Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वाचा “लग्न करुन माणसं खरोखर सुखी असतात का? ”

वाचा “लग्न करुन माणसं खरोखर सुखी असतात का? ”

“आणि ते दोघं सुखानं नांदू लागले..” लहानपणापासून ऐकलेल्या अनेक कथांमध्ये हे भरतवाक्य हमखास असतं. त्यामुळेच लग्न हा आजही आयुष्याचा अविभाज्य भाग मानला जातो. त्यामुळेच चाळिशीत पोचलेली आणि अविवाहित असलेली व्यक्ती कायम “बिच्चारी” ठरते. आयुष्यातल्या महत्वाच्या अचिव्हमेंटस मोजताना लग्न हा प्रकार फार मोठी भूमिका निभावतो. “त्याला किंवा तिला साधं लग्न टिकवता आलं नाही” असे शेरे/ताशेरे सर्रास ओढले जातात. याबाबत ७००० जर्मन लोकांचं दर दोन महिन्यांनंतर एकदा असं मत पाच वर्षं काही मानसशास्त्रज्ञ विचारात घेत होते. “दीर्घकाळ टिकलेलं लग्न हा त्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारा महत्वाचा घटक असल्याचं” त्यापैकी ९० टक्के लोकांनी मान्य केलं होतं. पण ते सर्वजण आनंदात होते का त्रासात होते का या दोन भावनांच्या आंदोलनांवर हेलकावे खात होते याचा त्यांच्या मतांशी काही संबंध नव्हता…! “हॅपी एव्हर आफ्टर – एस्केपिंग द मिथ आॉफ परफेक्ट लाईफ” या पुस्तकात पॉल डोलान यानं “लग्न करुन माणसं खरोखर सुखी असतात का” या प्रश्नाचा वेध घेताना हे विचार मांडले आहेत.

४० लाख वर्षांमध्ये समाजात “दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी एकत्र रहाणं” या पध्दतीत दोन महत्वाचे टप्पे येऊन गेले. शेतीप्रधान संस्कृती सुरु झाल्यावर आधी भटक्या असलेला माणूस एका ठिकाणी रहायला लागला. त्यातून लग्न हा सामाजिक करार उदयाला आला. दुसरा टप्पा म्हणजे, इंटरनेटच्या उदयामुळे डेटिंग आणि मेटिंगच्या पध्दतींमध्ये आमूलाग्र बदल घडला असं जस्टिन गार्सिया या जीवशास्त्रज्ञ आणि मानवी लैंगिकतेवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचं मत आहे.

सोशल मिडियावरुन जोडीदार निवडताना असंख्य चेहऱ्यांमधून एक जोडीदार निवडता येऊ शकणं ही कल्पना आकर्षक वाटणं साहजिक आहे. पण प्रत्यक्षात मात्र चित्र निराशाजनक आहे. एक तर सोशल नेटवर्किंग साईटसवर फोमो – Fear of missing out म्हणजे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे महत्वाचं काहीतरी गमावण्याची धास्ती – हा प्रकार खूप भेडसावतो. त्यातून डेटिंग म्हणजे शॉपिंग होऊन बसतं. आपण बुटांच्या, कपड्यांच्या, मोबाईल फोन्सच्या जाहिरातींमधली चित्रं जशी सरकवत जातो, तसं जोडीदार निवडताना आपण आकर्षक चेहरे आपल्या डेटिंग बास्केटमध्ये जमा करत जातो. नवीन चेहरे सतत दिसत असतातच. मग क्षणभरापूर्वी निवडलेला चेहरा लगोलग आपला तजेला गमावून बसतो. स्क्रीनवरचे चेहरे ही एक कमोडिटी होऊन बसते. चांगला किंवा नवीन पर्याय आल्यावर जुनी वस्तू सहज फेकली जाते तसं घडतं. शॉपिंग कधी थांबतच नाही. अर्थतज्ञ असे पर्याय उपलब्ध असल्याचे गोडवे गात असले तरी मानसशास्त्रज्ञ मात्र याची मानसिक किंमत किती मोजायला लागते त्याबद्दल इशारे देत असतात.

 

“बॅरी श्वार्टझ” यानं आपल्या “द पॅरॉडॉक्स आॉफ चॉईस” या पुस्तकात हे सविस्तरपणे मांडलं आहे. अनेक पर्यायांमधून एक निवडण्यापूर्वी आणि निवडल्यानंतर दोन्ही वेळा आपल्याला आपण निवडलेल्या पर्यायाचा त्रास होऊ शकतो. म्हणजे टीव्ही किंवा मोटारगाडी निवडल्यानंतर जसं “अरे, ते मॉडेल घ्यायला हवं होतं, अपना चुक्याच” असं अनेक नवनवीन पर्याय समोर आल्यामुळे वाटत जातं. तसंच जोडीदाराबाबत निवडलेली व्यक्ती चुकीची निवडली असं वाटण्याचं प्रमाण सोशल मिडियावरुन निवड केल्यावर वाढू शकतं. एकदा जोडीदार निवडल्यावरही परत पर्याय बघणं हा प्रकार यातूनच सुरु आहे. टिंडर या डेटिंग अॅपवर पाचपैकी दोन व्यक्ती आधीच रिलेशनशिपमध्ये असतात असं १७००० जणांच्या एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. टिंडर वापरणारा दिवसातून ११ वेळा लॉग इन करतो.

यासाठी एक प्रयोग करताना, हार्वर्ड विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना १२ फोटोग्राफ्स दिले. त्या फोटोंमधले “दोन उत्कृष्ट फोटो निवडा, त्यापैकी एक तुमच्याकडे ठेवा” असं त्यांना सांगितलं. “निवड केल्यानंतर ती बदलता येणार नाही” किंवा “तुम्हाला निवडलेला फोटो बदलायची संधी आहे” असे दोन पर्यायही दिले होते. त्यापैकी “फोटो बदलायची संधी” हा पर्याय २/३ जणांनी स्वीकारला. पण ज्यांनी “फोटो बदलता येणार नाही” हा पर्याय निवडला ते जास्त आनंदात होते.

सोशल मिडियाबाबत, प्रेमात पडल्यानंतर आपलं जोडीदाराबरोबरचं नवीन नातं फेसबुकवर दाखवण्यात स्त्रिया अग्रेसर असतात. ते करणं त्यांना पुरुषांच्या तुलनेत जास्त योग्य वाटतं. फेसबुकवर असं जाहीर करण्यातून प्रेम आणि कमिटमेंट दोन्ही दिसून येतं हे जितकं खरं आहे तितकंच धोरणीपणातून जोडीदारावर नियंत्रण राखण्यासाठीही वापरलं जातं. अशा प्रकारे सोशल मिडियावर आपले नातेसंबंध जाहीर करणाऱ्यांचा सेल्फ एस्टीम कमी असतो असं संशोधन सांगतं. अशा अनेक गोष्टी पुस्तक वाचताना समोर येतात.

जाता जाता, एकट्या रहाणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेत विवाहित स्त्रियांचं मानसिक आणि शारिरिक आरोग्य यात जास्त समस्या असतात, वैवाहिक आयुष्य सुखाचं नसेल तर पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त त्रास होत असतो.. त्यामुळेच गॉन वुईथ द विंडमधली स्कार्लेट ओ हारा, Marriage, fun? Fun for men, you mean!’ असं म्हणते हा उल्लेख विचार करायला लावतो.

  • नीलांबरी जोशी (लेखिका – कॉर्पोरेट कल्लोळ)

संदर्भ
Happy Ever After: Escaping the myth of perfect life : By Paul Dolan

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *