ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम; लाखो रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त, सहा जणांना अटक
ठाणे, दि. २८ : ठाणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ मे २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत विविध अन्न आस्थापनांवर छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान सुमारे ७ लाख ३० हजार रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये एकाच वेळी तपासणी मोहीम राबवली. या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान खाद्यतेल, फरसाण, तूप, हक्का नुडल्स, ताडी, शरबत तसेच डिंक यांसारख्या पदार्थांचा मोठा साठा संशयास्पद स्थितीत आढळून आला.
कारवाईत १ लाख ४९ हजार ७२४ रुपयांचे खाद्यतेल, ९३ हजार ८३० रुपयांचे फरसाण, २ लाख ६ हजार ८०० रुपयांचे तूप, ८ हजार १९० रुपयांचे हक्का नुडल्स, १७ हजार १०० रुपयांची ताडी, ५४ हजार ९६ रुपयांचे शरबत आणि १ लाख ९७ हजार ६४० रुपये किंमतीचा डिंक जप्त करण्यात आला आहे. या सर्व पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
याच दिवशी प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. आरोपींकडून सुमारे ४ लाख ५३ हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेषतः बनावट, निकृष्ट किंवा प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका किंवा तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा किंवा वागळे इस्टेट, ठाणे येथील सहआयुक्त कार्यालयात लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण आणि सुरक्षित अन्नपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या धडक मोहिमा पुढील काळातही सातत्याने सुरू राहतील, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
