राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मुंबई, दि. १६ : राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार विविध भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून उष्ण व दमट हवामानाचा प्रभाव जाणवणार आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिल, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल, विदर्भात १५ ते १९ एप्रिल तसेच कोकणात १५ ते १७ एप्रिल या कालावधीत काही ठिकाणी उष्णतेची लाट तीव्र राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी भरपूर पाणी व ओआरएसचे सेवन करावे, हलके व सैल कपडे वापरावेत तसेच बाहेर पडताना डोक्याचे संरक्षण करण्यासाठी टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, असे सूचित करण्यात आले आहे. शक्यतो सावलीत विश्रांती घ्यावी व दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींची काळजी घेण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.
उष्णतेच्या काळात मद्यपान आणि कॅफिनयुक्त पेये टाळावीत तसेच तीव्र उन्हात दीर्घकाळ काम करणे टाळावे. लहान मुले किंवा प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाच्या पातळीवरही आवश्यक तयारी करण्यात येत असून सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जिल्हास्तरावर उष्णता कृती आराखडा कार्यान्वित करणे, रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध ठेवणे यावर भर देण्यात येत आहे. शाळांना आवश्यक सूचना देणे, वेळापत्रकात बदल करणे तसेच विविध माध्यमांतून जनजागृती करण्याच्या उपाययोजनाही राबविण्यात येत आहेत.
याशिवाय, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सावली, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामगार, शेतकरी तसेच बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींनी सकाळी किंवा संध्याकाळी काम करावे, नियमित विश्रांती घ्यावी आणि उष्माघाताची लक्षणे लक्षात ठेवावीत, असेही सांगण्यात आले आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि उद्योग क्षेत्राने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.
