
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने(सीसीपीए) पुण्यातील आयआयटीयन प्रशिक्षण केंद्र या खाजगी कोचिंग संस्थेला आयआयटी-जेईई निकालांबाबत दिशाभूल करणारे दावे केल्याबद्दल ठोठावला ३ लाख रुपयांचा दंड
पुणे, दि. १५: आयआयटी-जेईई परीक्षांच्या निकालांबाबत दिशाभूल करणारे दावे केल्याबद्दल, आयआयटीयन प्रशिक्षण केंद्र प्रा. लि.(आयआयटीपीके) IITian’s Prashikshan Kendra Pvt. Ltd. (IITPK) या कोचिंग संस्थेला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने(सीसीपीए) तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ च्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा सेवांची खोटी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात केली जाणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.सीसीपीएने आतापर्यंत विविध कोचिंग संस्थांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी ४६ नोटिसा बजावल्या आहेत. सीसीपीएने २४ कोचिंग संस्थांना ७७ लाख ६० हजारांचा दंड ठोठावला आहे आणि त्यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे उल्लंघन विचारात घेऊन, मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील सीसीपीएने आयआयटीयन प्रशिक्षण केंद्र प्रायव्हेट लिमिटेड (आयआयटीपीके) विरोधात एक आदेश जारी केला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील अव्वल विद्यार्थ्यांचे चुकीचे प्रदर्शन : या संस्थेच्या जाहिरातीत “आयआयटी टॉपर” आणि “नीट टॉपर” यांसारख्या अगदी ठळक शीर्षकांखाली ‘१’ आणि ‘२’ असे ठळक क्रमांक उमेदवारांची नावे आणि छायाचित्रांसमोर प्रदर्शित करण्यात आले होते. अशा प्रकारच्या चुकीच्या प्रदर्शनातून असा भासवण्याचा प्रयत्न होता की संबंधित विद्यार्थ्यांनी संबंधित परीक्षांमध्ये अखिल भारतीय स्तरावर हे क्रमांक मिळवले आहेत. प्रत्यक्षात हे विद्यार्थी केवळ त्या संस्थेमध्ये अव्वल आले होते आणि राष्ट्रीय स्तरावर नव्हते ही बाब या संस्थेने जाणीवपूर्वक दडवली होती. अशा प्रकारच्या चुकीच्या प्रदर्शनामुळे लक्ष्यित ग्राहक (प्राथमिकतः ७ वी ते १२ वी इयत्तांचे १४-१७ वयोगटातील) असलेल्या विद्यार्थ्याच्या निर्णयावर मोठा प्रभाव निर्माण होऊ शकतो. या संस्था सातत्याने राष्ट्रीय स्तरावर अव्वल येणाऱे विद्यार्थी तयार करत असल्याची धारणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या कोचिंग संस्थेची निवड करण्याच्या निर्णयावर खोट्या दाव्यांचा प्रभाव पडू शकतो.
आयआयटी क्रमांकाबाबत दिशाभूल करणारे दावे : या संस्थेने दावा केला. “गेल्या २१ वर्षात आयआयटीपीके ने १३८४ आयआयटी प्रवेशपात्र विद्यार्थी घडवले”, ज्यातून असे सूचित होते की या संस्थेने प्रशिक्षण दिलेल्या १३८४ विद्यार्थ्यांना प्रतिष्ठेच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश मिळाले
भ्रामक परिणामः या जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारे हे स्पष्ट करण्यात आले नव्हते की सर्वच्या सर्व १३८४ विद्यार्थ्यांची आयआयटी मध्ये निवड झाली नव्हती. “आयआयटी रँक्स” हा शब्दप्रयोग करून या संस्थेने ग्राहकांची अशा पद्धतीने दिशाभूल केली की या विद्यार्थ्यांना सर्वस्वी आयआयटीमध्येच प्रवेश मिळाला ज्यामुळे त्यांच्या यशाचा दर खूपच जास्त वाढवून सांगण्यात आला. याचा तपास केल्यावर सीसीपीएला (केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण) असे आढळले की या संस्थेने दिलेल्या यादीमध्ये आयआयटी, आयआयआयटी, एनआयटी, बीआयटी, मनिपाल विद्यापीठ, व्हीआयटी वेल्लोर, पीआयसीटी, पुणे, एमआयटी, पुणे, व्हीआयटी पुणे आणि इतर शैक्षणिक संस्था अशा विविध संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यशप्राप्तीदराचे दिशाभूल करणारे दावेः फुगवलेले आणि अपात्र निवेदने : या संस्थेने त्यांच्या जाहिरातीत ठळक अक्षरात असे दावे केले की. “दर वर्षागणिक यशाचे सर्वोच्च गुणोत्तर”, “२१ वर्षांपासून सर्वोत्तम यशाचे गुणोत्तर” आणि “यशाचे गुणोत्तर ६१ %”. या संदर्भात कोणतीही पुष्टी करणाऱ्या आकडेवारीविना असे दावे करण्यात आले ज्यामुळे ग्राहकांमध्ये असा समज निर्माण झाला की या संस्थेत प्रवेश घेणाऱ्यांपैकी ६१ टक्के विद्यार्थ्यांना आयआयटीत प्रवेश मिळाला. या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी या संस्थेने कोणत्याही प्रकारची तुलनात्मक आकडेवारी किंवा त्रयस्थ पक्षाची पडताळणी सादर केली नाही. सुनावणीच्या वेळी या संस्थेने असे सांगितले की “यशाचे गुणोत्तर” या शब्दप्रयोगाचे स्पष्टीकरण वेबिनारमध्ये आणि प्रत्यक्ष उपस्थितीत होणाऱ्या समुपदेशनात करण्यात आले. मात्र,या दाव्यांचा प्राथमिक मंच म्हणजे या जाहिराती होत्या,ज्यामध्ये अशा प्रकारचे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. महत्त्वाची माहिती अग्रस्थानी प्रदर्शित न करता,अशा प्रकारच्या डावपेचांमुळे प्रवेश घेण्याच्या तयारीत असलेल्या संभाव्य विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होते. सीसीपीएला असे आढळले की विद्यार्थ्यांना आपल्याला हवा असलेला अभ्यासक्रम किंवा कोचिंग संस्था/मंच निवडताना योग्य माहितीवर आधारित निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरणारी महत्त्वाची माहिती संस्थेने जाणीवपूर्वक दडवली होती.त्यामुळे या प्रभावाखाली येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आणि अनुचित व्यापार प्रथांना आळा घालण्यासाठी हा दंड लागू करण्याचा निर्णय सीसीपीएला घ्यावा लागला.
(केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या https://doca.gov.in/ccpa/orders-advisories.php?page_no=1 या वेबसाईटवर अंतिम आदेश उपलब्ध आहे.)