गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मेट्रो-१० प्रकल्पाला गती; वाहतूक कोंडी कमी करण्यावर भर
ठाणे, दि. १० : ठाणे–मिरा भाईंदर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर गायमुख रेतीबंदर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) या मेट्रो-१० प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उन्नत मेट्रो मार्गाच्या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काशीगाव ते दहिसर चेक नाका या जोडणीच्या पुढील टप्प्यात गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा सुमारे ९.७ किलोमीटरचा मार्ग उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी अंदाजे ८,५५३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पुढील तीन ते चार महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच दहिसर–काशीगाव मार्गाचा विस्तार करून तो गायमुखपर्यंत नेण्यात येणार आहे.
घोडबंदर रोडवरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन रस्त्याचे रुंदीकरण करण्यावरही भर देण्यात आला आहे. सध्या ३० मीटर रुंदी असलेला रस्ता ६० मीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन असून सुमारे ५.५ ते ६ किलोमीटर लांबीच्या काँक्रीट रस्त्यासाठी सुमारे १,२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया संबंधित यंत्रणेमार्फत राबविली जाणार असून त्यासाठी अंदाजे १५० ते २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
आदिवासी जमिनींच्या अधिग्रहणाच्या संदर्भात संबंधितांना शासकीय दराने भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विकासकांना टीडीआर आणि एफएसआयच्या माध्यमातून पर्यायी सुविधा देण्याचे नियोजन आहे.
याचबरोबर ठाणे, मिरा भाईंदर आणि नवी मुंबई परिसरात वाहतूक सुधारण्यासाठी पॉड टॅक्सी प्रकल्प राबविण्याचा विचार असून तो सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. पुढील सहा महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, घोडबंदर रोडवरील कामांना गती देण्यासाठी पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून महावितरणच्या खांबांच्या स्थलांतरासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांची कामे पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई सुरू असून काही सेवा पुरवठादारांच्या परवान्यांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसेच राज्यात रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक करण्यात आले असून नियमानुसार तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
