पहिल्या प्रकरणात आज सोशल मीडियामुळे आपण मानसिक स्वास्थ्य कसं हरवून बसलो आहोत त्याच्या कारणांबद्दल थोडक्यात लिहिलं आहे. ‘इसापनीती’ सारख्या मौखिक कम्युनिकेशन पासून इंटरनेट पर्यंत माध्यमांचा विकास कसा होत गेला याचा आढावा दुसऱ्या प्रकरणात आहे.

पुस्तकाचा दुसरा भाग माध्यमांचा विकास आणि त्याचे मानसशास्त्रीय परिणाम हा सहा प्रकरणांमध्ये विभागला आहे. ग्राहक ही माणसाची ओळख औद्योगिक क्रांतीनंतर वाढत गेली. माणसाला ग्राहक बनवण्यात जाहिरातींचा कसा हात होता हे पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात लिहिलं आहे. किती वेळा जाहिरात दाखवली तर मानवी मेंदूवर कसा परिणाम होतो, त्यानुसार जाहिरात कशी दाखवावी याबद्दलच्या मार्केटिंगच्या थेअरीज कशा विकसित झाल्या? त्यानुसार लहान मुलं स्त्रिया यांना मोहात पाडणाऱ्या जाहिराती कशा तयार केल्या गेल्या; मुलांनी पालकांकडे वस्तू घेण्याचा हट्ट करावा यासाठी काय करता येईल यावर मानसशास्त्रज्ञांनी कसं योगदान(!) दिलं अशा गोष्टी या प्रकरणात वाचायला मिळतील.

माध्यम विश्वाचा वेध घेणारं 'माध्यमकल्लोळ' तुम्ही वाचलंत का? - Maharashtra Varta

माध्यमांमुळे हिंसा वाढते का? हा प्रश्न सतत चर्चेत असतो चौथ्या प्रकरणात निरनिराळ्या माध्यमांमधून दिसणाऱ्या हिंसेचा समाजात उमटणाऱ्या हिंसेवर परिणाम होतो का? माध्यमांमध्ये हिंसा पाहून मानसिकता बदलते का यावर लिहिलं आहे. माध्यमांमुळे चंगळ वाद कसा वाढीला लागतो यावर पाचव्या प्रकरणात लिहिताना आपण कन्सुमर कसे बनत गेलो त्याचा इतिहासही लिहिला आहे.

सौंदर्य सौंदर्य प्रसाधनांमुळे आणि जंग फूड मुळे होणारे शारीरिक आणि मानसिक परिणामही या प्रकरणात वाचायला मिळतील. ग्राहक म्हणून वस्तू विकत घेताना ग्राहकाचं मानसशास्त्र हा विषय महत्त्वाचा असतो. रिचर्ड थीलर या अर्थशास्त्रज्ञाला यासाठी २०१७ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं होतं. ऑनलाइनच्या विश्वात तर आपली मानसिकता वस्तू किंवा सेवा विकत घेण्यासाठी वळवण्याकडे कंपन्यांचा आटापिटा चालू आहे. त्यामुळे ‘बिहेवियरल इकॉनॉमिक्स’ या विषयावरही या प्रकरणात दोन लेख लिहिले आहेत. जनसामान्यांची मतं हवी तशी वळवून घेण्यासाठी अजून एक हत्यार कायम वापरलं जातं ते म्हणजे प्रोपागंडा! माध्यमांचा वापर प्रोपागंडासाठी गोबेल्स पासून अनेकांनी कसा करून घेतला ते या पुस्तकाच्या सहाव्या प्रकरणात मांडलं आहे.

आजच्या जगात माध्यमांमुळे ज्या दोन गोष्टींनी माणसाची झोप खरोखर उडवली आहे त्या म्हणजे पोर्नोग्राफी पाहण्याचे व्यसन आणि टीव्ही-वेब मालिकांचा अतिरेक. माणसाची झोप हा आमचा स्पर्धक आहे हे नेटफ्लिक्सचा संस्थापकाचं वाक्य त्यामुळेच मध्यंतरी खूप गाजलं. या दोन गोष्टींबद्दल अनुक्रमे सातव्या आणि आठव्या प्रकरणात लिहिलं आहे. पुस्तकाचा तिसरा भाग सोशल मीडिया हा आहे. या भागात फिल्टर बबल्स, सायबर बुलिंग, सेक्सटिंग, नोमोफोबिया, टेक्नोफरंस, ऑनलाइन शॉपिंगचं व्यसन, टिक टॉक चे दुष्परिणाम, ट्रोलिंग, समाज माध्यमांमुळे वाढलेलं नैराश्य आणि नार्सिसिझम, समाज माध्यमांमुळे वाढलेली तुलना, लाईक्सचा चकवा, समाज माध्यमांचा झोपेवरचा परिणाम, फेक न्यूज आणि समाज माध्यमांच्या व्यसनातून बाहेर येण्याचे उपाय यावर एकूण २३ लेख आहेत.

प्रकाशनानंतर अल्पावधीतच ‘माध्यमकल्लोळ’ ने पत्रकार, सोशल मीडिया मॅनेजर्स, माध्यम सल्लागार, विविध संस्थांतील जनसंपर्क अधिकारी (PRO), मार्केटिंग प्रोफेशनल्स, मास मीडिया/पत्रकारितेचे विद्यार्थी अगदी सोशल मीडिया इंफ्लूएनसर्स यांच्यासाठीही एक दिशादर्शक, ज्ञानाचा खात्रीशीर स्त्रोत म्हणून भूमिका बजावण्यास सुरवात केली आहे. मराठीत या विषयावर लिखाण फारच नगण्य प्रमाणात झाले आहे हे नमूद करणे भाग आहे. नीलांबरी जोशी Neelambari Joshi यांनी जवळपास चार वर्ष ‘माध्यमकल्लोळ’ MadhyamKallol लिहिण्याच्या प्रक्रियेत खर्च केली. त्या मेहनतीची एक प्रकारे पोच पावती म्हणून राज्य वाङ्‌मयीन पुरस्कार जाहीर झाल्यामुळे नीलांबरी जोशी यांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच सर्व वाचक, समीक्षक, प्रकाशकांसह राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

Image Credit – Neelambari Joshi FB Account

पुस्तक घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा

१.  बूक गंगा डॉट कॉम – माध्यमकल्लोळ 

२. अमेझॉन Amazon – माध्यमकल्लोळ

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *