महाराष्ट्राला प्रथमच मिळाला हा बहुमान, १५ नोव्हेंबरपासून मानांकनाचा हंगाम सुरू
रत्नागिरी/रायगड, दि. ११ : महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यांना जागतिक पर्यटनाच्या नकाशावर नवी ओळख मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर आणि गुहागर, तसेच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तीन किनाऱ्यांची २०२६-२७ हंगामासाठी आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकनाकरिता निवड झाली आहे. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळत असल्याने किनारपट्टी पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी ही महत्त्वाची घडामोड ठरली आहे.
समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरणाचे रक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि पर्यटकांची सुरक्षितता अशा विविध बाबींच्या आधारे हे मानांकन दिले जाते. त्यासाठी आवश्यक सुविधा आणि पर्यटन व्यवस्थापनाचे आंतरराष्ट्रीय निकषही पूर्ण करावे लागतात. या निकषांची पूर्तता केल्यामुळे लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या किनाऱ्यांचा समावेश यंदाच्या यादीत झाला आहे.
या यशासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि पर्यटन विभागासह संबंधित जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती आणि बीच व्यवस्थापन समित्यांनी प्रयत्न केले. स्थानिक नागरिक आणि विविध शासकीय यंत्रणांच्या सहभागाचाही या प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगण्यात आले आहे.
या मानांकनामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील इतर पात्र समुद्रकिनाऱ्यांच्या विकासालाही दिशा मिळू शकते. पर्यावरणाचे संरक्षण कायम ठेवून पर्यटन सुविधा विकसित करणे, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि पर्यटन व्यवसायाला चालना देणे, असे अपेक्षित लाभ या उपक्रमातून साधता येऊ शकतात.
नव्याने मानांकन मिळालेल्या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांसाठी १५ नोव्हेंबर २०२६ पासून ब्ल्यू फ्लॅग हंगाम सुरू होणार आहे. या पुरस्काराचे अधिकृत ध्वज नेदरलँड्स येथून पाठवण्यात येत असून, ते राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे सुपूर्द केले जाणार आहेत. त्यानंतर संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून तिन्ही ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे.
देशपातळीवर यंदा २०२६-२७ हंगामासाठी एकूण २२ समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळाले आहे. यामध्ये यापूर्वी मानांकन मिळालेल्या १३ किनाऱ्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून, ९ नवीन समुद्रकिनाऱ्यांचा समावेश झाला आहे. या नव्या यादीत महाराष्ट्रातील तीन किनारे प्रथमच दाखल झाले आहेत.
“स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेलाही चालना” – मंत्री पंकजा मुंडे
“महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ही अभिमानास्पद कामगिरी आहे. लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार मिळणे, ही राज्याच्या पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत पर्यटनाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना मिळालेली जागतिक पातळीवरील पावती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन पर्यावरण संरक्षण आणि विकास यांचा समतोल साधण्यासाठी कटिबद्ध आहे. या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जागतिक पर्यटन नकाशावर नवी ओळख मिळेल, तसेच स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. भविष्यात राज्यातील अन्य पात्र समुद्रकिनाऱ्यांचाही आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करून महाराष्ट्राला शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचे अग्रगण्य केंद्र बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू – पंकजा मुंडे, मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल”
लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धनला मिळालेल्या या मानांकनामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. मात्र, हा दर्जा टिकवण्यासाठी किनाऱ्यांची स्वच्छता, पर्यावरणीय संतुलन, सुरक्षितता आणि सुविधांची गुणवत्ता सातत्याने राखणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान असेल.
Photo Credit/Source – GDIPR Maharashtra

