Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आयुर्वेद कुतूहल – आहार भाग १

HEALTH

आयुर्वेद कुतूहल

आहार भाग १

अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, त्यातील अन्न हे आयुर्वेदाच्या तीन उपस्तंभांपैकी एक भाग आहे.
आपले शरीर हे आहारानेच बनते, एवढेच नाही तर आपले मन, विचार ह्या सर्वांवर हि आहाराचा परिणाम होतो. अशा ह्या मूलभूत आहारासाठी देखील आयुर्वेदात नियम आहेत. त्याच्या गुण कर्मानुसार सेवन पद्धती आयुर्वेदात वर्णन केली आहे. त्याची थोडक्यात माहिती आपण पाहु.

* आहाराच्या गुणावरून त्याचे गुरु (पचायला जड) व लघु (पचायला हलके) असे भेद केले आहेत. गुरु गुणयुक्त आहार हा पचायला जड असल्यामुळे भुकेच्या अर्ध्या मात्रेतच ग्रहण करावा व लघु गुण युक्त आहार पचायला हलका असला तरी तो मात्रापुर्वकच ग्रहण करावा. म्हणजे भूक असेल तेवढाच.
* अत्यल्प आहार अथवा अजिबात आहार न घेणे हे जसे चुकीचे आहे तसेच अति मात्रेत घेतलेला आहार देखील रोगांना निमंत्रण देतो.
* आपल्याला भुकेची जाणीव स्वतः होते. तसेच पोट भरल्याची देखील जाणीव आपणास होते ह्याच जाणिवेवरून आपण आपली आहाराची मात्रा ठरवावी.
* आयुर्वेदात अन्नपदार्थ, द्रव पदार्थ व पचनासाठी मोकळी जागा ह्याचे माप ठरलेले आहे.
* भुकेच्या संवेदनेंनुसार पोटाचे चार भाग करावेत
१ प्रथम दोन भाग – ठोस अन्न पदार्थ
२ तिसरा भाग – जल आदी पेय पदार्थ
३ चौथा भाग – वातादी दोषांसाठी मोकळा ठेवावा.

* पोटात विविध पाचक रस येऊन अन्न विघटन होते, अशावेळी अन्नाचे त्यात चलन होणे अपेक्षित असते. पोट भरून आहार झाल्यास त्या चलनास अडथळा निर्माण होतो व पाचन सुलभ होत नाही. म्हणूनच मात्रापुर्वक आहार घ्यावा.

* मात्रापुर्वक आहार तृप्ती लक्षण – ढेकर येणे, पोटात न दुखणे, कुठलेही काम करताना त्रास न होणे, पोट जड न वाटणे. ह्या लक्षणांवरून आहार मात्रापुर्वक सेवन केल्याचे समजते.
* असा मात्रापुर्वक व योग्य वेळेत आहार घेतल्यास कोणताही रोग होत नाही.

* चुकीच्या पद्धतीने आहार करण्याचे प्रकार –
१ समशन – हितकर व अहितकर आहार एकत्र घेणे.
२ विषमाशन – आहाराच्या मात्रा अथवा वेळा बदलणे.
३ अध्यशन- आधीचा आहार पचला नसताना पुन्हा आहार घेणे.
४ विरुद्धाशन – एकमेकांच्या विरुद्ध असलेले पदार्थ खाणे.
अशा प्रकारच्या आहार सेवनाने व्याधी उत्पन्न होतात.

* आहार सेवन काळ –
आचार्यानी श्रेष्ठ असा आहाराचा एकच काळ असावा असे सांगितले आहे आणि तो हि ऋतु नुसार बदलतो. कारण दिवस – रात्र, सूर्योदय-सुर्यास्त ह्याचा आहाराच्या पचनावर फरक पडतो.
* सुश्रुत आचार्यांनी आहाराचे दोन काळही सांगितले आहेत
१ प्रातःकाल – पूर्ण आहार (स. १० – दु. १)
२ सायंकाल – पूर्ण आहार (सा. ६ – रा. ८)
दुसरा आहार काळ हा संध्याकाळी सांगितला आहे, म्हणजे सूर्यस्थाच्या थोडं आधी. आणि आपण रात्री आहार घेतो तेव्हा आपली पचनशक्ती कमी असते. सहसा सायंकाळी आहार घेणे उत्तम परंतु तसे शक्य नसल्यास रात्रीचा आहार हा अत्यंत हलका असावा जेणेकरून पचनास त्रास होत नाही.
* आहारानंतर करावयाच्या गोष्टी –
१ लगेच झोपून न जाता काही काळ बसावे, त्यानंतर १०० पावले चालावे.
२ जेवल्यानंतर लगेचच चालणे, प्रवास करणे, भाषण करणे, मेहनतीचे काम करणे, धावणे ह्यांसारख्या गोष्टी टाळाव्या.
३ जास्त विचार, क्रोध, शोक ह्यांसारख्या मानसिक गोष्टी देखील टाळाव्यात, कारण ह्या सर्वांचा आहार पचनावर वाईट परिणाम होतात.

* तांबूल सेवन – जेवल्यानंतर विड्याचे पान खावे ह्यामध्ये विड्याची दोन पाने- पुग म्हणजे सुपारी, सुधा म्हणजे चुना, खादीरसार म्हणजे कात ह्यांच्या मिश्रणासोबत पान खावे.
( काही आजारांमध्ये पान निषिद्ध आहे तेव्हा वैद्याचा सल्ल्याने ह्याचे सेवन करावे. )
* आहार व रस –
आयुर्वेदात सहा रसांचा उल्लेख आहे. मधुर (गोड), आम्ल ( आंबट) , लावण ( खारट) ,कटु ( तिखट) , तिक्त ( कडु ) , कषाय ( तुरट). प्रत्येक रसाचे एक महत्व आहे आणि सेवनाच्या मर्यादा देखील आहेत .
म्हणून कधीच एकाच रसाचे सेवन करू नये. ह्याने शरीरात दौर्बल्य आणि रोग उत्पन्न होतात. म्हणूनच सर्व रसांचा समावेश आहारात असावा.
* जेवताना रसांचा क्रम –
जेवताना आहार रसांचा क्रम आयुर्वेदाने सांगितला आहे.
१ प्रथम – मधुर रस पदार्थ
( पक्वांशयातील वायु शांत करतो)
२ मध्य – आहाराच्या मध्ये आम्ल व लवण रसाच्या पदार्थांचे सेवन करावे
( ह्यामुळे पोटातील पाचन शक्ती सुधारते)
३ अंत – आहाराच्या शेवटी कडु, तिखट,तुरट पदार्थ खावेत (हे पचायला हलके असल्यामुळे शेवटी खावेत)

इथे आपल्याला विरोधाभास दिसतो, आपण जेवणानंतर गोड पदार्थ खातो, परंतु आधीच आहार घेतल्यामुळे मंदावलेला अग्नि त्या मधुर रसाचे पाचन नीट करू शकत नाही आणि अपचन ,मधुमेह, स्थूलता यांसारखे व्याधी उद्भवतात. म्हणूनच जेवल्यावर गोड पदार्थ खाणे हि आयुर्वेदिक पद्धती नाही.
* सकाळी खाल्लेले अन्न पचले नसले तर रात्री हलका आहार घेतला तर एकदा चालेल पण रात्री जेवणाचे अपचन झाले तर सकाळी आहार घेऊ नये.
* आहार कधी घ्यावा –
मल व मूत्राचे नीट विसर्जन झाले असता, भुकेची जाणीव होणे, पोट हलके होणे, शुद्ध ढेकर येणे म्हणजेच आंबट, करपट अथवा आधीच्या खाल्लेल्या अन्नाचे ढेकर येत नसतील तेव्हा आहार घ्यावा.
अन्न पाचण्याची हि लक्षणे आहेत त्यानंतरच पुढील आहार घ्यावा.
* आहार घेताना मध्ये थोडे कमी पाणी घेतले तर चालेल परंतु जेवणानंतर एकदम लगेच पाणी घेऊ नये.
* आहार नेहमी ताजा घ्यावा व शांतपणे बसून ग्रहण करावा ह्यामुळे पचन चांगले होते.
आहार हा महत्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे होणारे अजिर्ण, अम्लपित्त, मल बद्धता ह्या अजारांकडे दुर्लक्ष करू नये, ह्यामुळेच पुढील मोठे रोग होतात.
ह्या लेखात आपण आहाराच्या मात्रा आदी गोष्टींचा विचार केला. पुढील लेखात आपण आहारासोबत घेण्याच्या पेय पदार्थांचा म्हणजेच अनुपानाचा विचार पाहु ज्यामुळे आहार पचायला मदत होते.

भेटु पुढील लेखात तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे।
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
shardulchavan88@gmail.com

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *