Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही सेवानिवृत्त कामगारांना पोर्ट ट्रस्ट वसाहतीमधील घरे खाली करण्याचा ‘MbPT’चा अजब फतवा

घरे न सोडल्यास पूर्वलक्षी प्रभावाने आणि भरमसाठ दराने भाडे आकारण्याची धमकी

नवनिर्वाचित अध्यक्षांचे जेएनपीटीचे माजी विश्वस्त ऍड. जयप्रकाश सावंत यांनी वेधले लक्ष

मुंबई, दि. १५: या वर्षी सेवानिवृत्त झालेले आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वसाहतीमध्ये भाडे तत्वावर राहणारे मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार कोविड-१९ च्या महामारीमधील लॉक डाऊन काळ, सांप्रतची गंभीर परिस्थिती तसेच अनंत अडचणींमुळे वसाहतीमधील घरे सोडून आपापल्या गावी जाण्यास असमर्थ होते. कुटुंबातील सभासदांसह आणि सर्व घरगुती सामानासह गावी जाण्यासाठी वाहतुकीची पुरेशी व्यवस्था अद्यापही शक्य नाही. विविध प्रकारच्या तपासण्या करून परवाने मिळविणे, अलगीकरणाचे कठोर नियम पाळणे, गावा-शहरामध्ये प्रवेश मिळविण्यास असणारे निर्बंध, पावसाळी दिवस, करोनाचा वाढणारा प्रादुर्भाव, सर्वाचीच सुरक्षा या सर्व घटकांचा विचार करून पोर्ट ट्रस्टने या सेवानिवृत्त कामगारांना नेहमीच्या भाडेदराने या वर्षअखेरीपर्यंत वसाहतीमध्ये राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती पोर्ट ट्रस्ट अध्यक्षांना या सेवानिवृत्त कामगारांनी केली. मात्र , १३ जुलैच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला कि, हे सेवानिवृत्त कामगार ३१ ऑगस्ट २०२० पर्यंतच सध्याच्या भाडेदराने राहू शकतील, त्यानंतर कोणी राहिल्यास पूर्वलक्षी प्रभावाने आणि दरमहा पूर्ण पगाराच्या ४० टक्के एवढ्या रक्कमेच्या दराने भाडे वसूल करण्यात येईल. अशा निर्णयामुळे अनेक सेवानिवृत्त कामगारांना कठीण समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

वास्तविक, पोर्ट ट्रस्टच्या वसाहतीमधील अनेक घरे अथवा खोल्या रिकाम्या आहेत. कोणीही प्रतीक्षा यादीवर नाही. या वसाहतीमध्ये नियमबाह्यरित्या अन्य उद्योगातील आणि कंत्राटी कामगार राहत आहेत. सेवानिवृत्त कामगारांना अशा बिकट प्रसंगी काही महिने राहू दिल्यास पोर्ट ट्र्स्टच्याच तिजोरीत पैसे जमा होणार होते आणि कोणाचेही नुकसान अथवा गैरसोय होणारी नव्हती. परंतु विश्वस्त मंडळाने आपल्या अधिकाराचा सुयोग्य वापर केला नसल्याने या शेकडो सेवानिवृत्त कामगारांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. असा दुर्दैवी निर्णय घेणारे अध्यक्ष संजय भाटिया १ ऑगस्टपासून सेवानिवृत्त झाले असून आता जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांच्याकडे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. कामगार नेते आणि जेएनपीटीचे माजी विश्वस्त ऍड. जयप्रकाश सावंत यांच्यामार्फत सेवानिवृत्त कामगारांना या वर्ष अखेरीपर्यंत पोर्ट ट्रस्टच्या वसाहतीमध्ये कुठलीही भाडेवाढ न करता राहू द्यावे अशी विनंती नवनिर्वाचित अध्यक्षांना करण्यात आली आहे. आता कामगारांच्या नजरा नवनिर्वाचित अध्यक्षांच्या योग्य प्रतिसादाकडे लागल्या आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *