Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोरोना लसीकरण खरंच प्रभावी आहे का? वाचा डॉ. चंद्रशेखर साठये यांचा स्फोटक लेख

व्हॅक्सिनकल्लोळ

व्हॅक्सिन्स – अर्थात रोगप्रतिबंधक लसींचा सार्वजनिक आरोग्य सुधारणांमध्ये फार महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. देवी – स्मॉल पॉक्स – च्या आजाराचे – जगातून निर्मूलन होण्यामागे देवाच्या प्रभावी लसीच्या सार्वत्रिक लसीकरणाचा १०० टक्के वाटा आहे. पोलिओ, धनुर्वात, रेबीज अशा अनेक आजारांकरिता प्रभावी लसी उपलब्ध आहेत – ज्यांच्या वापराने अनेक मृत्यू रोखले गेले, अनेक जणांना कायमच्या अपंगत्व येण्यापासून रोखले गेले.
देवीच्या आजाराकरिता १७९६ मध्ये एडवर्ड जेन्नरने शोधलेली एकच लस – जी DRYVAX नावाने एकाच कंपनीने एकच तंत्रज्ञानाचा वापर करून बनवली – १९८० पर्यंत – देवीच्या रोगाचे जगातून उच्चाटन होईपर्यंत वापरात होती.

पोलिओच्या मुख्य लसी या तीनचार कंपन्यांनीच मुख्यत्वेकरून दोन प्रकारचे तंत्रज्ञान वापरून बनवल्या – व या गेली सत्तर वर्षे वापरात आहेत – त्यांच्या आधारे आपण पोलिओ निर्मूलनाचे स्वप्न पाहत आहोत. कोरोनाविरुद्ध काम करण्याचा दावा करणाऱ्या मात्र आतापर्यंत (हा लेख लिहीपर्यंत) जगात विविध देशांनी मान्यता दिलेल्या (विविध कंपन्यांनी बनवलेल्या) लसींची संख्या १३ आहे. यात भारतीय कोव्हॅक्सिन, भारतात बनवले जाणारे ब्रिटिश-स्वीडिश कोव्हिशील्ड, भारतात येऊ घातलेले रशियन स्पुटनिक, कोव्हाव्हॅक्स, चिनी सायनोव्हॅक, अमेरिकन फायझर, मॉडर्ना आहेत. आणि मान्यतेसाठी संशोधन-अवस्थेत असलेल्या (विविध कंपन्यांनी बनवलेल्या) कोरोना लसींची संख्या सुमारे ६० आहे. यातल्या बहुतांश लसी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून बनवल्या गेल्या आहेत. एकच लस सुरक्षित आणि प्रभावी असती तर इतर लसी बनवाव्याच लागल्या नसत्या, किंवा त्या बाजारात टिकल्याच नसत्या.

काही लसनिर्माते (उदा जॉन्सन आणि जॉन्सन किंवा रशियन स्पुटनिक) आमची लस एकाच डोसमध्ये काम करेल असा दावा करताहेत. पण बहुतांश लसींचा अपेक्षित परिणाम येण्याकरिता त्याचे दोन डोस घेणे आवश्यक आहे असे त्या त्या लसनिर्मात्यांनी जाहीर केले आहे. बरं चांगली प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी या दोन डोसेस मधला कालावधी किती असावा यातही तज्ञांत मतभेद आहेतच. भारतात सुरुवातीला ४ ते ६ आठवडे असा ठरवलेला कालावधी आता कोव्हिशिल्डकरिता ८ आठवडे ठरवला गेला आहे. युरोप – अमेरिकेत हा कालावधी १२ आठवडे ठरवला गेला आहे.

सध्या कोरोनाकरिता मान्यताप्राप्त लसी या इंजेक्शनस्वरूपात टोचून दिल्या जात आहेत. पण चालू संशोधनानुसार असे दिसते की लवकरच नाकावाटे हुंगायच्या किंवा कॅप्सूल किंवा द्रव स्वरूपात गिळायच्या कोव्हिड लसी बाजारात येतील. कोणती लस चांगली या गोंधळून टाकणाऱ्या प्रश्नात आता कोणत्या प्रकारे लस दिल्यास (म्हणजे इंजेक्शनस्वरूपात की नाकावाटे हुंगायच्या किंवा कॅप्सूल किंवा द्रव स्वरूपात गिळायच्या स्वरूपात) लस दिल्यास ती अधिक प्रभावी, सुरक्षित व देणाऱ्यास सोपी आणि घेणाऱ्यास कमी कष्टदायक या गोंधळाची भर पडेल असे दिसते.

या लसी वेगवेगळ्या देशांमध्ये बनवल्या गेल्याने व्हॅक्सिन राष्ट्रभावनेला उत्तेजन मिळून आणखीनच वेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतात नेहमीप्रमाणे सर्व जनतेच्या डोक्यात भारतात बनलेली व्हॅक्सिन सुरक्षित आणि प्रभावी आहे, त्यावर विश्वास ठेवा असे टीव्ही, रेडिओ, मोबाईल कॉलरट्यून आदि माध्यमांतून बिंबवणे चालू झाले आहे. युरोपीय देशांनी ब्रिटिश ऑक्सफर्ड अस्ट्रा झेनेका लशीबद्दल संशय घेताच अख्खे ब्रिटिश राजकारणी आणि ब्रिटिश मीडिया ऑक्सफर्ड लशीच्या पाठराखणीसाठी मैदानात उतरणे – बोरिस जॉन्सन महाशयांनी स्वतः मीडियासमोर ऑक्सफर्ड लशीचा डोस घेणे हेही व्हॅक्सिन राष्ट्रभावना – राजकारणाचे पैलू दाखवतात.

ही व्हॅक्सिन राष्ट्रभावना माझ्या देशात बनवलेलीच लस मी घेणार एवढ्यापुरती मर्यादित न राहता – दुसऱ्या देशांतील नागरिकांनीही माझ्या देशात बनलेली लस घेतली पाहिजे कारण तीच सर्वोत्तम आहे – इथपर्यंत पोहोचली आहे. चीनमध्ये बनवलेली लस घेतलेल्यांचा चायना व्हिसा लगेच प्रोसेस करण्याच्या चीन सरकारच्या निर्णयामागची कारणमीमांसा ही आहे. हे सारे लसींकडे वा लसीकरणाकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून चिकित्सा करण्याच्या वैज्ञानिक कसोट्यांच्या विरोधात आहे आणि ते मानवजातीच्या दृष्टीने विचार करता फार हानिकारक आहे.

भारत हा अर्थातच मोठ्या प्रमाणात लसनिर्मिती करणारा देश राहिला आहे. त्यामुळे भारतीय लोकसंख्येची कोरोना लस-गरजेची पूर्तता करून ती इतरांना पुरवण्याची क्षमता भारतीय लसनिर्मिती कंपन्यांकडे आहे.

अनेक गरीब देशांना – उदा नेपाळ, अफ्रिकेतील गरीब देश, कॅरॅबियन देश यांना भारताने मोफत लस पुरवून चांगुलपणा घेतलेला आहे. युरोपातील देश व कॅनडाही भारतातल्या सीरम इन्टिट्यूटच्या कोव्हिशिल्डच्या पुरवठ्याच्या भरवशावर त्यांचे लसीकरण कार्यक्रम ठरवताहेत. सध्या तरी यामुळे भारताच्या परराष्ट्र संबंधांत व जागतिक पुढारीपणात लसींनी नवसंजीवनी निर्माण केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक आरोग्य संघटना विविध राष्ट्रप्रमुख यांच्याकडून सध्या भारताची पाठ थोपटणे चालू आहे. पुढे या लसी विकून चांगले उत्पन्नही मिळेल.

भारतीय लसींच्या सुरक्षिततेविषयी, परिणामकारकतेविषयी आणि आवश्यकतेविषयी काही तज्ञांना शंका आहेत, तरीही ती भारतातील सर्वांनी घेण्याचा आग्रह करण्यामागे व्हॅक्सिनमैत्री आणि व्हॅक्सिनविक्रीस चालना मिळावी हा हेतू आहे की काय असे वाटण्याइतपत लोकांच्या मागे लागणे चालू आहे.

कोरोनालसींच्या सुरक्षिततेविषयी, परिणामकारकतेविषयी आणि आवश्यकतेविषयी काही तज्ञांना शंका आहेत. त्या फार घाईघाईने सार्वत्रिक लसीकरणासाठी आणल्या गेल्या आहेत असा एक मतप्रवाह आहे. बहुतांश देशांमध्ये – भारतातही – आरोग्यकर्मींचे (जरी आरोग्यकर्मींना लस प्राधान्यक्रमाने दिली गेली असली तरी) लस घेण्याचे प्रमाण हे साधारणतः ५० टक्के इतकेच आहे. दक्षिण आफ्रिकेने कोव्हिशिल्ड त्यांच्या देशातील कोरोना विषाणूच्या विरोधात प्रभावी रोगप्रतिकारशक्ती निर्माण करीत नाही म्हणून त्याचा वापर थांबवला आहे,
अस्ट्रा झेनेकाचे व्हॅक्सिन – जे भारतात कोव्हिशिल्ड नावाने बनवले जाते – हे तर जागतिक स्तरावर अनेक मतभेदांचे मूळ ठरले आहे. भारतात व ब्रिटनमध्ये ते सर्व वयोगटांमध्ये वापरले जाते. सुरुवातीला जर्मनी, फ्रान्स व अनेक युरोपीय देशांनी हे व्हॅक्सिन ६० वर्षे पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना वापरू नये असे जाहीर केले – त्यासाठी त्यानी या व्हॅक्सिनच्या अभ्यासात (ट्रायलमध्ये) ज्येष्ठ नागरिकांवर पुरेसा अभ्यास न झाल्याचे कारण दिले. पुढे काही दिवसांनी हे व्हॅक्सिन दिल्यावर अनेक जणांत विशेषतः तरुण महिलांमध्ये मानवी रक्त गोठण्याची क्रिया असंतुलित झाल्याने काही गंभीर आजार व मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आल्याने युरोपातील १४ देशांनी या व्हॅक्सिनचा वापर काही काळासाठी थांबवला.

आता फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांनी या व्हॅक्सिनचा वापर ६० वर्षे पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींत करावा, ६० वर्षे पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये हे व्हॅक्सिन वापरू नये असे सांगितले आहे. म्हणजे सुरुवातीला जे सांगितले (६० वर्षाखालील लोकांत वापरा ६० वर्षांपुढील लोकांत नको) त्याच्या अगदी विरुद्ध (६० वर्षांपुढील लोकांत वापरा ६० वर्षाखालील लोकांत नको) असे आता सध्याचे सांगणे आहे. आणि याचे दिलेले कारण – तर्कशास्त्र असे आहे की सर्वच वयोगटात अस्ट्रा झेनेकाचे व्हॅक्सिन घेतल्यानंतर रक्त गोठण्याची क्रिया असंतुलित झाल्याने मृत्यू होण्याची शक्यता आहे, पण तरुणांत कोव्हिडने मृत्यू होण्याची शक्यता अल्प असल्याने त्यांना व्हॅक्सिनमुळे मरण्याची उगाच रिस्क नको. ज्येष्ठ नागरिकांत कोव्हिडने मृत्यू होण्याची शक्यता जास्त असल्याने लसीकरणोत्तर मृत्यूची रिस्क घेऊनही त्यांना हे व्हॅक्सिन द्यावे…या सगळ्या गोंधळामुळे अस्ट्रा झेनेका व्हॅक्सिन बद्दल आणि एकंदरितच कोव्हिड लसीकरणाबद्दल जगभरात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

नॉर्वे, डेन्मार्क अस्ट्रा झेनेकाचे व्हॅक्सिन अजून निलंबित स्थितीतच ठेवले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अस्ट्रा झेनेका व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांनी दुस-या डोसचे काय करायचे हाही मोठा प्रश्नच आहे.
भारतातही कोरोनाव्हॅक्सिन विशेषतः कोव्हिशिल्ड लस दिल्यानंतर काही तासांत ते काही दिवसांत व्हॅक्सिन घेतलेल्या काही व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत – पण ते प्रमाण सरकारच्या मते अत्यल्प आहे. म्हणजे ५ कोटी लसीकरण केलेल्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० मृत्यू. आणि हे मृत्यूही सरकारच्या मते कोरोनालसीकरणाशी संबंधित नाहीत. पण भारतातले लसीकरणोत्तर झालेले बहुतांश मृत्यू हे २४ वर्षे ते ६० वर्षे या वयोगटातील आहेत. यातील काही मृतकांचे शवविच्छेदन झाले आहे. यातील बहुतांश मृत्यू हे हृदयविकार वा मेंदूतील रक्तस्त्राव यामुळे झालेले आहेत – त्यामुळे हे मृत्यू मानवी रक्त गोठण्याची क्रिया असंतुलित झाल्याने झालेले असू शकतात असे समजण्यास वाव आहे. दिनांक १७ मार्च रोजी भारतातील अनेक तज्ञांनी सरकारला पत्र लिहून या लसीकरणोत्तर मृत्यूंचे सखोल विश्लेषण करून त्याची माहिती सार्वजनिक करण्याची विनंती केली आहे. भारत सरकारने मात्र लसीकरणोत्तर मृत्यू कोरोना लसीकरणाशी संबंधित नाहीत हा निष्कर्ष कसा काढला याबाबत पारदर्शकता दाखवलेली नाही.

कोरोना लसीकरणानंतर म्हणजे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर लसीकरण केलेल्या बहुतांश व्यक्तींमध्ये कोरोनाविरोधात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होणे अपेक्षित आहे. हे बहुतांश व्यक्तींचे प्रमाण – परिणामकारकतेचे प्रमाण – विविध लसींच्या सुरुवातीच्या दाव्यांत ९० ते ९५ टक्के होते. ते जसजसे अधिकाधिक लोकांना लसी दिल्या जात आहेत आणि लस दिल्यानंतर जसजसे दिवस जात आहेत – तसतसा हा लसींच्या परिणामकारकतेच्या प्रमाणाचा आकडा घसरू लागला आहे. सध्या तो ६० ते ७५ टक्क्यांच्या आसपास आहे. म्हणजे पूर्ण लसीकरण झाल्यानंतरही १०० पैकी सुमारे ३० जणांना कोरोनाची बाधा होते आहे. याची दोनतीन कारणे सांगितली जातात.

एक कारण म्हणजे लसीकरण केल्यानंतरही काही व्यक्तींत – विशेषतः वयोवृद्ध व्यक्तींत किवा दुर्धर आजारांनी ग्रस्त व्यक्तींत लस दिल्यानंतरही प्रतिबंधक रोगप्रतिकारशक्ती पुरेशा प्रमाणात तयार होत नाही – कारण अशा व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती मुळातच कमकुवत असते. आणि कोव्हिड १९ आजारात खरे तर वयोवृद्ध व्यक्ती गंभीर आजारी पडण्याची व मृत्युमुखी पडण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे ज्यांना कोव्हिड १९ आजारापासून संरक्षणाची जास्त आवश्यकता आहे, त्यांना लसीकरणाचा फार उपयोग होत नाहीए.

दुसरे कारण म्हणजे जनुकीय बदलांमुळे कोरोनाविषाणूच्या अनेक प्रजाती तयार झाल्या आहेत. सध्या उपलब्ध असलेली व्हॅक्सिन्स या सर्व प्रजातींविरुद्ध प्रभावी प्रतिबंधक रोगप्रतिकारशक्ती निर्माण करत नाहीत. त्यामुळे नवीन प्रजातीचा कोरोनाविषाणू लसीकरण केलेल्या व्यक्तींना संक्रमित करतोच आहे. काही तज्ञांच्या मते सध्या प्रचलित असलेल्या कोव्हिड लसी वर्षभरानंतर निरुपयोगी ठरतील, कारण कोव्हिड १९ – कोरोनाविषाणू जनुकीय जडणघडण – ओळख भराभर बदलतो आहे. लसनिर्मिती कंपन्यांनी या नव्या विषाणू-प्रजातींविरुद्ध काम करणाऱ्या लसींवर संशोधन सुरू केले आहे – लवकरच त्या बाजारात येतील. म्हणजे बहुधा दर सहा महिने किंवा वर्षातून एकदा कोव्हिड लस – बूस्टर – घ्यावी लागेल असे दिसते.

तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लसींच्या साठवणूक व वहनामध्ये योग्य शीतसाखळी (Cold Chain) मेंटेन करावी लागते. यात थोडीही हयगय झाली तरी लसीची परिणामकारता नष्ट होऊ शकते. अर्थात सध्या तरी असे म्हणताहेत की जरी कोरोनाची बाधा झाली तरी लसीकरण केलेल्या व्यक्तीला होणारा कोरोना आजार हा सौम्य स्वरूपाचा राहील. अर्थात याबद्दल अधिक खात्री ही जसा काळ जाईल, तशी होईल.

कोव्हिड महामारीत महामारी नियंत्रणार्थ अनेक गोष्टी (INTERVENTIONS) अनुमानधपक्याने – कदाचित याचा उपयोग होईल अशा सद्हेतुपूर्वक समजुतीने – केल्या गेल्या. त्या गोष्टी अनेक शास्त्रज्ञांनी, अनेक देशांतील प्रतिष्ठित डॉक्टरांनी, सरकारी कोव्हिड टास्क फोर्सेसनी निर्देशित केल्या होत्या. कालांतराने असे लक्षात आले की या गोष्टी निरुपयोगी आहेत – यांपैकी काही गोष्टी (INTERVENTIONS) तर अधिक हानिकारक आहेत असे विविध अभ्यासांत लक्षात आले. उदाहरणे द्यायची झाली तर कोव्हिड प्रतिबंधाकरिता हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा वापर किंवा कोव्हिड उपचाराकरिता रेमडेस्व्हिर या औषधाच्या वापराचे देता येईल. पैकी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेतलेल्या लोकांत मृत्यूदर अधिक आहे असे लक्षात आले तर रेमडेस्व्हिरच्या वापराने कोव्हिड आजारावर फार काही परिणाम होत नाही – मृत्यूदरात तर काहीच फरक पडत नाही असे लक्षात आले. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने ही औषधे कोव्हिड आजारात वापरू नयेत असे जाहीर केले आणि बहुतांश देशांतील डॉक्टरांनी या औषधांचा वापर थांबवला.

या सा-या व्हॅक्सिनकल्लोळात कोरोनालसीकरणाचीही या अनुमानधपक्याच्या गोष्टींच्या यादीत भर पडू नये म्हणजे मिळवली.

डॉ. चंद्रशेखर साठये 
(shekhar1971@gmail.com)

(लेखक रायगड जिल्ह्यातील अलिबागस्थित अस्थीशल्य विशारद असून सध्या ते स्वतः कोविड-१९ वॉर्ड साठी जिल्हा शासकीय रुग्णालयास स्वेच्छेने सेवा देत आहेत)

(*टीप – लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते असून महाराष्ट्र वार्ता हे फक्त माध्यमाच्या भूमिकेत आहे)

खालील लिंकवर क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter || INSTARAM ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *