Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

तोंडाच्या कर्करोगाने अकाली मृत्यू झाल्याने होणाऱ्या आर्थिक हानीविषयी टाटा मेमोरियल सेंटरचा भारतातील पहिला संशोधन अहवाल प्रकाशित

तोंडाच्या कर्करोगाने अकाली मृत्यू झाल्याने होणाऱ्या आर्थिक हानीविषयी टाटा मेमोरियल सेंटरचा भारतातील पहिला संशोधन अहवाल प्रकाशित

मुंबई, दि. ३: कर्करोग हे जागतिक स्तरावरचे मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. यांपैकी सुमारे  ७०% प्रमाण हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील [Middle-Income Countries (LMIC)] असल्याचेही आरोग्य संघटनेने म्हटले आहे. भारतातील कर्करोगाची परिस्थिती पाहिली तर त्यात पुरुषांमधील तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे दिसते असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. खरे तर, जागतिक पातळीवरील तोंडाच्या कर्करोगाचे निदान होण्याचे आणि यामुळे मृत्यू होण्याचे एक तृतीयांश प्रमाण भारतात आढळत असल्याचेही आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

तोंडाच्या कर्करोगाचे निदान आणि व्यवस्थापन करण्यासंबंधी सद्यस्थितीत लक्षणीय प्रगती झालेली आहे, मात्र तरीदेखील या आजारावरच्या उपचारांचा खर्च सातत्याने वाढता राहिला आहे, आणि त्यामुळेच त्याचा आरोग्य सेवा प्रदानकर्ते आणि रूग्णांवरही आर्थिक ताण निर्माण झाला आहे. या आजारामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे उद्भवणाऱ्या खर्चाचे परिणाम केवळ व्यक्तिगत पातळीवरच नाही तर संबंधीतांच्या कुटुंबांवर आणि त्यांना सोबत करणाऱ्यांवरही होत असतो, विशेषतः यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला घटक हा अनेकदा कर्जाच्या फेऱ्यात अडकतो आणि दारिद्र्यात ओढला जातो. दुसरीकडे पाश्चिमात्य जगाच्या तुलनेत देशात युवा वयोगटात या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते, परिणामी याचा अर्थव्यवस्थेच्या उत्पादक क्षमतेवर लक्षणीय ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टाटा मेमोरियल सेंटरने केलेल्या प्रयत्नांमुळे तोंडाच्या कर्करोगाच्या अकाली मृत्यू झाल्याने, उत्पादकते काय नुकसान होते याची सविस्तर माहिती मिळू शकते. या माहितीमुळे आपल्या धोरणकर्त्यांना सेवा वितरणाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्याच्या प्रक्रियेत मोठी मदत होऊ शकते. आपल्यासारख्या देशात जिथे परवडण्याजोग्या सेवांच्या बाबतीत बरीच मोठी तफावत आहे, तिथे तोंडाच्या कर्करोगामुळे उद्भवणाऱ्या स्थितीचा सामना करण्यासाठी आजाराला समोर ठेऊन निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार धोरण आखून त्याची अंमलबजावणी करणे सोपे जाऊ शकते.

या समस्या सोडवण्यासाठी कर्करोगविषयक अत्याधुनिक उपचार संशोधन आणि शिक्षण केंद्राचे [Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer (ACTREC)] डॉ. पंकज चतुर्वेदी आणि त्यांच्या पथकाने प्रदीर्घ पाठपुरा केल्यानंतर, त्याआधारे भारतात तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित होणारे अकाली मृत्यू आणि त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान निश्चित करता येईल यासाठीच्या संशोधनाला सुरूवात केली. अशा प्रकारचे हा भारतातील पहिलेच संशोधन आहे, तर जगातही अशाप्रकारचे अगदीच मोजके संशोधनाचे प्रयत्न झाले आहेत. या संशोधनात मांडलेली अंदाजीत निरीक्षणे ही गेल्या ३ वर्षांमध्ये, प्रत्यक्ष त्या त्या वेळच्या रुग्णांशी संबंधित संकलित केलेल्या  माहितीसाठ्याचा वापर करून नोंदवली गेली आहेत. अशाप्रकारच्या व्यापक माहितीसाठ्याच्या संकलनामुळे तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित अकाली मृत्यू झाल्याने उत्पादकतेच्या होणाऱ्या एकूण नुकसानीचा अंदाज मांडणे शक्य झाले आहे. उदाहरण म्हणून पाहायचे झाले तर या माहितीसाठ्यामुळे तोंडाच्या कर्करोगाने बाधित रुग्णाचा थेट सहभाग बंद झाल्याने समाजाला होणाऱ्या एकूण हानीचा अंदाज बांधणे शक्य झाले आहे.

प्राथमिक स्तरावरील कर्करोगामुळे (२९.८%) तर त्या पुढच्या टप्प्यावर पोहोचलेल्या कर्करोगामुळे (७०.२%) सुमारे ६७१ वर्षांची उपयोगिता नुकसानात गेल्याचा दावा टाटा मेमोरियल रुग्णालयाचे सहाय्यक प्राध्यापक तसेच या संशोधनातील प्रमुख प्रमुख लेखक डॉ. अर्जुन सिंह यांनी केला आहे. या संशोधनातून भारतात निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे हे लक्षात घेतले तर, ९१ टक्के मृत्यू किंवा असाध्य आजारांची लागण ही अकाली वयोगटात म्हणजेच सरासरी ४१.५ वर्षे वयोगटात होत असल्याचे आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संशोधनानुसार प्राथमिक टप्प्यावरच्या (७०%) आणि त्यापुढच्या टप्प्यावर पोहचलेल्या (८६%) कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण हे मध्यमवर्गीय सामाजिक-आर्थिक स्थितीत जगत असलेल्या लोकांमध्ये असल्याचे दिसून आले आहे. महत्वाचे म्हणजे ५३% लोकांना उपचार पूर्ण करण्यासाठी काहीएक प्रकारच्या विमा योजना किंवा आर्थिक मदतीची गरज होती असेही या संशोधनातून दिसून आले आहे. अकाली मृत्यू झाल्याने, नुकसानीत गेलेल्या  उत्पादकतेचे मोजमाप हे मानवी भांडवल आधारित पद्धत म्हणून मान्यता असलेल्या पद्धतीने केल्याचे संशोधनकर्त्यांनी म्हटले आहे. आर्थिक विषयांशी निगडित अनेक संशोधनांमध्ये मोजणीच्या वेळी बाजारातील दरांनुसार दिले जाणारे वेतन आणि इतर निर्देशांक गृहीतके म्हणून विचारात घेतले जातात. मात्र हे अशाप्रकारचे संशोधन आहे जिथे वैयक्तिक रूग्णांचा माहितीसाठा (अशा रुग्णांचे बाजार आणि तसेच बिगर बाजारी क्षेत्रातील योगदान, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती, शैक्षणिक पात्रता इ.) हा संभाव्यतेच्या गृहीतकानुसार आणि दीर्घ कालावधीसाठी संकलित केला गेला. या संशोधनातून हाती आलेले निष्कर्ष हे राष्ट्रीय श्रमशक्ती सहभाग (४८%) बेरोजगारी दराशी (७%) मेळ साधणारे आहेत. महत्वाचे म्हणजे हे प्रमाण देशाच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने [National Sample Survey Office (NSSO)] दिलेल्या अहवालातीलच प्रमाण आहे. या निष्कर्षांनुसार तोंडाच्या कर्करोगामुळे मृत्यूमुळे पुरुषांच्या ५७,२२,८०३ रुपये इतक्या तर महिलांच्या ७१,८३,९१७ रुपये इतक्या उत्पादकतेचे नुकसान झाले आहे.

समाजाच्या उत्पादकतेची हानी विचारात घेतली तर ती सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगामुळे ३१,२९,०९२ रुपये होती तर गंभीर परिस्थितीमधील कर्करोगामुळे ७१,७२,५६६ रुपये इतकी होती.लोकसंख्येतील मृत्युदराच्या आधारावर, हे परिणाम असे सांगतात की, भारतात २०२२ मध्ये तोंडाच्या कर्करोगामुळे झालेल्या मृत्युंमुळे ५.६ अब्ज डॉलर्स इतक्या मूल्याच्या उत्पादकतेची हानी झाली, हे प्रमाण एकत्रित स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ०.१८% आहे. ही आकडेवारी कर्करोगावरील उपचारातील वैविध्याचा परिणाम आणि देशात हे उपचार मिळण्यातील सुलभता यांच्या प्रभावाला तितकेसे महत्त्व देत नाही. ग्लोबोकॅन या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणित नोंदपुस्तकातून लोकसंख्याविषयक आकडेवारी मिळवताना, खरा दबाव अधिक असू शकेल कारण कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील लोकसंख्येची माहिती प्रत्यक्ष लोकसंख्येच्या दहा टक्क्याहून कमी जनतेचे प्रतिनिधित्व करते.

भारतातील लोकांमध्ये लहान वयात तंबाखू आणि सुपारीचे सेवन सुरु होत असल्यामुळे तरुणांमध्ये तोंडाच्या कर्करोगाची सुरुवात देखील लवकर होते. यामुळे व्यक्ती, कुटुंबे, समाज आणि अर्थव्यवस्था यांच्यावर अत्यंत विनाशकारी परिणाम दिसून येतात. अशा वेळी कमी वयोगटाला लक्ष्य करणारी अनुकूल प्रतिबंधक धोरणे लागू करणे गरजेचे आहे. अधिक धोका असणाऱ्या गटांसाठी चाचणी तसेच त्वरित निदान नीतीला प्राधान्य दिले गेले पाहिजे. संशयास्पद गाठी असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपचार उपलब्ध असण्यासह पायाभूत सुविधा आणि साधनसंपत्ती यांच्या अभावामुळे अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे कठीण असते. उपचार मिळण्याच्या सुलभतेतील अशा प्रकारची तफावत उत्पादकतेच्या हानीत परिवर्तीत होते.

टाटा मेमोरिअल केंद्राचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता म्हणाले, “ग्लोबोकॅनच्या अद्ययावत माहितीनुसार, तोंडाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ५५% असून यावरून या रोगाचा सार्वजनिक आरोग्याला किती धोका आहे हे दिसून येते. जागरूकतेचा एकंदर अभाव, भीती आणि तोंडाच्या कर्करोगाविषयी असलेल्या गैरसमजुती यामुळे बऱ्याचशा रुग्णांमध्ये गंभीर पातळीवर पोहोचल्यानंतरच या रोगाचे निदान होते आणि त्यातून या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या दरात वाढ होते.गंभीर अवस्थेतील अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले तरीही त्यांना गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांना तोंड द्यावे लागून त्यांचे जीवनमान खालावते आणि त्यामुळे समाजामध्ये योगदान देण्याच्या त्यांच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो.” आपल्या देशात तोंडाचा कर्करोग हा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळणारा कर्करोगाचा प्रकार असून जगातील एकूण रुग्णांच्या तुलनेत आपल्या देशातील प्रमाण एक तृतीयांश असल्यामुळे व्यक्ती, कुटुंबे आणि अर्थव्यवस्थेवर याचा होणारा परिणाम धक्कादायक आहे.

ज्येष्ठ लेखक आणि टाटा मेमोरिअल केंद्राचे माजी संचालक डॉ.आर.ए.बडवे म्हणाले, “कमी स्त्रोत असलेल्या देशांच्या बाबतीत, विशेषतः भारतामध्ये फार कमी अभ्यासांमध्ये, या रोगाचा आर्थिक परिणाम जाणून घेण्यासाठी कर्करोगाने होणाऱ्या उत्पादकतेच्या हानीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. धोरण-कर्त्यांना स्त्रोतांच्या वितरणासंदर्भात निर्णयासाठी माहिती पुरवण्याच्या दृष्टीने देशात तोंडाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या अकाली मृत्युंमुळे, तोंडाच्या कर्करोगावर होत असलेला एकूण खर्च शोधून काढण्यासाठी आम्ही अभ्यास हाती घेतला आहे.”

अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकचा वापर करा: https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1002/hed.27776?af=R

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *