Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“नवीन करंजा मत्स्य बंदरांची उंची सहा फुटाने वाढवा”

खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी

उरण, दि.२२(विठ्ठल ममताबादे): मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा मत्स्य बंदराचे नव्याने काम सुरु आहे. या बांधकामाची उंची व भरतीच्या पाण्याची उंची यामध्ये फक्त एकच फुटाची तफावत आहे. त्यामुळे मोठ्या भरतीच्यावेळी आणि जोरदार वाऱ्यामुळे लाटा तयार झाल्यावर मासेमारी नौकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे नवीन कंरजा बंदराची सहा फुटाने उंची वाढवावी. नौकानयन मार्गाची (चॅनेल) ७० मीटरने रुंदी वाढवावी. बंदर प्रकल्पाच्या दक्षिण बाजूला (बाहेर) दगडाचे बांधकाम न करता सिमेंट काँक्रीटची भिंत बांधावी, अशी आग्रही मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली.

नवीन बंदरामुळे मच्छिमारांना येत असलेल्या अडचणी, समस्या खासदार बारणे यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेतली. मच्छिमारांना येणाऱ्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

खासदार बारणे म्हणाले, नवीन करंजा मत्स्य बंदराचे काम अंतिम टप्प्यात आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे बंदराची उंची कमी केली जात आहे. ते धोकादायक आहे. जोरदार हवामानामुळे समुद्रातील लाटांचे पाणी आतमध्ये शिरुन मासेमारी नौकांचे नुकसान होऊ शकते. बंदराचे काम पूर्ण झाल्यानंतर उंची वाढविल्यास काम एकजीव होणार नाही. मासेमारी नौकांची ठोकर लागून काम पडून जाईल. त्यासाठी आत्ताच कंरजा बंदराची ५ ते ६ फुटाने उंची वाढवावी. सध्या तयार केलेला नौकानयन मार्गाची (अॅप्रोच चॅनेल) फक्त 50५० मीटर रुंद आहे. याचा अर्थ ऑपरेशन्ससाठी फक्त ४० मीटर वापरली जाईल. यामुळे चॅनेलमध्ये मासेमारी करणाऱ्या बोटींसाठी वाहतुकीची कोंडी होईल. फिशिंग बोटींच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभतेसाठी या वाहिनीचा आकार २० मीटर पर्यंत वाढविणे आवश्यक आहे. याची लांबी ७० मीटर असावी. ब्रेकवॉटरच्या भिंतीची लांबी खूपच लहान आहे. खराब हवामान आणि जोरदार वारा आल्यास मासेमारीसाठी बोटींना अडचणी येतील. त्यामुळे त्याची लांबी सध्याच्या लांबीपेक्षा कमीतकमी १५० मीटरने वाढवावी.

प्रकल्पाच्या दक्षिणेकडील भागात (करंजा फिशिंग हार्बर) फक्त दगडी भिंत बांधली जाणार आहे. ही संसाधने व जागेचा अपव्यय ठरेल. त्यासाठी काँक्रीटीकरणाची भिंत बांधावी. जेणेकरुन त्यात मासेमारी होडीची क्षमता वाढेल. इंजिन दुरुस्त करण्यासाठी तसेच मासेमारी करणाऱ्या बोटींच्या इतर दुरुस्तीसाठीही याचा उपयोग होईल. बंदराच्या बांधकामुळे करंजा नवपाडा येथील नैसर्गिक ड्राय डॉग प्रकल्प विस्थापित झाला आहे. या पर्यायी बंदराच्या संरक्षणासाठी वादळी वारा सुरक्षिततेची काळजी घ्यावी. एक बोट दुसऱ्या बोटीवर आपटू नये यासाठी बांधलेल्या ब्रेक वॉटरची आत्ताची लांबी २०० मीटर आहे. त्यात १५० मीटरने वाढ केली पाहिजे. जेणेकरुन काम करत असलेल्या बोटींचे नुकसान होणार नाही.

करंजा मत्स्य बंदर बहुउद्देशीय वापरासाठी २० एकर जमीन पुरवतो. यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित होतील. स्थानिक तरुणांना अधिक रोजगार उपलब्ध होईल. मासेमारीवर आधारित उपक्रमांना संधी मिळेल. महिला सक्षमीकरण होऊन स्थानिक महिला मासेमारीच्या कामांमध्ये तसेच विक्रीपासून ते प्रक्रियेपर्यंत सहभाग घेतील, असेही खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे. यामुळे आता उंची वाढविण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *